साडेनऊ महिन्यांनंतर मडकईकर विधानसभेत

शरीराची डावी बाजू कमजोर, पण उत्साह पूर्वीसारखाच


21st March 2019, 06:33 pm

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्यानंतर गेले सुमारे साडेनऊ महिने सार्वजनिक जीवनातून अलिप्त राहिलेले कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर बुधवारी विधानसभेत आले आणि त्यांच्याविषयी असलेल्या साऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मडकईकर यांच्या शरीराची डावी बाजू कमजोर आहे, पण उत्साह पूर्वीसारखाच आहे, असे त्यांच्याशी चर्चा केलेल्या नेत्यांनी सांगितले.      

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी मडकईकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. बुधवारी सभागृहात येणे शक्य असल्यास यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली आणि बुधवारी सकाळी मडकईकरांच्या कुटुंबियांनी त्यांना विधानसभेत आणले. विधानसभा सभागृहात येण्यासाठी दोन व्यक्तींनी त्यांना आधार दिला होता. सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीतावेळी त्यांना दोन्ही व्यक्तींनी उभे राहण्यास मदत केली. सभागृहात त्यांनी ‘ब्लॅक टी’ मागवली. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधी पक्षनेत्यांपर्यंत सगळेच त्यांना भेटायला आले. मडकईकर यांचे जुने मित्र आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज जेव्हा विरोधी गटाच्या लॉबीतून सभागृहात आले, त्यावेळी त्यांना पाहून मडकईकर प्रचंड उत्साही दिसले. दोघांनी एकमेकाला हात दाखवला आणि नेरी यांनी खुणावून त्यांना कामकाज संपल्यानंतर भेटतो, असेही सांगितले. 

४ जून २०१८ रोजी मडकईकर मुंबईत वैद्यकीय तपासणीसाठी गेले असता ते ज्या हॉटेलच्या खोलीत थांबले होते तिथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. दुसऱ्या दिवशीच ‌त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण त्यानंतर त्यांच्या शरीराची डावी बाजू कमजोर पडली, ती अद्यापही व्यवस्थित झालेली नाही. त्यांच्यावर अजूनही घरीच वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सुमारे साडे नऊ महिन्यांनी मडकईकर सार्वजनिक जीवनात पुन्हा बुधवारी दिसले.        

‘मडकईकरांची स्मृती उत्तम’

आमदार पांडुरंग मडकईकर यांची स्मरण शक्ती उत्तम आहे. त्यांनी पूर्वीसारखेच उत्साहाने टोपण नावाने अनेकांना हटकले. पूर्वी आम्ही एकमेकाला जसे विनोद करून बोलायचो तसेच ते बोलले. रवी नाईक यांना त्यांनी पूर्वीसारखेच ‘पात्रांव किदे म्हणता’ असेही म्हटले, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.  
हेही वाचा