म्हापसा पोटनिवडणूक रिंगणात ‘गोसुमं’तर्फे नंदन सावंत

सुभाष वेलिंगकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा


16th March 2019, 05:47 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                                           

म्हापसा : गोवा सुरक्षा मंच पक्षाने उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष तथा वास्तुविशारद नंदन (नरसिंह) सावंत यांना म्हापसा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याची घोषणा शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. पोटनिवडणुकीत यश मिळाल्यास विरोधात बसू, परंतु आजच्या तत्वहीन राजकारणात सहभागी होणार  नाही, असे प्रतिपादन यावेळी पक्षाचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंकर 

यांनी केले.

येथील पक्ष कार्यालयात ही पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी गोसुमंचे अध्यक्ष आत्माराम गावकर, अभय सामंत, स्वाती कर्पे केरकर, परेश रायकर, किशोर राऊत व अॅड. रोशन सामंत उपस्थित होते.      

‘गोवा सुरक्षा मंच’ हा ध्येयवादी पक्ष आहे. विचारवंताचा पक्ष आहे. एखादी व्यक्ती निवडणूक जिंकेल म्हणून नाही तर ती व्यक्ती आमदार होण्यास लायक आहे की नाही, हे पाहून पक्षात उमेदवारी दिली जाते. नंदन सावंत हे मंदिरांच्या आराखड्यांमुळे गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांचा सामाजिक संस्थांमध्ये सहभाग आहे. ते अनेक वर्षे समाजकार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे. अशा या शांत, सुस्वभावी व सुशिक्षित व्यक्तीला म्हापशाची जनता पसंती देईल, असा विश्वास वेलिंगकर यांनी यावेळी व्यक्त केला.      

‘गोसुमं’ला प्रामाणिक, सुसंस्कृत, नि:स्वार्थी व निर्व्यसनी उमेदवार हवे आहेत. त्यामुळे पक्षाने मांद्रे, शिरोडा व म्हापशात असे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पक्षाचे ध्येय धोरणे सांभाळून विचाराधिष्ठित राजकारण करणारे उमेदवार आम्हाला हवे आहेत, असे वेलिंगकर यावेळी म्हणाले.  आम्हाला सत्तेची चटक नाही. आमच्याकडे सहनशीलता आहे. त्यामुळे या तीन वर्षांनंतर होणारी निवडणूक जिंकून गोसुमं सत्तेवर येईल, असा विश्वास वेलिंगकर यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीबाबत मंगळवारी निर्णय

लोकसभा निवडणूक लढवावी की नाही, याबाबत पक्षात दुमत आहे. निवडणूक लढविल्यास राज्यात पक्षाचे चिन्ह पोचून ‘वोट बँक’ तयार होईल. लोकसभेसाठी प्रत्येकी तीन उमेदवार पक्षाकडे आहेत. तर दुसऱ्या बाजूने फक्त पोटनिवडणुकीसह आगामी विधानसभेच्या ३५ जागांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे पक्ष कार्यकर्त्यांचे मत आहे. या बाबतीत मंगळवार, १९ रोजी पक्षाच्या बैठकीत विचारांती निर्णय घेतला जाईल. निवडणूक लढवण्याची निर्धार झाल्यास त्याचवेळी उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

 पक्षसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेसाठी उत्तर गोव्यात प्रा. सुभाष वेलिंगकर व अॅड. स्वाती केरकर यांची नावे विचाराधीन असून दक्षिण गोवा मतदारसंघात अॅड. हृदयनाथ शिरोडकर व किरण नायक यांपैकी एकाला उमेदवारी देण्याचा विचार ‘गोसुमं’ने चालविला आहे. मात्र, मंचने लोकसभा निवडणूक लढवावी का नाही, यावरही चर्चेअंती निर्णय घेण्यात येणार आहे, असे पक्षप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.