अंतराळातली ‘शक्ती’ अधोरेखित

विशेष

Story: उर्मिला राजोपाध्ये | 30th March 2019, 11:05 Hrs


-
अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करुन विविध सेवा-सुविधांचं जाळं बळकट करण्याचा प्रयत्न जगातला प्रत्येक विकसित आणि विकसनशील देश करत आहे. दळणवळण, दिशादर्शन, संपर्कयंत्रणेचं सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण बदलाचं निरीक्षण या आणि अशा अनेक कारणांसाठी उपग्रहांकडून मिळणारी माहिती महत्त्वपूर्ण ठरते. मात्र या बरोबरच दुसऱ्या देशांमध्ये हेरगिरी करण्यासाठी, तिथली माहिती टिपण्यासाठीही कृत्रिम उपग्रहांची मदत घेतली जाते. याचं काल्पनिक पण वास्तवाशी साधर्म्य राखणारं चित्रण ‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’ मध्ये बघायला मिळालं होतं. उपग्रहांच्या माध्यमातून अन्य देश दुसऱ्या देशावर नजर ठेवू शकतात. हाच धोका दूर करण्यासाठी भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकलं आहे. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत लो अर्थ ऑरबीटमध्ये कार्यरत असणारा एक उपग्रह पाडण्याची चाचणी घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने आपण मोठी झेप घेतली आहे. राष्ट्राला संबोधून दिलेल्या विशेष संदेशाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही शुभवार्ता दिली तेव्हा देशात उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. हा भारतीय शास्त्रज्ञांच्या, तंत्रज्ञांच्या गौरवाचा क्षण आहे यात शंका नाही. ही कामगिरी अवघ्या तीन मिनिटांमध्ये पार पडली हेदेखील महत्त्वाचं.
‘स्पेस पाॅवर’ वाढली
या कामगिरीमुळे भारताची स्पेस पॉवर वाढली आहे. आत्तापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांकडेच ही क्षमता होती. आता मात्र आपल्याकडे हे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे देश या विकसित देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. अँटी सॅटेलाईट मिसाईलमुळे भारताचा अंतराळातला आवाज बुलंद झाला आहे. अँटी सॅटेलाईटने निर्धारित लक्ष्य असणाऱ्या एका उपग्रहाचा अचूक वेध घेतला आणि संरक्षणदृष्ट्या आपली ताकद अनेकपटींनी वाढल्याचं स्पष्ट झालं. ‘मिशन शक्ती’ हे नक्कीच एक आव्हान होतं. मात्र तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट आविष्कार दाखवत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी ते यशस्वी पद्धतीने स्वीकारलं. या उपलब्धीमुळे आपण शत्रूराष्ट्राचे उपग्रह नष्ट करु शकतो, हा विश्वास मिळाला. युद्धजन्य परिस्थितीत हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण सिद्ध होणार आहे. डीआरडीओ आणि इस्रो या दोन संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमधून ही चाचणी यशस्वी रितीने पार पडली. या परीक्षणामुळे युद्धाची खुमखुमी असणाऱ्या पाकिस्तानलाही जबर संदेश मिळाला असेल. चीन वगळता आशियातल्या कोणत्याही देशाकडे उपग्रह पाडण्याचं असं तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे या खंडातही भारताचा दबदबा वाढला आहे.
उपग्रहांचा वापर
