लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवू

मगोचे जेष्ठ नेते एकनाथ नागवेकर यांचा इशारा


22nd March 2019, 03:21 am


प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा :
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा या मातीतला पक्ष आहे. बहुजन समाजाच्या आधारावर या पक्षाने ५८ वर्षे आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे. मगो पक्षाचे आमदार फोडण्याचा घाणेरडा प्रयत्न भाजपने करू नये. तसा प्रयत्न केल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत मगोचे कार्यकर्ते त्यांना धडका शिकवतील, असा इशारा कळंगुट मतदारसंघातील मगोचे जेष्ठ नेते एकनाथ नागवेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
मगो पक्षाची स्थापना श्री श्री देवी म्हाळशेच्या आशीर्वादाने झाली आहे. गोव्यातील सगळ्या देवींचे वाहन असलेले सिंह या पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळे या पक्षाला या भूमित निश्चित गतवैभव प्राप्त होईल. मगोने मुक्तीनंतर सतरा वर्षे राज्य केले. बहुजन समाजाला ताठ मानेने जगायला शिकविले. गोव्याच्या इतिहासात अनेक प्रादेशिक पक्ष संपलेले आहेत आणि आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तीने मगो पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, ते या मातीत गाडले गेले. तमाम गोमंतकीयांना या इतिहासाची जाणीव आहे, असेही नागवेकर यांनी म्हटले आहे.
येत्या दि. २३ एप्रिलला राज्यात दोन लोकसभा व पणजीसह चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांपूर्वी भाजपने मगोच्या उमेदवारीवर निवडून आलेले पर्यटनमंत्री बाबू आजगावकर व आमदार दीपक प्रभू पावसकर यांना फोडण्याचे षडयंत्र रचले आहे, ते षडयंत्र बहुजन समाज आणि स्व.भाऊसाहेब बांदोडकरप्रेमी या निवडणुकामध्ये भाजपच्या विरोधात मतदान करून हाणून पाडतील. तसेच ज्यांनी हे षडयंत्र रचले, त्यांना जनता धडा शिकवेल, असा इशाराही नागवेकर यांनी दिला आहे.