चेन्नईकडून पंजाब पराभूत


06th April 2019, 03:18 pm
चेन्नईकडून पंजाब पराभूत

चेन्नई :
मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा २२ धावांनी पराभव केला. चेन्नईने निर्धारित २० षटकांत तीन गडी गमावून १६० धावा केल्या होत्या. पंजाबचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून १३८ धावाच करू शकला.
पंजाबतर्फे सर्वाधिक धावा सरफराज खानने (६७) केल्या. त्याने ५९ चेंडूच्या आपल्या खेळीत ४ चौकार व दोन षटकार लगावले. सलामीवीर केएल राहुलने ४७ चेंडूत तीन चौकार व एक षटकार लागवत ५५ धावांची खेळी केली. त्यांच्या व्यतिरिक्त डेव्हिड मिलर ६ व ख्रिस गोल ५ धावा करून बाद झाला. मयंक अग्रवाल खातेही उघडू शकला नाही.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून १६० धावा केल्या. चेन्नईतर्फे फाफ ड्युप्लेसिसने सर्वाधिक ५४ धावा केल्या. त्याने ३८ चेंडूंच्या आपल्या खेळीत २ चौकार व ४ षटकार ठोकले.
चेन्नईने डावाला चांगली सुरुवात केली. सलामीवीर शेन वॉट्सन (२६) व ड्युप्लेसिसने पहिल्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. चेन्नईला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती मात्र पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने तीन गडी बाद करत चेन्नईच्या धावांवर अंकुश लगावला व मोठी धावसंख्या करू दिली नाही.
अश्विनने वॉट्सनला ८व्या षटकात बाद करत सलामी जोडीची भागीदारी संपवली. मात्र ड्युप्लेसिस एका बाजूला धावा करत होता. अर्धशतक पूर्ण होताच ड्युप्लेसिसही बाद झाला. अश्विनने ड्युप्लेसिसला बाद केले. चेन्नईने ड्युप्लेसिसला १०० धावांवर गमावले. ड्युप्लेसिस तंबूत परतताच अश्विनने पुढच्याच चेंडूत सुरेश रैनाला (१७) माघारी पाठवले.
लागोपाठ दोन गडी बाद झाल्यामुळे चेन्नईला १५० ही धावसंख्याही कठीण वाटत होती, मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ३७) व अंबाती रायडूने (नाबाद २१) चौथ्या गड्यासाठी ६० धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला सन्माननक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. धोनीने २३ चेंडूंच्या आपल्या खेळीत चार चौकार व एक षटकार लगावला. रायडूने १५ चेंडूंचा सामना करताना एक चौकार व एक षटकार मारला. अश्विनव्यतिरिक्त पंजाबचे इतर गोलंदाज गडी बाद करू शकले नाहीत.