अफगाणिस्तानचा पहिला कसोटी विजय


18th March 2019, 04:19 pm
अफगाणिस्तानचा पहिला कसोटी विजय

देहरादून :रहमत शाहचे ७६ तर एहसान उल्लाह जनतच्या नाबाद ६५ धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने सोमवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयर्लंडचा ७ गड्यांनी पराभव करत कसोटी क्रिकेटमध्ये आपला पहिला विजय नोंदवला. दोन्ही देशांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
अफगाणिस्तानला विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य त्यांनी चौथ्या दिवशी ३ गडी गमावून गाठले. दोन्ही डावात दमदार खेळी करणाऱ्या रहमत शाहला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने तिसऱ्या दिवशीच्या १ बाद २९ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
शाहने शानदार फलंदाजी केली व एहसानसोबत मिळून दुसऱ्या गड्यासाठी १३९ धावांची भागीदारी केली. जेम्स कॅमरन - डाउजने शाहला संघाची धावसंख्या १४४ झाली असता बाद केले मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
अफगाणिस्तानने आपला तिसरा गडी महम्मद नबीच्या रुपात गमावला. तो एक धाव करून बाद झाला. आयर्लंडतर्फे डोऊव्यतिरिक्त अँडी मॅकब्रायनला एक गडी बाद करता आला. दोन्ही संघांमध्ये आता याच मैदानावर दुसरा कसोटी सामना होणार आहे.