चांगले उमेदवार मिळाल्यास अन्य मतदारसंघातही पोटनिवडणूक लढू

मगोकडून भूमिका स्पष्ट; निवडणूक न लढल्यास पक्षाचेच नुकसान


22nd March 2019, 03:21 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
फोंडा :
शिरोडा मतदारसंघाबरोबर रिक्त असलेल्या अन्य मतदारसंघातही पोटनिवडणूक लढवण्याबाबतची आपली भूमिका मगो पक्षाने स्पष्ट केली आहे. अन्य मतदारसंघात पोटनिवडणूक न लढवण्यास पक्षाचे नुकसानच होईल. त्यामुळे चांगले उमेदवार ​मिळाल्यास मांद्रे, म्हापसा व पणजीत निवडणूक लढवली जाईल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण शिरोडा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणारच, असे त्यांनी म्हटले आहे. दीपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघातून माघार घेतली नाही, तर भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांना ही पोटनिवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. मगोचे नेते सुदिन ढवळीकर हे भाजप आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी असल्याने दीपक ढवळीकर हे माघार घेणार अशी अफवा पसरली आहे. मात्र आता दीपक ढवळीकर यांच्यावर शिरोडा मतदारसंघातील मतदार आणि केंद्रीय समितीने निवडणूक लढण्याचा दबाव टाकल्याने आणि जिंकण्याची खात्री दिल्याने राजकीय घडामोडी बदलू लागल्या आहेत.
दीपक ढवळीकर यांनी शिरोड्यातून माघार घेतली, तर त्यांचे आणि पक्षाचेही नुकसान होईल. शिरोड्यातून लढलो नाही, तर मंत्रिमंडळात टिकून राहण्यासाठी ढवळीकर बंधू तडजोड करीत आहेत, असा लोकांचा समज होईल. ही धारणा बदलण्याची गरज आहे, असे मगोचे सरचिटणीस लवू मामलेदार म्हणाले.
लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मगोला फारच थोडा वेळ मिळत आहे. उत्तर व दक्षिण गोव्यामध्ये आमचे मतदार आहेत. सध्या आमच्याकडे उमेदवारांची निवड करण्यासाठीही वेळ नाही; परंतु शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते, असेही मामलेदार यांनी स्पष्ट केले.

शिरोडा मतदारसंघातून दीपक ढवळीकर विजयी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्रीय समितीने शिरोडा आणि इतर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा ठराव घेतला होता. पक्षाला पणजी, म्हापसा आणि मांद्रे येथे चांगले उमेदवार मिळाले, तर तेथे देखील पक्ष निवडणूक लढवेल.
लवू मामलेदार, सरचिटणीस, मगो.