स्थूलता : एक गंभीर समस्या

मनाचिये गुंती

Story: प्रज्ञा नविन देसाई | 06th April 2019, 11:11 Hrs


-
अापण एक काम करू. जरा बाजारात एका भुसारी किंवा स्वीटमार्टच्या दुकानासमोर उभे राहू व फक्त येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना न्याहाळू. त्यातील बारीक, शिडशिडीत व्यक्ती किती व लठ्ठ किती या निकर्षावर जर अापण त्यांना पाहिले ना तर लक्षात येईल की लठ्ठ व्यक्तीच जास्त दिसतात आजूबाजूला! असे कसे बरे?
अाता लठ्ठपणा हा कधी मानसिक अाजार अजिबात नाही. पण, एक मात्र सर्वांना मान्य करावे लागेल की स्थूलत्त्वामुळे अाम्हा माणसांची सामाजिक व शारिरीक कार्यक्षमता खालावते अाणि त्यामुळे शारिरीक अारोग्य गंभीर प्रमाणात ढासळते. म्हणून लठ्ठपणा या विषयावर बोलणे वा लिहिणे हे खाण्यासंबंधी विषयामध्ये महत्त्वाचे मानले अाहे.
पूर्वी खाणारी तोंडे जास्त होती व घरात अन्न कमी. त्यामुळे भरपेट खाण्यापेक्षा उपासमारच जास्त वाट्याला येई, प्रत्येकाच्या. त्यात अंगमेहनतीचे काम. त्यामुळे चरबी चढायचे मार्गच कमी होते अंगावर. गोडधोड तर कधी चुकूनच. तेही सणावाराला. त्यातही गूळ- खोबरे व तांदळाच्या पिठाचे प्रमाण जास्त.
अन् अाताचे चित्र पहा. अन्नधान्याचा घरात उत्तम साठा व खाणारी तोंडे मोजकीच. त्यात जरा घराबाहेर पाऊल ठेवले की इकडे चायनीज, तिकडे मेक्सिकन खाण्याचे गाडेच गाडे. अंगमेहनत दूरच, पण साधे शंभर पाऊले चालणेही जड. त्यात वीकेंडला जेवण हमखास बाहेर. छोट्या- छोट्या गोष्टींचे सेलिब्रेशन. एक दिवसाअाड मैदा व साखरेचा मारा असलेली मिष्टाने. त्यात अापली सर्वांची जीवनशैली बैठी. कुणाच्याही घरातील फ्रीज सहज उघडून बघितल्यास, त्यात एक- दोन गोड पदार्थ सहज अाढळतील. श्रीखंडापासून कॅडबरी, चाॅकलेटपर्यंत. अापण काय खातो. किती खातो, कधी व कुठे खातो यावर हुकुमत गाजवणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. सर्वात अगोदर येते ती अनुवांशिकता. काही व्यक्ती अापल्यापेक्षा दुप्पट जेवतात व असतात चवळीच्या शेंगेसारख्या बारीक. तर काही व्यक्ती बिचाऱ्या. त्यांना साधं पाणी जरी जास्त प्यायलं तरी चढतं ना हो! गंमतीचा भाग सोडा, पण अनुवांशिकता खूप हातभार लावते, अापण स्थुल अाहोत की बारीक हे ठरवण्यात.
अापली संस्कृतीही गोडधोडाला महत्त्व देणारी. सणवार अाले की पात्रशुद्धीला खीर हवीच. त्याशिवाय गोडशे वेगळे. पुरी अाणि कापांशिवाय जेवणात काय मजा अाहे? बरं हे सण एक- दोन? बारा महिन्यांतील चोवीस वारी पक्वान्ने ठरलेलीच. संक्रांतीला गूळपोळी, होळीला पुरणपोळी, पाडवा म्हणजे श्रीखंडपुरी तर चतुर्थी म्हणजे मोदक करंजी....
अापण शहरात रहात असू तर अजून मार खातो बघा. एक तर रस्त्यावरून सरळ चालण्याची सोय नाही. वाटभर रहदारी. त्यात व्यस्त वेळापत्रकामुळे घराइतकेच अापण बाहेरचेही खातो, जेवतो. अापल्यापैकी बऱ्याच जणांना खाण्याचेच व्यसन असते. टेंशन झाले, खा! भूक लागली खा! कंटाळा अाला खा! मित्रपरिवार भेटला खा! पाहुणे अाले खा! वेळ नाही खा! अन् खावेसे वाटले म्हणून खा!!
वजन वाढीमुळे होणारे अाजार ते किती? ब्लड प्रेशर, मधुमेह, हृदयाचे अाजार, स्ट्रोक, संधिवात अन् काही प्रकारचे कॅन्सरही. हे झाले शारीरिक अाजार अन् मानसिक अाजार कुठले सांगू का? उदासीनता इत्यादी! हे अाजार ही स्थुलतेची एक बाजू. दुसरे म्हणजे अापण बऱ्याचजणांच्या चेष्टेचा विषय बनतो ते तर अाहेच. ढब्बू, मोटू, गब्बू, लाडू, ढम्मू, फॅटी, अोबी ही मोठेपणाला दिलेली काही लाडाची टोपणनावे. अशी काहीतरी जादूची छडी किंवा काठी हवी होती, जी फिरवली का अापण पटकन बारीक होऊ शकू. अर्थात असे काही गोडबोले लोक असतात, जे सांगतात की अमुक अौषधे घेतली की पंधरा दिवसात वजन उतरते. काही बेल्टही बाजारात उपलब्ध अाहेत.
खरंतर वजन अाटोक्यात अाणणं ही एक तपश्चर्याच. तप अशासाठी कारण हे काही एक- दोन तासांचे काम नक्कीच नाही. वर्ष, दोन वर्षे चांगली अंगमेहनत घ्यावी लागते. नियमित व्यायाम, खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण या गोष्टींबरोबर जर तितक्याच ताकदीने काय करावे तर मनाचा निग्रह व संयम.
अापल्यापैकी बहुतेक जण असतात अारंभशुर. म्हणजे अापण व्यायाम, पथ्य करतो, चार-अाठ दिवस आणि पुन्हा काही दिवसांनी व्यायाम सोडतो. दामदुप्पटीने खातो. त्यामुळे उतरवलेले वजन नवीन उत्साहाने डबल होते. वजन अाटोक्यात अाणणे हे बुद्धीच्या पातळीवर अापण अगदी पक्के केले पाहिजे. त्याच्या अाड येणारे धोके अाधीच अोळखून त्यापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. न उतता, मातता बारीक होण्याचा वसा राखला पाहिजे. खरं ना?
काही लोकांचे स्थूल हे प्रमाणाबाहेर असते. अशांना व्यायाम अाहाराच्या जोडीला काही अौषधेही घ्यावी लागतात. त्याचबरोबर तर गुण पडला नाही तर स्थूलतेमुळे स्वास्थ्यावर जर अधिकच परिणाम जाणवू लागला तर मात्र क्वचित प्रसंगी पोटाची शस्त्रक्रिया करावी लागते.

Top News

मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका Read more

पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका Read more

चुकीच्या पद्धतीने कर आकारल्याचा कॅसिनो कंपन्यांचा दावा

जीएसटी मंडळासमोर कंपन्यांचे गाऱ्हाणे; पुढील बैठकीत अंतिम निर्णय Read more