मूत्रपिंड : महत्त्वाचा अवयव

मंत्र आरोग्याचा

Story: डाॅ. भिकाजी घाणेकर |
16th March 2019, 11:32 am
मूत्रपिंड : महत्त्वाचा अवयव


-
आपल्या शरीरात अनेक महत्त्वाचे अवयव आहेत. त्यातील मेंदू, हृदय हे अत्यंत महत्त्वाचे. अवयव भांडतात, अशी एक कविता आहे. त्यात सगळे अवयव कसे उपयुक्त आहेत, त्याचे वर्णन केले आहे. मूत्रपिंड हा असेच एक इंद्रिय. त्याचे कार्य जगण्यासाठी आवश्यक असेच आहे. ते म्हणजे रक्त शुद्ध करणे. त्यातील शरीरासाठी जे काही उपयुक्त आहे, ते शोधून घेणे व राहिलेले लघवीद्वारे बाहेर फेकणे.
ही मुत्रपिंडे आमच्या पोटामागे दोन बाजूने असतात. उजवे व डावे मूत्रपिंड. एक मूत्रपिंड निकामी झाले तर दुसरे त्याचे कार्य असते. एका मुत्रपिंडाद्वारे माणूस जिवंत राहू शकतो. जर मूत्रपिंड नीट कार्य करत नाही, तर अनेक साईड इफेक्ट होतात. दात किडून त्यातील वाईट द्रव्ये पोटात जातात, टाॅन्सिलचे इन्फेक्शन होते. दुसऱ्या इंद्रियांना सूज येते. लघवीच्याही समस्या निर्माण होतात. एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
मूत्रपिंड बिघडले तर ताप येतो. हुडहुडी भरून ताप येतो. उलटी होते. लघवीमधून रक्त पडते. पुन्हा पुन्हा लघवी होते. पोटात दुखायला लागते. लघवी करताना दुखते. तोंडाला सूज येते. भूक लागत नाही. असले काही आजार वा लक्षणे दिसायला लागली तर सोनोग्राफीद्वारे मूत्रपिंड तपासायला हवे. तसेच लगेच औषधोपचार सुरू करायला हवेत.
मुत्रपिंडाला अनेक आजार होतात. मुतखडा हा सर्वत्र आढळणारा आजार. इन्फेक्शन होऊन ताप येणे, मुत्रपिंडाला कर्करोगही होऊ शकतो. आगरात जसे मीठ तयार होते, तसे मुत्रपिंडात खडे निर्माण होतात. मुतखड्याचा आजार असलेल्यांनी टोमॅटो जास्त खाऊ नये. भरपूर पाणी प्यावे. दिवसातून किमान दोन ते तीन लीटर. सकाळी सात, दुपारी अकरा, संध्याकाळी पाच वाजता पाणी प्यायल्यास उत्तम. जेवताना जास्त पाणी प्यायल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. त्यामुळे जेवून झाल्यावर पाणी प्यावे.
चिकन, मटण जास्त खाणाऱ्यांना मूतखडा होतो. अक्षरश: रोज ते खाणारे अनेक लोक आहेत. जहाजावर खलाशी म्हणून काम करणाऱ्यांना मूतखडा होतो. रोज भरपूर पाणी पिणाऱ्यांना सहसा मूतखडा होत नाही. काही मुतखडे लहान असतात, ते लघवीतून सहज बाहेर पडतात. मात्र, मोठे असल्यास लेझर शस्त्रक्रिया करून ते काढावे लागतात. बियर प्यायल्यास मूतखडा होत नाही, हा मोठा गैरसमज आहे. बियरमध्ये युरिक अॅसिड असते. त्यामुळे वारंवार ती प्यायल्यास मूतखडा होतो.