जाॅर्जियन टोळीकडून आणखी एक घरफोडी

आसगावातील महिलेच्या तक्रारीनंतर प्रकार उघड; ‘त्या’ फ्लॅटमालकास अटक


16th March 2019, 03:18 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : हणजूण पोलिसांनी शिवोलीतील घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या जॉर्जियन टोळीवर आसगाव येथील आणखी एक घर फोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून सोन्याची बांगडी हस्तगत केली आहे. तसेच या प्रकरणातील चारही संशयितांना भाडेकरू म्हणून फ्लॅटमध्ये ठेवताना माहिती लपवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी फ्लॅटमालक अदिक मोरजकर (साकवाडी-हडफडे) याला अटक केली आहे.
बामणवाडा-शिवोली येथे मारिया ईझाबेला फर्नांडिस यांचे घर फोडून ११ लाख ६० हजारांचा ऐवज चोरणाऱ्या कोस्टांटीन चखाइदझे (४६), लुरा पिरवेली (४२), लाशा गुरचियानी (४६) व इराक्ली तामलियानी (३३) या चार जणांच्या जॉर्जियन टोळीला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक करून त्यांच्याकडून ३ लाख रुपयांची रोकड व ६ लाखांचे दागिने मिळून ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.
आसगावात घर फोडून ७२ हजारांचा मुद्देमाल लंपास
आसगाव येथील मुबईस्थित फिर्यादी सेलिन मास्कारेन्हास यांच्या घराच्या खिडकीचा गज तोडून आतील भाडेकरू विदेशी महिलेचा एक टॅब, १५ हजार रुपयांची रोकड व फिर्यादींची ५२ हजारांची सोन्याची बांगडी मिळून ७२ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. फिर्यादी गेल्या जानेवारीमध्ये गोव्यात आली होती आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी मुंबईला परतली होती. फिर्यादींनी घराच्या एका खोलीमध्ये करेन व्हेन या अमेरिकन नागरिक महिलेला भाडेकरू म्हणून ठेवले होते.
सोन्याची बांगडी सापडली
भाडेकरू विदेशी महिला दि. ५ मार्च रोजी मायदेशी गेली होती. ती बुधवार दि. १३ रोजी घरी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. भाडेकरू महिलेने फिर्यादीला घटनेची माहिती दिली असता, ती शुक्रवारी मुंबईहून आसगाव येथे आली व पोलिसांत तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून जप्त केलेल्या दागिन्यांची सेलिन मास्कारेन्हास यांनी पाहाणी केली, त्यात चोरीस गेलेली ५२ हजारांची सोन्याची बांगडी होती. त्यानुसार फिर्यादींचे घरही संशयितांनीच फोडल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संशयितांविरुध्द पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी घरातून चोरलेला टॅब अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
फ्लॅटमालकावर गुन्हा नोंद
दरम्यान, चारही संशयितांना भाडेकरू म्हणून फ्लॅटमध्ये ठेवताना त्यांची माहिती देणारे सी फॉर्म न भरल्या प्रकरणी आणि पोलिसांपासून भाडेकरूंची माहिती लपविल्या प्रकरणी विदेशी कायदा कलम १४ खाली गुन्हा नोंदवून पोलिसांनी फ्लॅटमालक अदिक मोरजकर यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनिषा नाईक करीत आहेत.