काँग्रेसतर्फे रविवारपासून ‘चलो गाव चले’

उत्तर गोव्यातील सर्वच मतदारसंघांत आयोजन; ३० रोजी समारोप


22nd March 2019, 03:20 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रदेश काँग्रेस रविवार दि. २४ मार्चपासून ‘चलो गाव चले’ या सात दिवसीय सायकल फेरीस हळदोणा मतदारसंघातून प्रारंभ करणार आहे. उत्तर गोव्यातील सर्वच मतदारसंघांत ही फेरी काढली जाईल, अशी माहिती काँग्रेस नेते ट्रोजन ​डिमेलो यांनी दिली.
गुरुवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व अनंत पिसुर्लेकर उपस्थित होते. वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी तसेच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीच या फेरीचे आयोजन केले आहे, असेही डिमेलो म्हणाले.
सायकल फेरीची माहिती देताना पिसुर्लेकर म्हणाले, ‘चलो गाव चले’ सायकल फेरी केवळ उत्तर गोव्यापुरती मर्यादित असणार आहे. २४ रोजी सकाळी १० वाजता हळदोणा येथून फेरीस प्रारंभ होईल आणि ३० रोजी डिचोली येथे त्याचा समारोप होईल. दरदिवशी तीन मतदारसंघांत फेरी जाईल. फेरी दरम्यान प्रत्येक मतदारसंघात बैठका घेण्यात येतील. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरही फेरीत सहभागी होतील. याशिवाय सुमारे ५० कार्यकर्त्यांचा फेरीत सहभाग असेल. फेरी ज्या मतदारसंघात जाईल, तेथील सुमारे १०० कार्यकर्ते फेरीत सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी दिली. या सायकल फेरीचा काँग्रेसला आगामी लोकसभा आणि पोटनिवडणुकांत मोठा फायदा होईल, असा विश्वासही पिसुर्लेकर यांनी व्यक्त केला.
अशी असेल सायकल फेरी
२४ मार्च : हळदोणा, म्हापसा, थिवी
२५ मार्च : मांद्रे, पेडणे, शिवोली
२६ मार्च : साळगाव, कळंगुट, पर्वरी
२७ मार्च : पणजी, ताळगाव, सांताक्रूझ
२८ मार्च : सांतआंद्रे, कुंभारजुवे, प्रियोळ
२९ मार्च : वाळपई, पर्ये
३० मार्च : साखळी, मये, डिचोली