गीतरामायण : एक अानंदमयी शांतवन

इंद्रधनुष्य

Story: डाॅ. अमृता इंदुरकर | 06th April 2019, 10:43 Hrs


-
होळी संपताच मराठी मनाला वेध लागतात ते चैत्र महिन्याचे. चैत्र म्हणजे समस्त सश्रद्ध लोकांचा अानंदमहिना. घराघरात मोठ्या उत्साहाने दिनदर्शिकेत डोकावून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे मराठी नववर्षाला प्रारंभ होणारा गुढीपाडवा, कधी अाहे ते बघितले जाते. मनात नववर्षाच्या अानंदाचा अाम्रवृक्ष जसा बहरलेला असतो, तसा या अाम्रवृक्षाला रामजन्मरुपी मंगलमयी सत्- चित्- अानंदाचा मोहरही फुलून अालेला असतो. प्रत्येक संवेदना त्या रामनामाच्या मंद गंधाने दरवळून निघालेली असते. महाराष्ट्रातील प्रत्येकच मंदिराची, घराची मंगल पहाट गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच गीतरामायणाच्या प्रासादिक शब्द-सुरांमध्ये न्हाऊन निघते. जणु काही त्या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत ही महाराष्ट्रशारदा अापल्या कंठात ग. दि. माडगुळकर निर्मित ‘गीतरामायण’ रुपी कौस्तुभमणी धारण करते. या गीतरामायणाने कितीतरी पिढ्यांची सांस्कृतिक घडण घडविली. याची अवीट मोहिनी अशी काही अाहे की,
जोवरि हे जग, जोवरी भाषण
तोवरी नूतन नित रामायण
ही प्रत्येकाचीच प्रचिती अाहे. मराठी माणसाच्या जीवनाचा अादी अाणि अंत या ‘राम’नेच होत असतो. दोन मराठी माणसं भेटतात तेव्हा नकळत तोंडातून ‘राम राम’ म्हणतात तर जेव्हा या जगाचा निरोप घेतात तेव्हाही ‘राम’ म्हणतच प्रयाण करतात. इतके मराठी जीवन राममय अाहे.
मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड अाहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगुळकरांनी अधिक समृद्ध केले. गीतरामायणातील अनुरूप शब्द, त्यांची सुश्लिष्ट रचना, त्या गीतांच्या मधुर चाली, त्यामधील प्रसंगानुकूल भाषाविष्कार अशा सर्वांगसंपन्नतेमुळे ग. दि. माडगूळकर यथार्थाने ‘अाधुनिक वाल्मिकी’ ठरले. अाजचा एकूणच गतीमान काळ बघता, अाजच्या धकाधकीच्या, लगबगीच्या जीवनात लोकांजवळ काय नाही अाहे तर तो म्हणजे ‘वेळ’. मनाची निवांतता देखील वेगळा वेळ काढून प्राप्त करता येत नाही. पण, शेवटी शिणून गेलेल्या मानवी मनाला शांत करणारे. निववणारे तर हवे असते. ज्या अाधुनिक काळात माडगूळकर वावरत होते, त्या काळाची ही व्यक्तीमनांची नाडी त्यांना अचूक सापडली. मग रामायण कथेचा माग घेत एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडूनच गीतरुपाने त्यांनी प्रकट केला. शिवाय गीते ही गाण्यासाठी असल्यामुळे साहजिकच लोकांच्या कंठात बसतात. म्हणूनच की काय माडगूळकरांच्या या गीतांना सुधीर फडके यांच्यासारख्या सूरश्रेष्ठांचा कंठ लाभला. त्यामुळे समस्त महाराष्ट्रातील जनतेला एका गोड शब्दसूर संगमात डुंबत राहण्याचे सहस्रावधी सुख प्राप्त झाले.
गदिमांनी अवघ्या छप्पन गीतांमध्ये रामायण बांधले. हे करीत असताना कथानकावरची पकड कुठेही ढिली होऊ न देता प्रमुख कथाभाग घेऊन प्रत्येक प्रसंगाची शब्दरचना अशी काही श्रुतिमनोहर रुपात करीत अाणि कडव्यांच्या रुपाने त्याचा सौंदर्यपूर्ण विस्तार करीत. गीतरामायणाचा ‘कुश लव रामायण गाती’ या गीताने प्रारंभ करताना पहिल्याच कडव्यात फक्त चारच अोळीत पिता श्रीराम अाणि पुत्र कुश- लव यांचे व्यक्तिचित्रण करतात.