अवकाशात प्रक्षेपित करण्यात येणारे उपग्रह वेगवेगळ्या उंचीवरील कक्षेमध्ये फिरत असतात. ‘लो अर्थ ऑर्बिट’ ही पृथ्वीपासून सर्वात जवळची कक्षा आहे. लो अर्थ ऑर्बिटचा वापर टेलीकम्युनिकेशन उपग्रहांसाठी केला जातो. अंतराळातली ही कक्षा पृथ्वीपासून १२०० मैल म्हणजे जवळपास दोन हजार किलोमीटर उंचीवर असते. या कक्षेत लो ऑर्बिट सॅटेलाईट कार्यरत असतात. टेलिकम्यूनिकेशनशी संबंधित कामांसाठी वापरले जात असल्यामुळे या उपग्रहांमार्फत ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पेजिंगच्या सेवा सुकर होतात. हे उपग्रह अत्यंत वेगाने निर्धारित कक्षेत परिक्रमा करत असतात. ते कधीच एका जागी स्थिर नसतात, त्यांची जागा सुनिश्चित नसते. एलईओ आधारित टेलिकम्युनिकेशनचा वापर प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये केला जातो. ‘मिशन शक्ती’ साठी ए-सॅट मिसाईलचा वापर करताना लक्ष्य म्हणून भारताने लाईव्ह सॅटेलाईटची निवड केली. त्यामुळे हा उपग्रह आपल्या कक्षेत वेगाने फिरत होता. अचूक नेम धरुन तो पाडण्यासाठी वेळेचं गणित तंतोतंत जमावं लागतं. सेकंदाच्या एखाद्या भागाचा हिशेब चुकला तरी मिशन असफल होण्याचा धोका असतो. मात्र भारतीय शास्त्रज्ञांनी कोणतीही चूक न करता हे परीक्षण यशस्वीरीत्या पार पाडून आपली क्षमता दाखवून दिली आहे.
प्रगत प्रणाली
पंतप्रधानांनी देशाला अर्पित केलेली आणि स्वदेशात विकसित केलेली अँटी सॅटेलाईट सिस्टीम ही अत्यंत प्रगत प्रणाली आहे. ए-सॅट हे उपग्रहभेदक क्षेपणास्त्र भारताच्या मारकशक्तीचं दर्शन घडवणारं आहे. ए-सॅट हे अंतराळात वापरलं जाणारं एक हत्यार आहे. रणनीती आखून सैन्यातल्या हालचाली टिपण्यासाठी उपयोगात येणारे शत्रूचे उपग्रह नष्ट करण्यासाठी या हत्याराचा उपयोग केला जातो. अमेरिकेने १९५० मध्ये अशा प्रकारचं क्षेपणास्त्र विकसित केलं होतं. १९६० मध्ये रशियाने ते विकसित केलं. त्यानंतर १९६३ मध्ये अमेरिकेने जमिनीवरून अंतराळात सोडता येण्याजोग्या परमाणू क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आणि हा विस्फोट घडवून आणला. मात्र या विस्फोटामुळे अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या काही उपग्रहांचं नुकसान झालं. त्यानंतर १९६७ मध्ये आऊटर स्पेस ट्रीटीअंतर्गत अंतराळात कोणत्याही प्रकारचं विस्फोटक तैनात न करण्यासंबंधी एकमत झालं. त्यामुळे अद्याप कोणीही त्याचा वापर केलेला नाही. मात्र गरज पडली तर अथवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास वरील तीनही देश आपल्याकडच्या या शक्तीचा वापर करु शकतात.
इस्रायलही ए- सॅटमध्ये व्यस्त
भारताबरोबर आता इस्राईल ए-सॅटच्या निर्मितीत व्यस्त आहे. या देशाकडे हे हत्यार विकसित करण्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. इस्रायलकडे एरो ३ अर्थात हत्ज ३ नामक अँटी बॅलेस्टिक मिसाईल्स आहेत. तज्ज्ञांच्या मते, वेळ पडली तर ती अँटी सॅटेलाईटप्रमाणे वापरता येऊ शकतात. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे अमेरिकेची ८० टक्क्यांपेक्षा अधिक कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन सिस्टीम सॅटेलाईटच्या आधारे चालते. या उपग्रहांच्या माध्यमातूनच ते जगावर लक्ष ठेवून असतात. मात्र चुकीच्या हेतूनेही याचा वापर होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळेच आपला देश असे उपग्रह पाडण्यास उपयुक्त असणाऱ्या यंत्रणेने सज्ज असणं ही मोठी उपलब्धी म्हणायला हवी.
कमालीची गुप्तता
या यशस्वी चाचणीमुळे जल, आकाश आणि जमीनीबरोबरच आता भारत शत्रूच्या अंतराळातल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासही सक्षम झाला आहे. यापूर्वी पोखरण येथे परमाणु परीक्षण केलं गेलं होतं. ते ‘ऑपरेशन शक्ती’ नावाने ओळखलं गेलं. या धर्तीवर या मिशनला ‘मिशन शक्ती’ हे नाव देण्यात आलं. ऑपरेशन शक्तीच्या वेळीही कमालीची गुप्तता पाळली गेली होती आणि आताही अत्यंत सावध रहात आणि गोपनीयता राखत हे मिशन पार पडलं. ‘मिशन शक्ती’साठी देश २०१२ मध्येच सिद्ध होता. मात्र तेव्हा असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आता मात्र सामर्थ्य सिद्ध करत भारताने ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करुन दाखवली. या परीक्षणामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं अथवा कराराचं उल्लंघन झालं नसून याचा उपयोग १३० कोटी देशवासियांच्या सुरक्षा आणि शांततेसाठी केला जाईल, हे पंतप्रधानांचं आश्वासनही दखल घेण्याजोगं आहे.
