कविता


16th March 2019, 11:31 am

माय माऊली !
-
शब्द परवलीचा ‘आई’
ओंठी तुझे नाम,
देवाहुनी थोर आई
तुझे चरण तीर्थधाम!........१
अमृताहुनी गोड माये
तुझा ऊरपान्हा,
अंगाईच्या सूरात न्हाला
तुझ्या हाताचा पाळणा!.........२
लोण्याहुनी मऊ किती
आई तुझी माया,
लेकरांच्यापाठी उभी
झिजविशी काया!.........३
तुझ्या मांडीवर माये
देहाचा विसावा,
तुझ्या पावलांशी माझा
मी देह अंथरावा!...........४
कष्टती, राबती
तुझे हात सुकुमार,
मातीच्या या गोळ्यासी दिला
माये, तुच गे आकार !..........५
किती अपराध माझे
तू घातले पोटात,
दया, क्षमा, सावली गे
वसे तुझ्या पदरात!.........६
देवा आधी आई तुझी
मी पाऊले वंदिन,
चरणाशी लीन तुझ्या
देहफूल हे वाहिन!..........७
आई तुझा आशीर्वाद
हेची सर्व सुख,
अद्वैत हे चिरंजीव राहो
मागणे देवा एक!!..........८
- पांडुपुत्र (डाॅ. प्रकाश पां. गोसावी) वायरी भूतनाथ, ता. मालवण