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगति चरित पित्याचे
ज्योतिने तेजाची अारती
पुत्ररुपी ज्योतीने पितारुपी तेजाची अारती करण्याची उपमा केवळ विलक्षण भाव निर्माण करते. गीतरामायणात जवळ-जवळ सर्वच गीतांपासून करूण, वीर, रौद्र, भयानक, हर्ष, अद्भुत रसांचा परिपोष झालेला अाहे. एक राजा म्हणून सर्व काही ऐश्वर्यसंपन्न असताना राजा दशरथाचे पुत्रहीन असणे गदिमा ‘कल्पतरुला फूल नसे का? वसंत सरला तरी’ या सूचकतेने व्यक्त करतात किंवा कौसल्येच्या तोंडी येणारा ‘उगा का काळिज माझे उले। पाहुनी वेलीवरची फुले’ हे उद्गार तिच्या मातृत्वाला पारख्या झालेल्या दु:खाचा सल उजागर करतात. वनवासाला प्रस्थान करताना अत्यंत दु:खी, कष्टी झालेली कौसल्या करूण, व्याकूळ होऊन ‘उंबरठ्यासह अोलांडुनिया मातेची माया। नको रे जाऊ रामराया’ असे म्हणते. शिवाय ‘शतनवसांनी येऊन पोटी। सुखविलेस का दु:खासाठी?’ असा रामालाच प्रश्न करते. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिच्या वियोगाने दु:खसागरात बुडालेले श्रीराम ‘अबोल झाले वारे पक्षी, हरिली का कुणि मम कमलाक्षी?’ असा तेथील लता, अशोक, वृक्ष, नद्या, वन्य मृग या सर्वांना अार्त प्रश्न करतात.
शेवटी जेव्हा लक्ष्मण सीतेला वनात सोडायला येतो, त्यावेळी सीता या वाट्याला अालेल्या दशेचा उल्लेख ‘कठोर झाली जेथे करुणा, गिळी तमिला जेथे अरुणा’ असा करते. कारण मला वनात पाठवणारे माझे पती राघव नाहीत ते केवळ नृपती अाहेत असे म्हणून ‘मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे?’ असे साश्रूनयनांनी विचारते.
विश्वामित्रांच्या तोडून अादेशवजा अालेले ‘मार ही ताटिका’ या गीतांत वीर अाणि भयानक रसाच्या अनुभव येतो. ताटिकेचे वर्णन करताना भयानक रस तर तिला मारताना श्रीरामाच्या ठायी असणारा वीरभाव प्रकट होतो. ‘बांधा सेतू बांधा रे सागरी’ हे गीत तर वीररसाने ओतप्रोत भरलेले गीत ठरले. ‘सेतुबंधने जोडून अोढा समीप लंकापुरी’ असे सर्व वानरगण एकमेकांना म्हणत असताना संपूर्ण स्फूर्तीचे वातावरण निर्माण करतात. भरताला जेव्हा कळते की अापल्याच मातेच्या हट्टामुळे रामाला वनवास पत्करावा लागला त्यावेळी त्याचा संताप अनावर होतो अाणि क्रोधात तो कैकयीला ‘माता न तू, वैरिणी’ असे म्हणतो. क्रोधात तो ‘श्रीरामा ते वल्कल देता का नच जळले हात?’ असा प्रश्न करतो, असे म्हणून सुमंतासह भरत रामभेटीसाठी चित्रकूट पर्वतासाठी निघतो. वनात झाडावर बसून हवेत उडणारे धुळीचे लोट बघून लक्ष्मण अंदाज बांधतो की नक्कीच सेना घेऊन भरत अापल्याशी लढायला येत असणार. त्यावेळी रागाने लाल होत तो ‘भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो, येऊ दे पुढे जरा, कंठनाल छेदतो’ असे म्हणतो.
गदिमांनी गीतरामायणात अानंदही तितकाच पेरला अाहे. कधी या अानंदाचे स्वरुप सात्त्विक तर कधी हर्षोल्हास साजरा करणारे असे अाहे. ‘राम जन्मला ग सखी’ हे गीत तर अानंदाला उधाण अाणणारे अाहे. रामजन्माची अचूक वेळ सांगताना गदिमा ‘दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला’ असे चपखल वर्णन करतात. सर्वत्र इतका अानंद व्यापला की तो सूर्यही दोन क्षण थांबला. हे गीतच असे रचले गेले अाहे की वाचकांच्या डोळ्यांसमोर अापोअापच उत्सवाचे स्वरुप येते.
