केवळ स्वार्थाचे राजकारण...

परामर्श

Story: अभयकुमार वेलिंगकर | 30th March 2019, 11:02 Hrs


-
‘मगोला खिंडार’ ही या सप्ताहातील बहुतेक सर्व वर्तमानपत्रांमध्ये आलेली बातमी वाचून जराही आश्चर्य वाटले नाही. तसे ते कुणालाही वाटू नये. कारण नव्या सरकारच्या स्थापनेवेळीच मगोचे दोन आमदार फुटणार, याची कुणकुण कानी आली होती. एका महत्त्वाच्या क्षणी आपल्या पुढार्‍याशी आपला संपर्क होऊ शकत नाही, असे कोणी सांगतो त्याचवेळी काहीतरी शिजतंय, याचा वास येतो. ‘सुदिन ढवळीकर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत,’ असे सरकार स्थापनेच्या वेळी एखाद्या आमदाराने सांगणे याच्यातच सगळे काही आले, असेच म्हणावे लागेल.
याचा अर्थच असा की ‘आमचं काय? आम्हाला काही मिळेल की नाही? या प्रश्‍नाचे उत्तर द्यायची वेळ येऊ नये म्हणून फोन बंद ठेवण्यात आलाय’, हे कोणीही सांगेल. म्हणजेच आजपर्यंतच्या प्रथेप्रमाणे जे काय फायदे मिळवायचे ते आपल्यासाठीच आणि बाकीच्यांनी आपल्या मागे फरफटत यावे, हीच यांची अपेक्षा. अशावेळी पक्षाला खिंडार पडले तर त्याला जबाबदार कुणाला धरायचे?
खरे तर या फुटीला सर्वस्वी जबाबदार धरायचे झाल्यास, पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनाच धरावे लागेल. जेव्हा पक्षाचे आमदार पक्ष सोडू पाहताहेत, याची कुणकुण लागल्यावर त्यांना काहीही करून धरून ठेवायचे असते. कितीतरी पक्षांनी, आजपर्यंत जराही शंका आली की आपल्या आमदारांना कुठल्यातरी हॉटेलांत बंदिस्त ठेवलेलं आम्ही पाहिलं आहे. पण, इथे पक्षाध्यक्षांनी तसे न करता आगीत तेल ओतण्याचे काम केले. आम्ही तीन मंत्रिपदे आणि तीन महामंडळे मागितली होती, तरी ती दिली नाहीत म्हणून मी युतीआड निवडणुकीत उतरलो असे त्यांनी (दीपक) म्हणणे कुणाला पटेल? सरकार स्थापन झाले केव्हा आणि शिरोड्यात मगोचा प्रचार सुरू झाला केव्हा, याचा अंदाज घेतल्यास दीपक किती खरे बोलत आहेत, याचा प्रत्यय येईल.
जर तीन मागितली होती तर दोनच मंत्रिपदे मिळाली असताना सरकारला पाठिंब्याचे पत्र दिलेच कसे? याबद्दल दीपकराव काहीच बोलत नाहीत. कारण दीपक पाऊस्कर यांना काही मिळाले अथवा नाही याचे अध्यक्षांना काहीच देणंघेणं नाही. त्यांना फक्त आपल्या बंधुराजांना काय मिळणार, तेवढंच पहायचं होतं आणि जमलंच तर स्वत:साठी एक महामंडळ. समजा त्यांना एखादं महामंडळ दिलं असतं तर त्यांनी पाऊस्करांची पर्वा केली असती का? उत्तर ‘नाही’ असंच मिळेल. नाहीतर तीन महामंडळे कुणासाठी होती, हे त्यांनी जाहीररीत्या सांगायला हवं. आणि त्यांना स्वतःला महामंडळ मिळाले असते तर कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडून ते शिरोडा मतदारसंघातून मागे हटले असते का?... की नाही? हेही स्पष्ट करावे.
