फसवणूक केल्या प्रकरणी विक्रेत्याला ग्राहक मंचाकडून दंडाची शिक्षा


15th March 2019, 06:04 pm

 
पणजी : लाकडी बेड व टेबल्ससाठी आगावू रक्कम भरूनही ग्राहकाला त्याचे वितरण न केल्याबद्दल पर्वरी येथील उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने भिवंडी-ठाणे येथील फर्निचर विक्रेते झहीद याला व्होळांत - वास्को येथील तक्रारदार डॉ. पारिजात रॉय यांना नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये व खटल्याचा खर्च म्हणून १० हजार देण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय त्यांनी भरलेली आगावू १० हजार रुपयांची रक्कम त्यांना ती भरल्याच्या दिवसापासून १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश देखील मंचाने दिला आहे.
पिळर्ण बार्देश येथील लॅड्स अ‍ॅण्ड इव्हेन्टतर्फे दोनापावला येथील डॉ. शामाप्रसाद स्टेडियममध्ये २८ ते ३० ऑक्टोबर २०१७ मध्ये भरविण्यात आलेल्या फर्निचर प्रदर्शनात डॉ. रॉय यांनी २८ ऑक्टोबर रोजी १० हजार रुपये भरणा करून झहीद यांच्याकडे लाकडी बेड व टेबलांची मागणी नोंदविली होती. एका महिन्याच्या आता सदर वस्तू घरपोच आणून देण्याची हमी झहीद याने त्यांना दिली होती.
दिलेली मुदत उलटून गेली तरी या वस्तू मिळाल्या नसल्याने व वारंवार चौकशी करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने डॉ. रॉय यांनी शेवटी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे २१ नोव्हेंबर २०१८ रोजी याचिका सादर केली होती. झहीद यांनी आपला विश्वासघात करून फसवणूक केल्याची त्यांची तक्रार होती व त्यासंबंधी आवश्यक ते पुरावे त्यांनी सॅबास्तियान वालीस यांच्या अध्यक्षतेखालील मंचाला सादर केले होते.
१३ मार्च २०१९ रोजी हे प्रकरण निकालात काढताना मंचाने डॉ. रॉय यांची फसवणूक झाल्याचे तसेच त्यांना मानसिक त्रास झाल्याचे निकालात नमूद करून नुकसान भरपाई, खटल्याचा खर्च तसेच आगावू रक्कम मिळून ४५ हजार रुपये एका महिन्याच्या आत परत करण्यास झहीद यांना सांगितले आहे. तक्रारदार डॉ. पारिजात रॉय यांनी मंचापुढे स्वत: आपली बाजू मांडली.