म्हापसा स्थानबद्धता केंद्राची डीजीपींकडून पाहणी

बांधकाम २० मार्चपर्यंत पूर्ण करून उद्घाटनास सज्ज ठेवण्याची ‘साबांखा’ची ग्वाही


16th March 2019, 05:50 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                              

म्हापसा : अवैधरित्या गोव्यात वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करणासाठी उभारण्यात येत असलेल्या स्थानबद्धता (डिटेंशन) केंद्राचे काम येत्या दि. २० मार्चपर्यंत पूर्णत्वास येईल, अशी माहिती पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांनी दिली.महासंचालक प्रणब नंदा यांनी या स्थानबद्धता केंद्राची शुक्रवारी सकाळी पाहाणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य, विदेशी नोंदणी विभागाचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उत्तर गोव्याच्या पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, स्थानबद्धता केंद्राचे अधीक्षक आनंद विर्नोडकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता साधना बांदेकर, पोलिस उपअधीक्षक मारिया मोन्सेरात, गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक कपिल नायक व राखीव दलाचे उपकमांडर राजकुमार यादव उपस्थित होते.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाचे मे २०१५ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर म्हापसा न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना कारागृहात स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर विनावापर असलेल्या म्हापसा न्यायालयीन कोठडीच्या इमारतीला स्थानबद्धता केंद्राचे स्वरूप देण्याचा निर्णय २०१७ मध्ये सरकारने घेतला होता. त्यानंतर इमारतीचे स्थानबद्धता केंद्रात रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. 

स्थानबद्धता केंद्र गेल्या वर्षीच सुरू व्हायला हवे होते. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नूतनीकरणाचे काम पूर्ण न झाल्यामुळे काम रखडले होते. स्थानबद्धता केंद्र दिलेल्या मुदतीत सुरू करण्यास सरकारला यश न आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केंद्र येत्या २० मार्चपूर्वी पूर्ण करून उद्घाटनास सज्ज ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. या केंद्राची जबाबदारी समाज कल्याण संचालनालयाकडे आहे. केंद्राच्या उद्घाटनाची तारीख हे खाते निश्चित करणार आहे, अशी माहिती विदेशी नोंदणी विभागाचे पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली.                              

स्थानबद्धता केंद्राचे काम पूर्ण झाल्यावर केंद्र सुरू करण्याच्या बाबतीत विचार करण्यात येईल, असे सांगून पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांनी बांधकामाविषयी समाधान व्यक्त केले. 

केंद्राचे किरकोळ बांधकाम बाकी

समाजकल्याण खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागातर्फे सुमारे २० लाख रुपये खर्चून हे काम हाती घेतले आहे. यात शौचालय, छप्पर व इतर सुविधांचा समावेश होता. सध्या शौचालयांचे काम बाकी असून हे काम येत्या २० मार्चपूर्वी ते पूर्ण करून इमारत सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन कंत्राटदाराने पाहाणीवेळी दिले. शिवाय पूर्वीच्या न्यायालयीन कोठडीचा मोडकळीस आलेला भाग जमीनदोस्त करण्याची हमी ‘साबांखा’च्या कार्यकारी अभियंता साधना बांदेकर यांनी पोलिस महासंचालकांना दिली.

स्थानबद्धता केंद्रात ६० विदेशींना ठेवण्याची क्षमता

राज्यात बेकायदा वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांना या केंद्रामध्ये स्थानबद्ध करून नंतर त्यांची रवानगी त्यांच्या मायदेशी करण्यात येणार आहे. या केंद्रात सुमारे ६० जणांना स्थानबद्ध करण्याची व्यवस्था आहे. या स्थानबद्धता केंद्रात ४० पुरुष व २० महिला मिळून ६० विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्याची व्यवस्था आहे. विदेशी नियमावलीनुसार, केंद्रामध्ये सुविधा तयार करण्यात आलेल्या आहेत.