भारतीय महिलांची मलेशियावर मात


06th April 2019, 03:19 pm
भारतीय महिलांची मलेशियावर मात

कौलालंपूर :भारतीय महिला हॉकी संघाने पावसाने प्रभावीत पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शनिवारी मलेशियाचा ५-० गोलने पराभव केला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी यजमान मलेशियाचा ३-० गोलने पराभव केला होता. मालिकेत भारताने आता २-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघासाठी दुसऱ्या सामन्यात नवजोतने १२व्या, वंदना कटारियाने २०व्या, नवनीतने २९व्या, लालरेस्मियामीने ५४व्या व निक्कीने ५५व्या मिनिटाला गोल केले. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये नवजोतच्या मदतीने गोल करत १-० अशी आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये वंदना कटारियाने २०व्या व नवनीतने २९व्या मिनिटाला गोल करत मध्यंतरापर्यंत भारताची आघाडी ३-० अशी केली.
यानंतर तिसरा क्वार्टर गोलविरहीत राहिला तर चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये लालरेस्मियामीने ५४व्या व निक्कीच्या ५५व्या मिनिटाच्या गोलांच्या जोरावर ५-० असा एकतर्फी सामना आपल्या नावावर केला.
तत्पूर्वी पहिल्या सामन्यात स्ट्रायकर वंदना कटारियाच्या २ गोलांच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ३-० गोलने पराभव केला. वंदनाने १७व्या व ६०व्या मिनिटाला गोल केला तर लालरेस्मियामीने ३८व्या मिनिटाला गोल केला होता.
सलग दोन विजयामुळे भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास वाढला असून तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत ३-० अशी अपराजित आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेले.