लाच प्रकरणी एसीबीची सुनील गर्ग यांना क्लीन चीट


16th March 2019, 02:18 am

पणजी : लाच घेतल्याच्या कथित प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी विभागा (एसीबी)ने गोव्याचे माजी पोलिस महासंचालक सुनील गर्ग यांना क्लीन चिट दिली आहे. वास्को येथील मुन्नालाल हलवाई यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये गर्ग यांनी आपल्याकडे गुन्हा नोंद करून घेण्यासाठी साडेपाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशीतकोणतेही तथ्य आढळून न आल्याने एसीबीने हे प्रकरण फाईल बंद केले आहे.
एसीबीच्या चौकशीचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. फोंडा पोलिस स्थानकात केलेली एक तक्रार एफआयआर म्हणून दाखल करून घेण्यासाठी गर्ग यांनी साडेपाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करणारे पत्र हलवाई यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. यासंबंधी गर्ग यांच्याशी झालेले संभाषण त्यांनी ध्वनीमुद्रित केले होते व ते तक्रारी सोबत दिले होते. हलवाई यांनी विशेष न्यायालयात याचिकाही सादर केली होती.
या प्रकरणी सुनील गर्ग यांच्या विरुद्धची चौकशी बंद करीत असल्याबद्दल एसीबीने आपल्याला अद्याप काहीच सांगितलेले नाही, असे हलवाई यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले. सर्वोच्च न्यायालयात या लाच प्रकरणी सुनावणी सुरू असताना पोलिसांनी चौकशी थांबवल्याचा आरोप त्यांनी केला.
हलवाई यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागात गर्ग यांच्या विरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर गर्ग यांची तातडीने गोव्याहून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात न आल्याने हलवाई यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती.