सागर : रोजगाराचे आगर

कव्हर स्टोरी

Story: प्रा. रामदास केळकर |
30th March 2019, 11:03 am
सागर : रोजगाराचे आगर


---
वर्षाचे ३६५ ही दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस असले तरी यातील काही दिवसांना जगाच्या तसेच राष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्व दिलेले आहे. कारण त्या निमित्ताने तरी त्या दिवसाच्या महत्त्वाची उजळणी व्हावी आणि त्यानुसार आपली पावले पडावीत. ५ एप्रिल हा समुद्राशी निगडित महत्वाचा दिवस असून तो ‘मेरिटाईम डे’ म्हणून देशभर सन्मानाने साजरा केला जातो. कुठलाही दिवस साजरा करण्यासाठी तसेच कारणही असते. बरोबर या दिवशी १९१९ साली एस. एस. लॉयल्टी हे सिंदिया कंपनीचे जहाज इंग्लंडला जलमार्गाने गेले आणि हे अशावेळी घडले जेव्हा सागरी मार्गावर ब्रिटिशांची हुकूमत होती. या निमित्ताने एक ध्येयवाक्य जाहीर केले जाते. गेल्यावर्षी ‘इंडियन शिपिंग : संधीचा महासागर’ असे होते. १९६४ साली हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आयोजकांतर्फे वरुण पुरस्काराने शिपिंगशी निगडीत निवडलेल्या व्यक्तीचा गौरव करण्यात येतो. आपल्या देशातील एका कंपनीच्या जहाजाने इंग्लंडला जहाजमार्गे कूच केले व सागरी भ्रमणाची सुरुवात झाली. त्या पूर्वी समुद्रमार्गे भ्रमण करणाऱ्यांत परदेशी दर्यावर्दींचे योगदान होते. सातासमुद्रापलीकडे जाणे म्हणजे काहीतरी वाईट, पाप आहे, अशी पूर्वी समजूत होती. त्यामुळे आपले सागर भ्रमण लक्षणीय प्रमाणात होऊ शकले नसावे. पण, ब्रिटिश काळात अशा अनेक गोष्टी आपण स्वीकारत गेलो. म्हणून तर आपले राजकीय पुढारी तसेच अन्य देशप्रेमी स्वातंत्र्य लढ्यात येण्यापूर्वी जलमार्गे शिक्षणासाठी परदेशी गेले.
गोव्यात सागरी मार्गे उदरनिर्वाहासाठी कूच करण्यात ख्रिश्चन मंडळी अग्रस्थानी होती. सी-मॅन म्हणून दक्षिणेतले अनेक तरुण जहाजावर आजही काम करत आहेत. आता तर केंद्र सरकारने त्यांच्या शिक्षणाबाबत शिथिलता आणलेली आहे. गोव्यातून अन्य राज्यांना जोडण्यासाठी हवाई, रस्ता, रेल्वे असे मार्ग होते. यात आता जहाज मार्गाची भर पडलेली आहे. पूर्वी गोव्यातील खाण कंपन्या खनिज माल वाहतुकीसाठी मुरगाव बंदराचा उपयोग करायचे. गोवा सरकार प्रवाशांची ये- जा करण्यासाठी फेरीबोटचा वापर करत आले आहे. तर पर्यटकांसाठी जलसफर आयोजित करण्यात पर्यटन खात्याच्या तसेच कॅप्टन ऑफ पोर्ट्सच्या परवानगीने खाजगी बोट चालकही अग्रक्रमावर आहेत. करियरच्या दृष्टीने जलमार्ग हे संधी देणारे व्यापक क्षेत्र आहे.
आजकाल जलमार्गाचा उपयोग व्यापारी व्यवसाय, पर्यटकांना ने-आण करणे, खनिज माल, उत्पादनासाठी लागणारा माल, तयार माल यांची आयात- निर्यात करण्यासाठी केला जातो. या शिवाय नौदल आपल्या सर्वाचे रक्षण करण्यासाठी. पाणबुडे, मच्छीमार यांनाही समुद्र जवळचा असतो. जलमार्ग हा नेहमीच अन्य वाहतुकीच्या तुलनेने परवडणारा मार्ग आहेच. शिवाय प्रदूषणाच्या बाबतीत पर्यावरण मित्र असलेला मार्ग आहे. आता समुद्रात प्लॅस्टिक व अन्य कचरा आढळतो तो मानवी हलगर्जीचा परिणाम आहे.
विश्वातील ८० टक्क्यांहून जास्त भाग, हा पाण्यानेच भरलेला आहे. याचे आकर्षण मानवाला कधीपासूनचे आहे. प्रवासासाठी नसला तरी व्यापारासाठी या मार्गाचा वापर कित्येक वर्षे होत आहे. पोर्तुगीजांचे कालिकत तसेच गोव्यातले आगमन जलमार्गानेच होऊ शकले. या समुद्राच्या मार्गावरच जहाजांना सोयीची व्हावीत, म्हणून अनेक लहान- मोठी बंदरे आहेत. डझनभर मोठी तर २०० छोटी. त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. त्यातून लाखोंना प्रत्यक्ष व तेवढ्याच संख्येने अप्रत्यक्ष रोजगार येणाऱ्या काळात मिळणार आहे. आता तर परदेशी गुंतवणुक करायलाही सरकारने परवानगी दिल्याने जहाज क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आले आहेत. या प्रमुख बंदरामध्ये कांडला, न्हावा शेवा, मुंबई, मुरगाव, पनंबुर, कोचिन, पोर्ट ब्लेअर, टुटिकोरीन, चेन्नई, विझाग, पारादिप, हलदिया, विशाखापटणम आदिंचा समावेश आहे. आपल्या देशाला ७५१६.६ किमी एव्हढी किनारपट्टी लाभली आहे. समुद्र आपल्याला अनेकदृष्टीने मदत करत असतो. अन्न, खनिज, ऊर्जा, ताजे पाणी आणि प्राणवायू तर आपल्याला मिळतोच. शिवाय समुद्र हवामानाचे नियमन आणि किनारपट्ट्याचे संरक्षण करतो.
करियरमध्येही त्याला अपवाद नाही. सागरी किनारा म्हणजे करियरची उत्तम संधी. जहाजे व समुद्री नौका बनविणे, त्याची दुरुस्ती, देखभाल करणे, डेकवरील सेवा देणारे कर्मचारी, खलाशी, इंजिनची देखभाल करणारे अभियांत्रिक आदी मनुष्यबळाची सातत्याने गरज असते. याशिवाय बंदरातील कामे करण्यासाठी विविध कर्मचाऱ्यांची गरज लागत असते. लॉजिस्टिक्समध्ये याची माहिती दिली जाते.
युवक ज्या करियरमध्ये आकर्षित होतात, त्यातले प्रमुख क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही. यात जगभर भ्रमंती करायला मिळते. भरपूर सुट्या, युवा वयातच सर्वाधिक पॅकेज मिळण्याची संधी मिळू शकते. जहाजावरील इंजिन विभागाशी संबधित मरीन इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात तुम्हाला विविध यांत्रिक तसेच विद्युत उपकरणांची देखभाल करण्याची माहिती मिळते. यात मुख्य इंजिन, ब्रॉयलर, जनरेटर्स, रेफ्रिजरेशन, विविध पंप आदींचा समावेश असतो. या विभागात मुख्य अभियंता, क्लास टू अभियंता, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अशी टीम काम करत असते. मरीन इंजिनिअर व्हायचे असेल तर बी. टेक. किंवा जी. एम. इ. या मार्गाने होऊ शकता. बी. टेक. साठी तुम्ही बारावी विज्ञाननंतर हा चार वर्षांचा अभ्यासक्रम करू शकता. अर्थात प्रवेश परीक्षा द्यावीच लागते. नंतर प्रशिक्षण घेऊन मुख्य अभियंता बनत येते. मॅकेनिकल इंजिनिअरिंगनंतर दीड वर्षांचा पदवी मरीन इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम आहे. यात संस्थेत व प्रत्यक्ष जहाजावर प्रशिक्षण असे स्वरूप आहे. शिपिंग कंपन्यांद्वारे संचलित संस्थेतून बी. एस. सी. नॉटिकल सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करूनही जहाजावर जात येते.
