नव्या मुख्यमंत्र्यांना सहकार्य, लोकविरोधी निर्णयांना मात्र विरोध

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून स्पष्ट


22nd March 2019, 03:20 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्याला पुढे नेण्यासाठी तसेच गोमंतकीयांच्या प्रगतीसाठी प्रदेश काँग्रेस समिती नव्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण सहकार्य करेल; पण लोकविरोधी निर्णयांना ठाम विरोध दर्शविला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पणजीतील काँग्रेस भवनात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस नेते ट्रोजन डिमेलो, अनंत पिसुर्लेकर, सुभाष केरकर, सुबोध आमोणकर, आनंद नाईक आदी उपस्थित होते. चोडणकर म्हणाले, गोव्याचा आणि गोमंतकीयांचा विकास साधणे हाच प्रदेश काँग्रेसचा उद्देश आहे. त्यामुळेच आम्ही नव्या मुख्यमंत्र्यांना सहकार्य करणार आहे; पण मुख्यमंत्री किंवा आघाडी सरकारातील मंत्र्यांनी लोकांना नको असलेले निर्णय घेतले, गोव्याची पूर्वीसारखीच लूट चालविली, तर विरोधी​ पक्ष म्हणून आम्ही त्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नव्या मुख्यमंत्र्यांनी गोवा आणि गोव्यातील समस्यांवर लक्ष केंद्रीत करून त्या सोडवाव्यात. गेल्या वर्षभरात सरकार कोण चालवित होते, याचा शोध घ्यावा आणि सरकारने जे चुकीचे निर्णय घेतले आहेत ते सुधारावेत, अशा मागण्याही​ चोडणकर यांनी केल्या.
...म्हणून नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
राज्याचे प्रशासन चालत नसल्याची तक्रार काँग्रेस पक्ष वारंवार करीत होता; पण केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांनी आमचे म्हणणे खोटे ठरविले होते. नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्याच दिवशी प्रशासन चालत नसल्याचे मान्य करून ते सुरळीत करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आमचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध केले. त्याबद्दल नव्या मुख्यमंत्र्यांचे मी अभिनंदन करतो, असे गिरीश चोडणकर म्हणाले.

सत्ता टिकविण्यासाठीच दोन उपमुख्यमंत्री
पर्रीकर आजारी होते. त्यामुळे गेले वर्षभर आम्ही सरकारकडे पूर्णवेळ मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची मागणी करीत होतो; पण त्यावेळी सरकारला ते जमले नाही. आता मात्र नव्या मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत. केवळ सत्ता टिकविण्यासाठीच भाजपने दोन उपमुख्यमंत्री नेमले आणि गोमंतकीयांवर अन्याय केला, अशी टीकाही गिरीश चोडणकर यांनी केली.

मी निवडणूक लढवायची की नाही किंवा ती कुठून लढवायची, याचा निर्णय पक्षच घेईल. पणजीतील पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय प्रदेश काँग्रेस निवडणूक समिती घेईल. समिती जो निर्णय घेईल, तो योग्यच असेल, असेही गिरीश चोडणकर यांनी नमूद केले.