खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य : आयसीसी


18th March 2019, 04:21 pm
खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य : आयसीसी

दुबई :न्यूझीलंडमध्ये झालेल्या गोळीबारात बांगलादेशी क्रिकेटपटू थोडक्यात बचावले होते. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले की, यावर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.
न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये दोन म​शिदीत झालेल्या गोळीबारात ५० जणांना मृत्यू झाला होता. बांगलादेश क्रिकेट संघातील काही खेळाडू एका मशिदीत जाणार होते. बांगलादेशी खेळाडू मशिदीजवळ पोहोचले असता तेथे गोळीबाला चालू झाला, परंतु बांगलादेशी क्रिकेटपटू तेथून सुखरूप माघारी परतले. या घटनेनंतर तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला व बांगलादेशी संघ मायदेशी परतला.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले, खेळाडू व क्रिकेट चाहत्यांच्या सुरक्षेला आयसीसी प्राधान्य देत आहे. रिचर्डसन यांनी पुढे सांगितले, मला नाही वाटत सुरक्षेचा मुद्दा नवा आहे, परंतु न्यूझीलंडमध्ये जे काही घडले त्यामुळे बरेच लोक आश्चर्यचकित झाले. सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. इंग्लंडमध्ये ३० मे ते १४ जुलै दरम्यान विश्वचषकाचे आयोजन होणार आहे.