माघारीसाठी भाजपतर्फे विनंतीच नाही : दीपक


21st March 2019, 06:34 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : भाजपमधील एकाही नेत्याने आपल्याला प्रत्यक्ष भेटून शिरोड्यातून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केलेली नाही. नितीन गडकरी एकदाच फोनवरून काही सेकंदांपुरते बोलले. मग आपण निवडणुकीतून माघार का घेऊ, असा सवाल शिराेड्यातून पोटनिवडणूक लढविणारे मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी केला.             

नवीन सरकार स्थापन होण्याआधी नितीन गडकरी हे सुदिन ढवळीकर यांच्या मोबाईलवरून आपल्याशी बोलले, निवडणूक न लढविण्यास त्यांनी सांगितले. पण आता खूप उशीर झाला आहे, असे आपण त्यांना म्हणालाे. त्यावर त्यांनी आणखी काही सांगितले नाही. प्रत्यक्ष भेट झाली असती तर त्यांना परिस्थिती समजावून सांगितली असती. अडीच-तीन महिन्यांपूर्वी आपण प्रचार सुरू केला आहे. शिरोड्यातील एकाही मतदाराने अापल्याला निवडणुकीत उतरू नको, असे सांगितलेले नाही. आता माघार घेतली तर या लोकांसमोर तोंड दाखवायला जाऊ शकणार नाही, असे दीपक या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.            

मगो पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. निवडून आल्यानंतर आपण सरकारलाच पाठिंबा देणार आहे. लोकसभा निवडणुकीत मगो पक्ष भाजपच्या उमेदवारांचाच प्रचार करणार असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारीमुळे सरकारचे कसलेही नुकसान होत नाही, असा दावा त्यांनी केला.

दहा वर्षांनंतर पुन्हा संधी मिळालेल्या शिरोडकरांनी दोन वर्षांत आमचा विश्वासघात केला, असे शिरोड्यातील लोकांना वाटते. त्यांना धडा शिकविण्याचा निर्धार शिरोडा मतदारसंघातील मतदारांनी केला आहे. जमिनीची सरकारकडून भरपाईच हवी हाेती तर ती कायदेशीर मार्गाने मिळाली असती, त्यासाठी भाजपमध्ये जायची काय गरज होती, असा प्रश्न दीपक ढवळीकरांनी केला. 

मग भीती कशाला? 

पुन्हा निवडून येण्याचा विश्वास असल्यामुळेच सुभाष शिरोडकरांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. भाजपच्या तिकिटावर जिंकण्याची त्यांना आधीपासून खात्री आहे, तर माझ्या उमेदवारीची भीती बाळगण्याची त्यांना काहीच गरज नाही. आता काय ते निवडणुकीतच होऊन जाऊ दे, असे दीपक ढवळीकर म्हणाले.