घरफोडीप्रकरणी जाॅर्जियन टोळी गजाआड

९ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक; हणजूण पोलिसांकडून तीन दिवसांत चोरीचा छडा


15th March 2019, 03:21 am


प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
बामणवाडा-शिवोली येथे घर फोडून ११ लाख ६० हजारांचा ऐवज चोरणाऱ्या चार जणांच्या जॉर्जियन नागरिकांच्या सराईत टोळीला हणजूण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख रुपयांची रोखड व ६ लाखांचे दागिने मिळून ९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे हजारो रुपयांचे हायड्राॅलिक साहित्य देखील हस्तगत केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली.
हा चोरीची घटना गेल्या दि. ११ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या दरम्यान घडली होती. फिर्यादी श्रीमती मारिया ईझाबेला फर्नांडिस व तिचे पती घर बंद करून रोजच्या प्रमाणे इव्हनिंग वॉकसाठी गेले होते. या दरम्यान संशयित आरोपींनी घराच्या मागच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. संशयितांनी घरातील कपाटे फोडून आतील ३ लाख रुपये आणि ८ लाख ६० हजारांचे सुवर्णलंकार मिळून ११ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. फिर्यादी घरी परतल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये कोस्टांटीन चखाइदझे (४६), लुरा पिरवेली (४२), लाशा गुरचियानी (४६) व इराक्ली तामलियानी (३३) या जॉर्जियन नागरिकांचा समावेश आहे.
या प्रकरणी बुधवारी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासकाम सुरू केले. फिर्यादींच्या घराजवळील इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजवरून चोरीसाठी करड्या रंगाची कार कापरल्याचे आढळून आले. त्या दिशेने पोलिसांनी चौकशी सुरू केली, तेव्हा सदर कार रेन्ट अ कॅबची असल्याचे दिसून आले. पोलिसांनी राज्यातील दीड हजार रेन्ट अ कॅब कारची तपासणी केली. तसेच विदेशी नागरिकांना भाडेपट्टीवर दिलेल्या कारची यादी मागितली. या यादीच्या आधारे पोलिसांनी जीए-०३-डब्लू-३०१६ या कारच्या मालकाकडून माहिती मिळवली. कारमालकाने ही कार आपण विदेशी नागरिकांना दिली असून, ते हडफडे येथे राहत असल्याचे सांगितले.
शेतात लपवले सोने
संशयित आरोपी हडफडे येथे सन व्हिलेज हॉटेलजवळील तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास होते. कारमालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या इमारतीवर पाळत ठेवली. एक संशयित आरोपी कारजवळ येऊन फ्लॅटवर परतत असतानाच पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला आणि चारही संशयितांना अटक केली. पोलिसांनी कारची तपासणी केली, तेव्हा कारमध्ये चोरीची रक्कम तसेच घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य सापडले. भाषा अनुवादकाद्वारे पोलिसांनी संशयितांची चौकशी केली. संशयितांनी हडफडे येथील मरिना डोरोडा हॉटेलजवळील एका शेतात सुवर्णालंकार लपवून ठेवले होते, ते पोलिसांनी हस्तगत केले.
मुंबईमार्गे गोव्यात
संशयित आरोपी गेल्या दि. ७ रोजी मुंबईमार्गे गोव्यात आले होते. ते दोन महिन्यानंतर येत्या मेमध्ये मायदेशी परतणार होते. त्यांनी चोरीसाठी वापरलेली कार त्याचदिवशी भाडेपट्टीवर घेतली होती. संशयितांनी दि. ११ रोजी चोरीनंतर आणखी पाच दिवसांसाठी कार भाडेपट्टीवर घेतली व त्यासाठी आगाऊ रक्कम दिली होती. संशयित एकाच फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते व ते फ्लॅट मालकाला दरदिवशी सहा हजार रुपये भाडे देत होते. संशयितांनी ऑनलाईन बुकिंगद्वारे हा फ्लॅट भाडेपट्टीवर घेतला होता.
यापूर्वीही संशयित आले होते गोव्यात
संशयितांपैकी दोघे जण गेल्या २०१७ मध्ये गोव्यात येऊन परतले होते. संशयितांचा इतर चोरीच्या प्रकरणात हात असण्याची शक्यता व्यक्त करून गेल्या दि. ७ पासून राज्यात घडलेल्या चोरीच्या प्रकरणात संशयितांचा हात असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विदेशी नागरिकांना भाडेपट्टीवर ठेवताना सी फॉर्म न भरता भाडेकरूंची माहिती लपविल्याचा गुन्हा फ्लॅट मालकावर नोंद करण्यात आला आहे.
रशियनासह रेन्ट अ कॅबच्या
अध्यक्षांची पोलिसांना मदत
पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर, तेजसकुमार नाईक, महिला उपनिरीक्षक मनीषा पेडणेकर, शिपाई विशाल नाईक, सुहास जोशी, सत्येंद्र नास्नोडकर, अनंत च्यारी, रुपेश मठकर, तीर्थराज म्हामल, जतीन शेटये, गोदिश गोलतेकर, संजय गावडे, आदर्श नागवेकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी तपास कामात पोलिस पथकाला रेन्ट अ कॅबचे उत्तर गोवा अध्यक्ष रोहन कळंगुटकर व एका रशियन नागरिकाने मदतकार्य केले आहे. येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने संशयितांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

रोकड, सोने, हत्यारे हस्तगत
संशयितांकडून चोरीतील ३ लाख रुपयांची रोख रक्कम, त्यात ५९० यूएस डॉलरचा समावेश आहे. ३ कंठहार, १२ जोड कर्णफुले, एक अंगठी, सोन्याचा मुलामा दिलेली पैजण जोडी, तीन बांगड्या, दोन कडे व विरघळलेले काळ्या रंगाचे सोने या दागिन्यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांनी रेन्ट अ कॅब हुंदाय आयटेन कार,टॉर्च, फ्लायर, ग्लाेव्हज, तीन स्क्रू ड्राव्हर, एक्सो ब्लेड, दोन हातोडा, रूपेरी टेप, केबल वायर, हायड्राॅलिक कटर, विद्युत ग्रायंडर, ५ ड्रायंडर ब्लेडस, पिकास व लाकडी दांडा असे साहित्य हस्तगत केले आहे.