साहसी खेळात आता समुद्राचा चांगला उपयोग करण्यात येतो. यात पेराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंगचा समावेश आहे. यात समुद्राच्या पाण्यात तुम्हाला चालविले जाते. सोबत हवेची टाकी, जाकीट दिले जाते आणि हे चालणे सुरक्षित ठिकाणी केले जाते. पेरा ग्लायडिंगमध्ये ग्लायडर बोटीला बांधले जाते आणि आपण हवेत उडण्याचा अनुभव घेतो.
गोव्यात बोगदा- वास्को येथील शिपबिल्डींग ही अभियांत्रिकी संस्था जहाजाशी संबंधित डिप्लोमा कोर्सेस देते. अधिक माहितीसाठी http://www.isbt.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. इथल्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण संचालनालय, पर्वरी येथून प्रवेश प्रक्रिया केली जाते. वास्कोतच इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज ही संस्था मरीन क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी जे कोर्सेस चालवते. विशेष म्हणजे या संस्थेची प्लेसमेंट कामगिरी उत्तम आहे. http://imsgoa.org/ या संकेतस्थळाला माहितीसाठी जरूर भेट द्या.
मर्चंट नेव्हीत जाणाऱ्यांसाठी गोव्यातील आणखी एक संस्था म्हणजे नूसी अकादमी, सुकळडे- चिंचिणी सासष्टी (फोन ०८३२-२७७३८५९/ २७७४६८१/ २७७३८६१). याशिवाय वास्कोतील एमईएस कॉलेजमध्ये लॉजिस्टिक हा जहाज क्षेत्राशी निगडित कोर्स शिकवला जातो. त्याची माहिती तुम्हाला http://www. mescollege.org/ind या संकेतस्थळावर मिळू शकेल. आपल्या देशात शिपिंग काॅर्परेशन ऑफ इंडिया, इंडियन स्टीमशिप सारख्या अनेक जहाज कंपन्या आहेत. या व्यवसायात आशिया खंडात तर आपण जपाननंतर स्थान पटकावून आहोत. केवळ माल वाहतूकच नव्हे तर प्रवासी जहाजावर देखील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता सातत्याने लागत असते.
www.joinindiannavy. gov.in या संकेतस्थळावरून नौदलातील संधी तुमचा सागराशी संबंध आणू शकते. इथे वेतन घसघशीत मिळत असले तरी तुम्हाला जहाजावर अनेक महिने काढावे लागतात. त्यामुळे केवळ निरोगी असून भागत नाही तर सागरी हवामानाशी टक्कर देणारी दणकट आणि धडधाकट शरीरप्रकृती असायला हवी.
शारीरिक अपंगत्व, मानसिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींना इथे नोकरी करणे कठीण जाऊ शकते. मर्चंट नेव्हीत तर अशांना स्थान नसते. खालच्या वर्गातील उमेदवारांना पडेल ती कामे करावी लागतात. ‘होम सिकनेस’ असणाऱ्यांनी तर या क्षेत्राचा विचारही करू नये. पण, नोकरी करण्याची तुमची हिंमत असेल तर आर्थिकदृष्ट्या भक्कम असे हे क्षेत्र. अर्थात संधी उत्तम आहेत आणि नेहमी मागणी देणारे क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जाते. सुदैवाने गोव्याला १०५ किमी किनारपट्टी असल्याने या क्षेत्राकडे युवक- युवतींनी जरूर जाण्याचा प्रयत्न करावा. संकेतस्थळे शिवाय परिचयातील दर्यावर्दी उमेदवाराकडूनही माहिती घ्यायला विसरू नका.