लिफ्ट देणे कार चालकाच्या बेतले जीवावर

सिरसईच्या जीवन च्यारींचा जांबोटीत मृतदेह; खून करून पळवली कार


21st March 2019, 06:35 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता                                    

म्हापसा : दोघा अनोळखी व्यक्तींना रात्री लिफ्ट देणे सिरसई येथील एका कार चालकाच्या जीवावर बेतले असून त्या व्यक्तींनी चालकाचा खून करून कारही पळवल्याचे उघडकीस आले. जीवन लक्ष्मण च्यारी (५२) असे चालकाचे नाव असून त्यांचा मृतदेह बेलगुंडी-जांबोटी येथे कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. याप्रकरणी जांबोटी (कर्नाटक) पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

माणुसकीच्या नात्याने रात्रीच्या वेळी दोघा अनोळखींना लिफ्ट देणाऱ्या सिरसईच्या जीवन च्यारी या कार चालकाच्या जीवावर बेतल्याचे बुधवारी उघडकीस आले. जीवन आपल्या जीए-०३वाय-१५६५ या क्रमांकाच्या वॅगनार कारने शनिवारी थिवी रेल्वे स्थानकावरून हडफडे येथे मित्राला सोडण्यासाठी गेले होते. त्याला पोहोचवून घरी परतत असताना करासवाडा येथे त्यांना दोघा अनोळखी वाटसरूंनी लिफ्टसाठी हात दाखवला. तेव्हा त्या दोघांनी सिरसईपर्यंत लिफ्ट देण्याची विनंती केली. 

जीवन त्यांना घेऊन सिरसई येथे पोहोचल्यानंतर त्या दोघांनी त्यांना साखळीपर्यंत सोडण्याची विनवणी केली. साखळीला जाण्यापूर्वी जीवन प्रथम घरी गेले. तोपर्यंत दोघा अनोळखी व्यक्तींना त्यांनी गाडीतच बसण्यास सांगितले. त्यावेळी रात्रीचे सव्वा आठ वाजले होते. त्यांनी पत्नी अंबिक यांना जेवण वाढण्यास सांगितले. जेवण झाल्यानंतर गाडीतील दोघा वाटसरूंना साखळीत सोडून येतो, असा निरोप त्यांनी पत्नीला दिला. पत्नीने जाण्यास मनाई केली. मात्र, माणुसकी जपण्यासाठी म्हणून ते वाटसरूंना सोडण्यासाठी साखळीला गेले. तासाभरात परत येतो, असे सांगून गेले. मात्र, दोन तास उलटले तरी ते परतले नाहीत. काळजीने पत्नी अंबिका यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी मोबाईलवरून पत्नीशी संपर्क केला अन् शेवटचे संभाषण केले. त्यामध्ये त्यांनी वाटसरूंना बेळगावला  सोडण्यासाठी जात असल्याचे पत्नीला सांगितले. आपण चोर्ला घाटात असून वाहतूक कोंडीमध्ये सापडल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. पत्नी अंबिका यांनी त्यांची पहाटेपर्यंत वाट बघितली. पुन्हा-पुन्हा त्यांनी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद मिळू लागला. शेवटी सकाळी त्यांनी म्हापसा पोलिस स्थानक गाठून तक्रार दिली. मोबाईलचे शेवटचे लोकेशन चोर्ला घाटात होते. त्यामुळे म्हापसा पोलिसांनी अंबिका यांना वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अंबिका यांनी कुटुंबियांसह वाळपई पोलिस स्थानकात जाऊन पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुसऱ्या बाजूने जीवन यांच्या भावाने मित्रांसह बेळगाव भागात जाऊन त्यांचा शोघ घेतला, पण हाती काहीच लागले नाही.      

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

दरम्यान सर्व औपचारिकता झाल्यानंतर मंगळवारी रात्री जीवन यांचा मृतदेह सिरसई येथे आणून शोकाकुळ अवस्थेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जीवन हे गेले २० वर्षे सेझा कंपनीमध्ये नोकरीला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दहा वर्षांची मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.

सोशल मीडियामुळे सापडला मृतदेह

मंगळवारी अचानक सोशल मीडियावर एका कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे छायाचित्र व्हायरल झाले. बेलगुंडी, जांबोटी येथे हा मृतदेह असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मनात संशयाची पाल चुकचुकल्याने जीवन यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रमंडळींनी बेलगुंडी येथे धाव घेतली अन् तो मृतदेह जीवनचाच असल्याचे स्पष्ट झाले. 

लिफ्ट मागणाऱ्यांनीच खून केल्याचा संशय

पाकीटातील वाहन परवाना, एटीएम कार्ड आणि कपड्यांवरून जीवन यांच्या मृतदेहाची ओळख पटली; मात्र घटनास्थळी वॅगनार कार नव्हती. तसेच पाकीटातील किरकोळ रक्कमही नव्हती. मृतदेहाच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखमा आढळून आल्या आहेत. एकंदरीत घटनाक्रम बघता पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून लिफ्ट मागणाऱ्या दोघा वाटसरूंनी हा खून केला असावा असा प्रथमदर्शनी कयास व्यक्त केला आहे. याप्रकरणी जांबोटी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा