भारतीय महिलांकडून नेपाळचा ३-१ गोलने पराभव

06th April 2019, 03:19 Hrs

मांडले :भारतीय महिला फुटबॉल संघाने इंडोने​शियाच्या मांडले येथे चालू असलेल्या एफसी​ ऑलिम्पिक २०२० क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत शनिवारी नेपाळचा ३-१ गोलने पराभव केला. स्पर्धेत भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा २-० गोलने पराभव केला होता.
भारतातर्फे दुसऱ्या सामन्यात संध्या रंगनाथनने ६०व्या मिनिटाला व कर्णधार आशालता देवीने ७८व्या मिनिटाला गोल केले तर नेपाळच्या पूनम मगरने सहाव्या मिनिटाला स्वयं गोल केला. नेपाळतर्फे निरू थापाने एकमेव गोल नोंदवला.
या विजयामुळे भारतीय संघ आता ‘ए’ गटात सहा गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघासाठी या सामन्यात ग्रेस व संजूने चांगली सुरुवात करून दिली, मात्र सामन्याच्या सहाव्या मिनिटाला पूनम मगरने स्वयं गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु याच्या पुढच्याच मिनिटाला निरू थापाने गोल करत आघाडी बरोबरीत आणली. यानंतर संजूने ९व्या व २५व्या मिनिटाला गोल करण्याची संधी गमावली व पहिला हाफ १-१ने बरोबरीत राहिला.
दुसऱ्या हाफमध्ये ६०व्या मिनिटाला संध्याच्या गोलमुळे भारताने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर ७८व्या मिनिटाला आशालतानेही गोल करत भारताला ३-१ने शानदार विजय मिळवून दिला.