भाजपचा जाहीरनामा म्हणजे जुमला : ट्रोजन

पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्याची टीका


09th April 2019, 04:46 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेली बहुतांशी आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. आता पुन्हा एकदा त्याच आश्वासनांचा समावेश करून लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचा हा जाहीरनामा म्हणजे ‘जुमला’ असल्याची टीका काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी केली.            

पणजीतील काँग्रेस भवनात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

डिमेलो पुढे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात भाजपने दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनतेला दिले होते. पण नवे रोजगार निर्माण न करता देशातील सुमारे ७० लाख नोकऱ्या नष्ट करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे. याशिवाय विदेशातील काळा पैसा परत आणू, असे म्हणणाऱ्या मोदी सरकारला एक काळा पैसाही परत आणण्यात यश आलेले नाही. नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. पण प्रत्यक्षात देशात दहशतवादी कारवाया वाढतच आहेत, अशी टीका त्यांनी केली.             

मोदी सरकारच्या विविध निर्णयांमुळे गेल्या पाच वर्षांत भारत पिछाडीवर गेला आहे. गरिबीत आणखी वाढ झाली आहे. जगात इंधनाचे दर कमी होत असताना भारतात मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत आदींसारख्या योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. याचा फटका लोकसभेत भाजपला बसेल, असा दावा त्यांनी केला. लोकसभेसाठीच्या काँग्रेस उमेदवारांना राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे, पण भाजप उमेदवारांना जनतेकडून घेराव घातले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.  

हेही वाचा