शिमगोत्सव : गोव्याचे सांस्कृतिक वैभव

कव्हर स्टोरी

Story: राघोबा लवू पेडणेकर |
16th March 2019, 11:26 am
शिमगोत्सव : गोव्याचे सांस्कृतिक वैभव


---
हिंदू वर्षाच्या शेवटचा सण म्हणजे शिमगोत्सव. हा सण गोमंतकामध्ये मोठ्या उत्साहात, विविध पारंपरिक प्रथांनी, भक्तीभावाने साजरा केला जातो. प्रत्येक गावातील प्रथा वेगळ्या. गावाप्रमाणे शहरांमध्येही मिरवणुका काढल्या जातात. पण गावांमध्ये पारंपारिक, अस्सल मातीतला शिमगोत्सव पाहायला मिळताे. अनेक पारंपरिक खेळ खेळले जातात. घोडेमोडणी, चोर, करवली, गडे, तरंगा, कळस, शिडियोत्सव, गुलालोत्सव, पालखी, खेळे, धुळवट, अवसर, होमकुंड.... किती खेळ, परंपरा, रिती, रिवाज सांगावेत? या काळात काही गावांमध्ये नाटके, गायन, भजनादी सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उधाण येते. ढोल, ताशे वगैरेचे वादन, विविध नाच मुले शिकतात, ती याच काळात. २५-३० वर्षांपासून गोव्यात सरकारी पातळीवर शिमगोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे कलाकार मुलांची कला विकसित झाली आहे. अनेक शहरांमध्ये विविध नृत्य पथके, चित्ररथ यांची भव्य मिरवणूक निघते. ती पाहण्यास पर्यटकही येतात.
शिमग्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर गावातील शिमगा पहावा. प्रत्येक गावातील प्रथा वेगळ्या. सत्तरी तालुका शिमगोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात येथील घोडेमोडणी खूप प्रसिद्ध. ठाणे गावात सर्वात मोठा घोडेमोडणी उत्सव होतो. तशी सत्तरीतील अन्य गावांमध्येही घोडेमोडणी प्रथा आहे.
सत्तरीतील मोर्ले कॉलनी येथे घोडेमोडणी प्रचंड उत्साहात साजरी केली जाते. पूर्वी वाघेरीच्या पायथ्याशी वसलेल्या गुळळे, अंजुणे, पणसुली व केळावडे या गावांमध्ये ती साजरी केली जायची, पण अंजुणे धरणामुळे या गावांचे मोर्ले -सत्तरी येथे स्थलांतर करण्यात आले. आता त्या भागाला मोर्ले कॉलनी या नावाने ओळखले जाते. आजही या गावातील लोक शिमगोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात पारंपरिक खेळ खेळतात. येथील घोडेमोडणी तर सर्वांना आकर्षित करते.
गुळ्ळेची घोडेमोडणी
गुळ्ळे, अंजुणे, पणसुली या तीन गावातील घोडे एकत्र येऊन गुळ्ळे येथील सातेरी केळबाय देवी मंदिराच्या प्रांगणात नृत्य करतात. सत्तरी ही वीर पुरुषांची भूमी हे वेगळे सांगायला नको. या गावामध्ये पूर्वी असे वीरपुरुष होऊन गेले, त्यांची अंगावर रोमांच आणणारी गाथा सांगणारी ही घोडेमोडणी. गुळ्ळे गावात पाच घोडे असतात. त्यानंतर अंजुणे येथील दोन व पणसुली येथील एक मिळून तिन्ही घोडे गुळ्ळे गावातील घोड्यांची भेट घ्यायला येतात. मग हे आठही घोडे एकत्र आल्यावर ढोल ताश्यांच्या गजरात देवी सातेरी केळबायच्या प्रांगणात नृत्य करतात. अत्यंत सुंदर असे हे नृत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात.
घोडेमोडणीची ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. आजही या गावांनी ती राखून ठेवली आहे, हे विशेष. या गावात राणे देसाई लोक राहतात. त्यामुळे पूर्वी त्यांना जसे मानाने घोडेमोडणीला बोलाविले जायचे, तसेच आजही बोलाविले जाते. त्यानंतर अंजुणे, पणसुली येथील घोडे येतात. एकूण हा सोहळा पाहण्यासारखाच असतो. साखळी गावात राधाकृष्ण मंदिर व आसपासच्या दोन ठिकाणी होणारी गांवठण येथील घोडेमोडणी तर पाहण्यालायक. अंगावर रोमांच व काटाही आणणारी. ढोलताशांचे लयबद्ध वादन, नृत्य, अवसर आल्यावर होणारी तरवारबाजी... अविस्मरणीय अशीच. पर्येची घोडेमोडणीही मिरवणुकीने सांखळीला येते. वाटेत दत्तवाडीजवळच्या मुस्लिम पिराच्या दर्शनाला जाते. हिंदू- मुस्लिमांच्या एकतेचे हे दर्शन अनुभवण्यासारखे.
पारंपरिक ‘भरनूल’