समजा, मागितल्याप्रमाणे त्यांना स्वत:साठी एखादे महामंडळ दिले असते तर ते पाऊस्करांसाठी अडून बसले असते का? अर्थांत नाही. मागच्यावेळी लवू मामलेदारांना ताटकळत ठेवून स्वत:च सत्तेची मलई लाटली नव्हती का? शेवटी स्वार्थ महत्त्वाचा असतो आणि तो साधण्यासाठीच तर त्यांनी आपले नाटक चालू ठेवले होते..... आणि त्यांत त्यांनी स्वत:च्या भावाचाही बळी दिलाय, असेच म्हणावे लागेल. खरेतर दोन्ही भावांनाच स्वार्थी म्हटले पाहिजे. दुसर्‍यांना वापरून घ्यायचे आणि सोडून द्यायचे, हेच तर त्यांचे आजवरचे तत्त्व. तसे जर नसते तर स्वतःला उपमुख्यमंत्रीपद मिळाले नाही तरी चालेल, पण तीनही आमदारांना मंत्रिपद द्या, असा हट्‌ट त्यांनी धरला असता. पण नाही, काय ते स्वतःसाठी मिळवायचे ही वृत्ती. मग फुटलेल्या आमदारांना कसा काय दोष द्यायचा?
मगोचे दोन आमदार फुटले हे ठीक आहे, पण त्यांनी आणि भाजपानेही थोडी घाई केली असे वाटतेय. घाई फुटण्याची नाही तर विलिनीकरणाची. मगो आणि विलिनीकरण यांचा जन्मापासूनचा संबंध, हे वेगळे सांगायला नको. मगोचा जन्मच मुळी गोव्याच्या विलिनीकरणासाठी झालेला. सार्वमत झाले आणि विलिनीकरणवाद बाजूला पडला, तेव्हाच या पक्षाचे विसर्जन व्हायला हवे होते. पण, तसे न होता पक्ष राहिला आणि केव्हातरी परत या प्रश्नाला, विषयाला चालना मिळेल या विचाराने विलिनीकरणवादी मगोला मत देत राहिले. जेव्हा गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला तेव्हातरी मगोतून ‘महाराष्ट्रवाद’ जायला हवा होता. पण नाही. तसं काही घडलं नाही आणि म्हणूनच असावे कदाचित, या पक्षातील आमदारांना कुठेतरी विलीन व्हायला आवडू लागले. मध्ये खुद्द पक्षच दुसर्‍या पक्षात विलीन होता होता राहिला. आणि आता दोनतृतीयांश पक्ष विलीन झाला.
आता पुढे काय होईल, ते दिसून येईलच. पण, भाजपाने या दोघांना (बाबू आजगावकर व दीपक पाऊस्कर) स्वत:मध्ये विलीन न करता मगो (बाबू) अथवा दुसर्‍या एखाद्या नावाने पक्ष जिवंत ठेवला असता आणि मगोची दोन छकले निवडणूक होईपर्यंत ठेवली असती तर ते भाजपाच्या फायद्याचे ठरले असते. ‘सिंह’ चिन्हावर या दोघांना दावा करता आला असता. लवू मामलेदार व पक्षातील असंतुष्ट कार्यकर्त्यांना जवळ करता आले असते. मगोच्या उमेदवारांना सिंह चिन्हाचा वापर करण्यापासून अडवता आले असते. पण, या दोघांना सरळ आपल्यात विलीन करुन घेऊन भाजपाने फार मोठी चूक केली आहे, असे या क्षणी तरी वाटते. पुढे काय होईल ते होवो. कळेलच म्हणा ते. पण, पुन्हा एकदा मगो पक्ष हा दुसर्‍या पक्षांना आमदार पुरवणारा ठेकेदार ठरला आहे, हे सत्य!
बाबू आणि दीपक दोघांनाही बढती मिळाली. पण या होमकुंडात बळी गेले, बिचारे लवू मामलेदार. त्यांची आठवण या दोन्ही मंत्र्यांनी ठेवली म्हणजे मिळवलं.
(लेखक निवृत्त अभियंते, साहित्यिक आहेत.)

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more