मांद्रेतील चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार?

दयानंद सोपटे, बाबी बागकर, जीत आरोलकर, यांची प्रचारात आघाडी


15th April 2019, 02:04 am


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : मांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपतर्फे दयानंद सोपटे, काँग्रेसतर्फे बाबी बागकर, अपक्ष म्हणून जीत आरोलकर, गोवा सुरक्षा मंचचे स्वरूप नाईक हे उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत सोपटे, बागकर व आरोलकर या तिघांत होणार आहे. अटीतटीच्या लढतीत तिन्ही उमेदवारांना जिंकण्याच्या समान संधी आहेत, त्यामुळे मांद्रेतील या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काँग्रेस आणि भाजपची निशाणी यापूर्वीच मतदारांकडे पोचली असून अपक्ष उमेदवारांची निशाणी अजून पोचलेली नाही. त्यामुळे त्यांना परत एकदा मतदारांकडे निशाणी घेऊन जावे लागणार आहे. ही निवडणूक रिंगणातील उमेदवारांचा राजकीय प्रवास आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
काँग्रेसतर्फे रमाकांत खलप, सचिन परब आणि संगीता परब हे बाबी बागकर यांच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले नाहीत. शिवाय त्यांचे समर्थक आणि भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रचाराला कुठेच दिसत नसले तरीही सोपटे यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार केल्याने त्यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.
सोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संघटना मजबूत करण्यावर भर दिला. आता त्यांच्याकडे मजबूत संघटना असल्यामुळे ते बाजी मारतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. काँग्रेसने शेवटच्या क्षणी बाबी बागकर यांना उमेदवारी देऊन समर्थकांवर ऐनवेळी जबाबदारी वाढवली आहे. ही उमेदवारी रमाकांत खलप यांना जाहीर झाली होती, मात्र ऐनवेळी काँग्रेस नेत्यांनी बागकर, खलप व सचिन परब यांना बैठकीला आमंत्रित करून नेत्यांमध्ये भांडणे लावण्यापालिकडे काहीच केले नाही. बागकर हे मोरजीतील असल्याने त्यांनी मोरजीतील ८० टक्के मते घेतली तर ते आमदार होऊ शकतात.
आरोलकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. त्यांना मगोचा अंतर्गत पाठिंबा, शिवाय निष्ठावंत काही भाजप कार्यकर्त्यांचाही उघडपणे पाठिंबा आहे. मागच्या दोन वर्षांपासून आरोलकर यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. केरळमध्ये आलेल्या पुरात मांद्रेतील १२ नागरिक अडकले होते. त्यांना सुखरूप गोव्यात आणण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयज्ञ केले. शिवाय तुये येथील विद्यार्थिनी संस्कृती ही मृत्यूशी झुंज देत होती. त्यावेळी तिच्यासाठी आरोलकर यांनी केलेले प्रयत्न आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. गोवा सुरक्षा मंचतर्फे हरमल येथील स्वरूप नाईक हे रिंगणात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी प्रचार सुरू केला आहे.
मांद्रे मतदारसंघात सोपटे, बागकर, आरोलकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. बागकर आणि आरोलकर यांनी सर्वांत प्रथम आपापले जाहीरनामे मतदारांपर्यंत पोचवण्यावर भर दिला आहे. सोपटे यांचा जाहीरनामा अजूनही प्रसिद्ध झालेला नाही.
बागकर आणि आरोलकर यांनीही प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येते, मात्र स्वरूप नाईक यांचा मतदारांवर प्रभाव दिसून येत नाही. आरोलकर यांच्या प्रचारात मगोचे नेते श्रीधर मांजरेकर, श्रीमती मांजरेकर, परशुराम कोटकर, राघोबा गावडे, आपचे नेते देवेंद्र प्रभुदेसाई हे सक्रिय आहेत.