मडगाव ओडीपी बिल्डरांचे हित साधणारा

काँग्रेसचा आरोप; तत्काळ रद्द करण्याची सरकारकडे मागणी


16th March 2019, 03:19 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मडगावसाठीचा ओडीपी (बाह्य विकास आराखडा) बेकायदा असून, तो बिल्डरांचे हित साधणारा आहे. त्यामुळे तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांनी शुक्रवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्याे डायस, गट समितीच्या अध्यक्ष पिएदाद नोरोन्हा, सुभाष फळदेसाई आदी उपस्थित होते. डिसोझा म्हणाले, मडगावसाठीचा ओडीपी सरकारने केवळ स्वत:च्या स्वार्थासाठीच तयार केला होता. त्यामुळेच त्याला घाईगडबडीत आणि केवळ एका आठवड्यात मंजुरी मिळवून देण्यात आली. नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९/१ नुसार पहिल्या ओडीपीत किरकोळ बदल करता येतील, असे म्हटलेले असतानाही मडगावसाठीच्या ओडीपीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सरकारकडून ओडीपीची संपूर्ण प्रक्रियाच चुकली असल्याने तो तत्काळ रद्द करणेच योग्य ठरेल, असे डिसोझा म्हणाले.

काँग्रेस न्यायालयात जाणार
मडगाव ओडीपीला विरोध करणाऱ्यांपैकी अनेकजण न्यायालयात धाव घेणार आहेत. काँग्रेसही या संदर्भातील पूर्ण अभ्यास करून न्यायालयात जाणार आहे. कारण या ओडीपीमुळे अनेकांच्या जमिनी सरकारच्या घशात जाणार आहेत, असेही तुलियो डिसोझा यांनी स्पष्ट केले.        

हेही वाचा