वेळ्ळी मारहाण प्रकरणी तिघांना जामीन मंजूर


15th March 2019, 06:05 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : वेळ्ळी येथील सरपंच सावियो डिसिल्वा व त्याच्या साथीदारांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले शेन फर्नांडिस (३६), रेंडल फर्नांडिस (३९) व अॅल्ड्रिच फर्नांडिस (३०) या तिघांना येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने वैयक्तिक २५ हजार रुपये व तत्सम एका हमीदाराच्या बोलीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी पोलिस ज्यावेळी चौकशीसाठी बोलावतील त्यावेळी पोलिस ठाण्यावर उपस्थित रहावे, साक्षीदारांवर दबाव आणू नये, तसेच पोलिसांच्या तपासकामात अडथळे आणू नये, असे सत्र न्यायाधीश एॅडगर फर्नांडिस यांनी आदेशात नमूद केले आहे.
३ मार्च रोजी वेळ्ळीत कार्निव्हलच्या निमित्ताने तेथील लोकांनी मिरवणूक काढली होती. त्यावेळी एक रुग्णवाहिका आल्याने वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनी त्यांची मिरवणूक थोडा वेळ थांबवून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर वरील तिघाही संशयितांनी मिरवणूक अडविली या मुद्यावरून सरपंचाशी वाद घालून त्यांना मारहाण केली. तसेच सरपंचाना सोडवून घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या साथीदारांनाही मारहाण केली.
कुंकळ्ळी पोलिसांनी या मारहाणीच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेल्या वरील तिघांना बुधवारी रात्री पोलिस कोठडीत चोप दिला. पोलिसांच्या मारहाणीमुळे अॅल्ड्रिच फर्नांडिस हा कोठडीतच अत्यवस्थ पडला. त्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी त्याची आई मारीया फर्नांडिस यांनी पोलिस उपनिरीक्षक भारत खरात यांनी आपल्या मुलाला पोलिस कोठडीत जबर मारहाण केल्याची लेखी तक्रार पोलिस अधीक्षकांकडे दाखल केली आहे.
या संदर्भात पोलिस अधीक्षक अरविंद गांवस यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप आपल्याकडे तक्रारीची प्रत आली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच आपण कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांकडे चौकशी केली असता पोलिस कोठडीत तसा मारहाणीचा प्रकार घडलेला नसल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.