मोर्ले काॅलनीत शिमगोत्सवात अनेक पारंपरिक खेळ पाहायला मिळतात. तालगडी, नृत्य होळी, चोरोत्सव, धोंड, करवली (सती), मग घोडेमोडणी होते. शेवटच्या दिवशी देवाची पालखी गावातील घरांघरांमध्ये जाते. सातव्या दिवशी ‘न्हावन’ होते. या दिवशी रात्री एक पारंपरिक खेळ गुळ्ळे गावात खेळला जातो. त्याला ‘भरनूल’ म्हणतात. ही आगळी वेगळी लोककला असून हा प्रकार फक्त गावात पाहायला मिळतो. आजही या गावातील लोक ही परंपरा त्याच उत्साहाने साजरी करत आहेत. हे ‘भरनूल’ पाहण्यासाठी लोककलेचे अनेक अभ्यासक या गावात दाखल होतात.
सांस्कृतिकदृष्ट्या रावणा गावातील शिमगोत्सव सत्तरीत विशेष ख्यात आहे. रावण -सत्तरी येथे पौर्णिमेला होळी तोडणे, पाडव्याला होळी उभारणे असे विधी रीतीरिवाजानुसार होतात. तर दुसऱ्या दिवशी चोरोत्सव होतो. यावेळी चोर झालेली लहान मुले गावागावात ‘चोरांचे आवय, खावंक घालगे आवय’ म्हणत घराघरांत फिरतात. तिसऱ्या व चौथ्या दिवशीचे रोमटांमेळ, पाचव्या व सहाव्या दिवशी होणाऱ्या करवल्या आदी प्रकार होतात. सातव्या दिवशी सातेरी केळबाय देवीचा कळस घरोघरी फिरून ‘न्हावण’ देत असतो. उत्साही वातावरण असते. सहाव्या दिवशी घोडेमोडणी, फुल खेळवणे, मारुती नाचवणे आदि परंपरा पार पडतात. चव्हाटेश्वर मंडपात शिमगोत्सवानिमित्त नाटकही सादर करण्यात येते. आठव्या दिवशी देव वाळवंटी तीरावर आंघोळीला जाऊन आल्यानंतर पुन्हा मंदिरात आगमन होते.....आणि शिमगोत्सवाची सांगता होते.
शिरोलीतील होळी
शिरोली केरी- सत्तरी येथेही शिमगोत्सव थाटात होतो. होळी पौर्णिमेदिवशी संध्याकाळी राखण्याची होळी व मुख्य होळी तोडून ती झुजविण्यात येते. ‘ह..ह..हय्या..’ च्या तालावर व ढोल ताश्यांच्या आवाजात होळी झुजवितात. हा कार्यक्रम रात्रभर चालू असतो. होळीच्या दिवशी होळी देवळाकडे आणून आंब्याच्या पानांनी सजविण्यात येते.. ‘ ह ह हय्या’ च्या गजरात व ढोल ताश्यांच्या आवाजात दुपारी १२ च्या दरम्यान होळी उभी केली जाते. देवस्थानाचे पुजारी प्रथम पूजा करतात. सामुदायिक गाऱ्हाणे घातले जाते. होळीला मिठी मारली जाते. त्यानंतर सभोवताली ठेवलेल्या गवताला आग लावण्यात येते. आग विझली की तो बुका (आगीची काजळी) कपाळाला लावली जाते. नंतर होळीसमोर ठेवलेल्या दगडावर ग्रामस्थ व इतर भक्तांतर्फे श्रीफळ वाढविले जाते व खोबऱ्याचा प्रसाद वाटण्यात येतो. त्यानंतर सर्व उपस्थितांना देवाचा प्रसाद (उफार) पानावर घालून देण्यात येतो. संध्याकाळी चोरोत्सव सुरु होतो. काही मुलांना चोर बनविले जाते. सर्व घरांमध्ये ते फिरतात. घराघरात त्यांची पूजा केली जाते व खायला दिले जाते.
करवली उत्सव
सत्तरीतील शिगमोत्सवातील दोन दिवसांचा ‘करवली उत्सव’ पाहण्यासारखा. दोन लहान मुलांना करवली बनविले जाते. अबोलीची फुले डोक्यावर माळून करवल्या नेसविल्या जातात. घराघरात फिरविल्या जातात. सुवासिनीतर्फे पूजा करण्यात येते. खायला दिले जाते. घरातील व्यक्तींच्या उत्कर्षासाठी गाऱ्हाणे घालण्यात येते. गाऱ्हाणे घालण्यात तरबेज असल्याने सत्यवान अर्जुन गावस हेच बहुतेक करून गाऱ्हाणे घालतात. खांद्यावर घेऊन करवल्या नाचविल्या जातात. सोकाराती म्हटल्या जातात. करवलीच्या पहिल्या दिवशी रात्री वरचावाडा येथे ‘रोमाट’ होते. यावेळी पंचक्रोशीतील अनेकजण उत्साहात येतात, सहभागी होतात. वेगवेगळ्या वेषभूषा, पेहराव करून नाचतात. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत करवल्या देवळाकडे येतात.गावाबाहेरील लोक यावेळी ओट्या भरण्यासाठी गर्दी करतात. नवस बोलतात. गेल्या वर्षीचे नवस फेडतात. त्यानंतर करवल्या इंगळ्यांवरून (आगीच्या पेटत्या कोळशांवरून) जातात. घोडेमोडणेही होते. विविध खेळ खेळत मुले घराघरात फिरतात. ‘आयनाचे बायना, घातल्याशिवाय जायना, शबै शबै’ म्हणत शबय मागतात. पाच दिवस या शिमगोत्सवाची लोक मजा लुटतात.
शेजारच्या सांखळी गावातील शिमगोत्सव वेगळा, तिसवाडीतील, अंत्रूज महालातील शिमगा वेगळा. दक्षिण गोव्यातही वेगवेगळ्या प्रथा, परंपरा सांभाळत शिमगा साजरा केला जातो. प्रत्येकाची धुळवड, होळीही वेगवेगळ्या दिवशी. गोव्याचे सांस्कृतिक वैभव असलेला हा राज्योत्सव अनुभवण्यासारखाच! गोव्याचे हे संचित युवा पिढीने टिकवून ठेवले आहे. परंपरेने पुढे नेले आहे....!
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)