कोळेकर कुटुंबाच्या आयुष्यात पेटला ‘दीपक’!

मृत बाबल यांंच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आमदार पावस्कर; पूर्ण सहकार्याचीही हमी


16th March 2019, 02:19 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मरड-धारबांदोडा येथील बाबल कोळेकर यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले असतानाच सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पावस्कर यांनी बाबल यांच्या चारही मुलांच्या शिक्षणाचा यावर्षीचा खर्च करण्याची जबाबदारी उचलली. शिवाय कोळेकर कुटुंबाच्या सर्वच समस्या सोडविण्याची ग्वाहीही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दिली आहे.
बाबल कोळेकर यांचे गुरुवारी बारा दिवसाचे विधी करण्यात आले. त्यावेळी आमदार दीपक प्रभू पावस्कर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मदतीचा विश्वास दिला. सरकारच्या विविध योजना आपण कोळेकर कुटुंबापर्यंत पोहोचविणार असून, त्यांना सरकारतर्फे घरही बांधून देण्यात येईल. माझ्यापरीने जेवढे होईल, तेवढे सहकार्य मी या कुटुंबासाठी करणार असल्याची हमीही त्यांनी दिली. कोळेकर कुटुंबाच्या मदतीसाठी आमदार पावस्कर देवदूताप्रमाणे धावल्याने धारबांदोड्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, धारबांदोडा तालुक्यातील मरड येथे आई, पत्नी तसेच एक मुलगी व तीन मुलांसह राहणाऱ्या बाबल कोळेकर यांचे ३ मार्च रोजी अल्पशा आजाराने बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात निधन झाले. मिळेल ते काम करून बाबल आपल्या संसाराचा गाडा हाकत होते, मुलांना शिक्षण देत होते; पण त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कोळेकर कुटुंबाची वाताहत झाली आहे. ज्यांच्यावर संसार चालत होता, तीच व्यक्ती कायमची निघून गेल्याने यापुढे जगायचे कसे, खायचे काय, मुलांच्या शिक्षणाचे कसे होणार असे अनेक प्रश्न या कुटुंबासमोर उभे राहिलेले होते. बाबल यांच्या वयोवृद्ध आईनेही आपली कैफियत समाजासमोर मांडली होती. गोव्यात विधवा महिलांना सरकारकडून दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळतात; पण आपणास त्याचा लाभ मिळत नाही. या संदर्भात स्थानिक पंचायतीकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंतही तिने व्यक्त केली होती.
दरम्यान, बाबल कोळेकर यांना चार लहान मुले आहेत. या लहान मुलांना त्यांचे बाबा या जगातून कायमचे निघून गेले आहेत, हे अजून माहीत नाही. त्यामुळे रोज सायंकाळी ते त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात, असे सांगताना बाबल कोळेकर यांच्या पत्नीला हुंदका फुटला.
बॉक्स
सामाजिक संस्थांनीही मदत करावी!
कोळेकर कुटुंबावर कोसळलेले संकट पाहून निरंकाल स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आणि आपल्यापरीने त्यांनी या कुटुंबाला आर्थिक हातभार दिला आहे. धारबांदोडा येथील केंद्रीय समिती तसेच विविध सामा​जिक संघटनांनीही याची दखल घेऊन कोळेकर कुटुंबाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही निरंकाल स्पोर्ट्स क्लबने केले आहे.
बॉक्स
शिक्षणाचा प्रश्न मिटल्याने समाधान
बाबल कोळेकर यांना चार मुले आहेत. त्यांची मुलगी सध्या सातवीत, दुसरा मुलगा पाचवीत, तिसरा तिसरीत, तर लहान मुलगा पहिली इयत्तेत शिकत आहेे. इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा अपंग आहे. वडिलांचे निधन झाल्याने या मुलांच्या शिक्षणाचे पुढे काय होणार, असा गहन प्रश्न बाबल यांची आई आणि पत्नीसमोर उभा राहिला होता; पण आमदार पावस्कर यांच्या आश्वासनामुळे त्या समाधानी झाल्या आहेत.

घराचीही दुर्दशा, सरकारी योजना नाही!
बाबल कोळेकर यांचे कुटुंब ज्या घरात राहते, त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. घराचे छप्परही तुटण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांचे जगणे कठीण बनणार आहे. बाबलने आपल्या कमाईतूनच घर बांधले आहे. सरकारच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे घरही अर्धवट स्थितीतच आहे, असे सांगताना बाबल यांच्या आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.