हरमलात तीव्र पाणी टंचाईमुळे गृहिणींचे हाल

15th March 2019, 05:27 Hrs

वार्ताहर। प्रतिनिधी      

हरमल : येथील मधलावाडा व खालचावाडा भागांत सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत असल्याने गृहिणींचे बरेच हाल होत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची राजकारण्यांची आश्वासने हवेत विरल्याने या भागांतून संताप व्यक्त होत आहे.

चांदेल पाणी प्रकल्पातून पर्यटन हंगामात पाणी पुरवठा अत्यल्प होत असल्याने त्याचा परिणाम हरमल भागात जाणवत आहे. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, असे स्पष्टीकरण पाणी पुरवठा विभागाच्या एका कर्मचाऱ्याने दिले.

सध्या हरमल पंचायत क्षेत्रातील अधिकतर भागांत तसेच उंचावरील घरांना कळशीभर पाणी मिळणे कठीण बनले आहे. मधलावाडा व खालचावाडा भागांतील गृहिणींना दूरवर असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. तर कधी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी व्यथा गृहिणी रेखा नाईक परब यांनी मांडली आहे.                        

हरमलात एखादवेळी नळास पाणी आलेच तर ते गढूळ व खनिज मिश्रित असते. त्यामुळे गृहिणींमध्ये संताप निर्माण झाला आहे. खनिज मिश्रित गढूळ पाणी देऊन आम्हाला रोगग्रस्त करायचे आहे का, असा सवाल गृहिणी यशश्री देऊलकर यांनी विचारला आहे. अजून उन्हाळा सुरू झालेला नाही, तर ही परिस्थिती. पुढील काही दिवसांत ही समस्या आणखी गंभीर होणार आहे. तसे झाल्यास स्थानिकांना आंदोलन छेडावे लागेल. तत्पूर्वीच खात्याने पावले उचलावीत, अशी मागणी देऊलकर यांनी केली आहे.

पाणी टंचाईची समस्या अनेक कारणांनी उद्भवत असून त्यात पाणी चोरीचे कारणही प्रमुख आहे. म्हणूनच पाणी चोरी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आश्वासन पेडण्याच्या अभियंत्याने दिले होते. त्याची कार्यवाही कधी  करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पाणी पुरवठा खात्याने पुन्हा एकदा कोरगाव व हरमल भागातील व्हॉल्व व फाट्यांचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी इथल्या गृहिणींमधून केली जात आहे.

पंचायतीच्या ठरावाकडे विभागाचे दुर्लक्ष

पाणी टंचाईबाबत हरमल ग्रामसभेत चर्चा झाली होती व ठराव संमत करून पाठविला होता. परंतु बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंते याबाबत मौन बाळगून असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांशी बोलणी करणार असल्याची माहिती पंचायत सदस्य अनंत गडेकर यांनी दिली आहे.

पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यावर टीका

वर्षभरापूर्वी हरमलातील ग्रामस्थांनी पेडणे पाणी पुरवठा विभागावर मोर्चा नेला होता. येथील पाणी पुरवठा विभागाचा एक अभियंते जाणूनबुजून हरमलवासीयांसमोर अडचणी निर्माण करीत असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे संबंधित अभियंत्याची बदली करावी, अशी मागणी त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली होती. तसे निवेदनही सादर केले होते. परंतु हा अभियंता सरकारी जावई बनून पेडण्याच्या कार्यालयात ठाण मांडून बसला आहे, अशी टीका गृहिणी रेखा नाईक परब यांनी केली आहे.

हरमलात जेव्हा पाणी टंचाई असते, त्यावेळेस मांद्रेतील काही भागांत मात्र पाणी मुबलक असते. कोरगाव फाट्यावरून पाणी मांद्रे भागात वळविण्यास हरकत नाही, परंतु जर हरमल भागातील नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत असेल तर, मांद्रेसाठी पाणी का वळविले जाते, असा सवाल ग्रामस्थ टोनी डिमेलो यांनी उपस्थित केला आहे.

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more

वीज वाहिनी व्यापणार पश्चिम घाटातील १७७ हेक्टर जागा

धारवाडमधून गोव्यात ४०० केव्हीची नवी वाहिनी Read more

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more