महासत्ता बिरुदावलीस पात्र
भविष्यकाळातली स्थिती लक्षात घेऊनही ‘मिशन शक्ती’ चं महत्त्व प्रकर्षाने जाणवतं. आजच्या घडीला बहुतेक सगळ्या विश्लेषक आणि रणनीतीकारांचं मत आहे की, स्पेस वॉर जिंकण्याची ताकद असणारा देशच यापुढे विश्वावर हुकूमत गाजवू शकेल. हे ब्रह्मास्र असणारा देशच ‘महासत्ता’ ही बिरुदावली मिरवण्यास पात्र असेल. कारण भविष्यात तोफा आणि बंदुकांनी युद्धं लढली जाणार नाहीत आणि जिंकताही येणार नाहीत. भविष्यातलं युद्ध जिंकण्याच्या संदर्भात बोलायचं तर अंतराळावर वरचष्मा राखणारा देशच जगात शिरजोर होईल. या दृष्टीने पाहता भारताने मिशन शक्तीच्या निमित्ताने उचललेलं पाऊल महत्त्वपूर्ण म्हणायला हवं.
सध्या दूरसंचार, जीपीएस नेविगेशन, हवामानाचे संकेत, सैन्याला माहिती पुरवणं आदींपासून अगदी मनोरंजनासाठी टीव्ही वाहिन्या, वीजपुरवठ्याच्या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यासारख्या तमाम बाबी उपग्रहांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात अथवा नियंत्रित आणि प्रवाहित केल्या जातात. हे लक्षात घेता युद्धजन्य अथवा तणावाच्या स्थितीत शत्रूराष्ट्राच्या उपग्रहावर हल्ला चढवल्यास तिथलं जनजीवन किती प्रभावित होईल, याचा विचार केलेला बरा. एक प्रकारे या माध्यमातून त्या राष्ट्रावर अंकुश ठेवणं शक्य होणार आहे. या हल्ल्यामुळे त्यांचे सगळे गोपनीय कोड लॉक होतील. म्हणजेच लढाऊ विमान अथवा दारुगोळ्याचा वापर न करताही शत्रूराष्ट्राला जेरीस आणणं या एका क्षेपणास्त्रामुळे शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ‘मिशन शक्ती’अंतर्गत भारताने केवळ उपग्रह पाडणारी क्षेपणास्त्रं बनवली नसून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पकडणाऱ्या तंत्रज्ञानाचाही आधार तयार केला आहे. आता या आधारावर पुढील संशोधनास दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
(लेखिका विज्ञान, तंत्रज्ञान जाणकार आहेत.)
------------------
असा झाला लक्ष्यभेद
* पृथ्वीच्या खालच्या कक्षेतल्या गतिमान उपग्रहाला लक्ष्य बनवण्यात आलं.
* तीन टप्प्यात काम करणारं बीएमडी इंटरसेप्टर मिसाईल तैनात करण्यात आलं.
* जमिनीवरील रडार यंत्रणेने उपग्रहाची ओळख पटवली.
* रडारने या उपग्रहावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.
* लाँचरमध्ये क्षेपणास्त्र लाँच करण्यात आलं.
* त्यानंतर क्षेपणास्त्राचा प्रवास सुरू झाला आणि नंतर त्याने स्वत:च प्रवासातले विविध टप्पे पार केले.
* रडारकडून क्षेपणास्त्राला दिशादर्शन होत राहिलं.
* अखेर ३०० किमी. उंचीवरील उपग्रहाचा वेध घेतला गेला. अवघ्या तीन मिनिटांमध्ये क्षेपणास्त्राने लक्ष्यभेद करत अंतरिक्षात भारताचा आवाज बुलंद केला.

Top News

मंत्रिपदांच्या दुरुपयोगामुळेच गोवा फॉरवर्ड, खंवटेंना वगळले : लोबो

पर्रीकरांच्या समाधीस्थळाचा गैरवापर केल्याचीही टीका Read more

पाठिंबा मागे, विरोधात बसणार : सरदेसाई

गोवा फॉरवर्डसह अपक्ष खंवटेंचा एल्गार; पर्रीकरांची विचारधारा संपवल्याची टीका Read more

चुकीच्या पद्धतीने कर आकारल्याचा कॅसिनो कंपन्यांचा दावा

जीएसटी मंडळासमोर कंपन्यांचे गाऱ्हाणे; पुढील बैठकीत अंतिम निर्णय Read more