कौसल्येच्या तोंडून राम मोठा होतानाचे कौतुकौद्गार ‘सावळा गं रामचंद्र’ वाचकाला सात्त्विक अानंद देतात. या गीतात गदिमांची खास शैली दिसते. संस्कृत साहित्य शास्त्रकार मम्मटाचार्य यांनी काव्याचे उद्देश काव्यप्रयोजन सांगताना एक प्रयोजन असे सांगितले अाहे, ते म्हणजे ‘कान्तासम्मिततयोपदेशयुगे’ म्हणजे पत्नी ज्याप्रमाणे पतीला हळूवार असा उपदेश करते तसेच काव्याचेही प्रयोजन असते. ‘सावळा गं रामचंद्र’ मध्ये कौसल्येच्या तोंडून गदिमांनी अगदी अशाच पद्धतीचा उपदेश श्रीरामाचे कौतुक करता करता दिला.
सावळा ग रामचंद्र, करी भावंडासी प्रीत
थोरथोरांनी शिकावी, बाळाची या बाळरीत
गीतरामायणातून निर्माण होणाऱ्या रसास्वादाव्यतिरिक्त यामध्ये मोहक निवेदनशैली, कथेची नाट्याची संपूर्ण जाण व नाट्य उभे करण्यासाठी निवडलेल्या प्रसंगाची चोखबद्ध निवड, गीतातील नाट्य फुलविण्यासाठी असणारी कल्पकता जात्याच गदिमांमध्ये होती. विशिष्ट दृश्यांना परिणामकारक करणारी एक विशिष्ट अशी दिग्दर्शकाची दृष्टी त्यांना होती. कदाचित चित्रपट व्यवसायात असल्यामुळे हा एक तिसरा डोळा त्यांना उपजतच प्राप्त झाला होता. माता कौसल्या, बंधू भरत-लक्ष्मण, दासभक्त हनुमान, भोळीभाबडी शबरी, निष्ठावंत मित्र सुग्रीव अाणि रावणाची कानउघाडणी करून देखील भातृकर्तव्याला जागणारा कुंभकर्ण यांच्यावर अाधारित एकेका गीतांतून गदिमांनी त्या त्या पात्राचे सारे व्यक्तिमत्त्व साक्षात समोर उभे होते. श्रीरामाला नदी पार करतानाचे गुहकाचे तोंडी असलेले गीत असो किंवा सेतू बांधताना वानरगणांच्या तोंडी अालेले गीत एकप्रकारचे सांघिक व्यक्तिमत्त्वच तालामध्ये व्यक्त करते. रावणाने सीतेला पळविल्यानंतर जटायू सोबत होणाऱ्या समरप्रसंगाचे वर्णन कसे काही अाले अाहे की, अापण चित्रपटच बघतो अाहोत की काय इतकी त्यामध्ये जीवंतता अाहे.
प्रेम अाणि पराक्रम, निष्ठा अाणि सौजन्य, त्याग अाणि सहनशीलता यांचे कल्पक दर्शन माडगूळकरांनी गीतरामायणातून घडविले. तेही अतिशय प्रासादिक अाणि चारुतेने युक्त अशा शैलीतून. कोणताही रसिक हे वाचेल किंवा एेकेल तरी दोन्ही रुपानं त्याला तत्काळ अानंदप्राप्ती होईल इतकी या रचनेची रसवत्ता अाहे. म्हणूनच गीतरामायणाबाबत असे म्हणतात की ते कुणी लिहिलेले नाही तर झालेले अाहे, अापोअाप गदिमांच्याही नकळत या रचनांनी जन्म घेतला अाहे.
याबाबतीत काहींना असे वाटू शकते की यामध्ये गदिमांचे श्रेय ते काय? यात असे अपूर्व काय अाहे? कारण मूळ कथानक तर तयारच होते. पण अशांनी एक लक्षात घ्यायला हवे की ही केवळ मूळ कथानकाची उजळणी नाही तर एक स्वतंत्र निर्मिती अाहे. निर्मिती अंतर्गत निर्मिती करून १९५६ पासून ते अाजतागायत रसिकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य केवळ अाणि केवळ ग. दि. माडगुळकर अाणि सुधीर फडके यांनाच जाते. खरेतर रावणाचे निर्दालन करून परतलेल्या राम-सीता कथाकाव्याचा समारोप झाला असता, पण माडगूळकरांनी रामसीतेच्या जीवनात अालेल्या उदात्त वियोगाचा उल्लेख करून सीतामाईचे वनात जाणे येथे हे कथाकाव्य संपते. गदीमांना अापल्या रसिकांना जाता जाता हेच सांगायचे होते की गीतरामायण तर संपले, पण सीतेचे दु:ख मात्र संपले नाही. हे दु:ख समस्त छंद अाणि विरामांच्याही पलीकडले अाहे. कधीही न सरणारे. हा भाव रसिकांच्या मनात रेंगाळत ठेवून गीतरामायणाची समाप्ती होते. पण चैत्रमास कायमचा पुनित होतो!
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more