म्हापसा बनतेय गोव्यातील ‘मिनी मुंबई’

‘म्हापसा यूथ‘चे निरीक्षण; सांडपाण्यामुळे तार नदी प्रदूषित झाल्याचा दावा


15th March 2019, 05:25 pm

प्रतिनिधी | गोवन वार्ता

म्हापसा : हापशातील सांडपाण्यामुळे तार नदी प्रदूषित झाली आहे. पालिका, सरकारी खाती व नागरिकांनी या नदीत सोडले जाणारे सांडपाणी बंद करायला हवे. अन्यथा म्हापसा म्हणजे गोव्यातील ‘मिनी मुंबई’ होईल, अशी भीती विविध सामाजिक संघटनांच्या युवा नेत्यांने केली आहे.      

  तार नदीला मरड येथे म्हापसा शहरातून सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला जोडला जातो. या ठिकाणाची म्हापसा यूथ व इतर संघटनांनी नुकतीच पाहाणी केली. यावेळी सांडपाण्यामुळे तार नदीपात्रातील पाण्यालाही प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे आढळून आले. हे दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यास घातक आहे. या सांडपाण्यामुळे तार नदी प्रदूषित झाली आहे. या प्रदूषणास आम्ही म्हापसावासीच कारणीभूत असून रहिवाशांनी सांडपाणी नाल्यात सोडणे बंद करायला हवे, असे मत संघटनेच्या नेत्यांनी मांडले. तसेच पालिका आणि आरोग्य खात्यासह इतर संबंधित खात्यांनी हे सांडपाणी नदीत मिसळू नये म्हणून उपाय काढायला हवा, असे मत गौरेश केणी यांनी मांडले.

तार नदीतील गाळचा उपसा करणे हा तात्पुरता उपाय आहे. गाळ उपसण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखालचे पाईप काढायला हवेत. तेव्हा पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल. परंतु नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील सांडपाणी नदीच्या पात्रात मिसळणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. याबाबतीत म्हापसा पालिका, आरोग्य खाते व बस्तोडा पंचायतीला निवेदन सादर करण्यात येईल, असे केणी यांनी सांगितले.

‘म्हापसा यूथ’ला ‘गोंयचो आवाज’चा पाठिंबा 

म्हापशाचे ‘मिनी मुंबई’ होऊ नये, म्हणून ‘गोंयचो आवाज’ संघटनेतर्फे म्हापसा यूथला पाठिंबा देण्याचे जाहीर आहे. प्रशासन किंवा म्हापसा पालिका मंडळाला या सांडपाण्यावर तोडगा काढता येत नसल्यास सामाजिक संघटना यावर तोडगा काढण्यास सक्षम आहे. पालिकेने ३० दिवसांच्या आत यावर कायमचा उपाय न काढल्यास उत्तर गोव्यातील सामाजिक संघटनांच्या सहकार्याने यावर तोडगा काढू, असे गोंयचो आवाज संघटनेचे रवी हरमलकर व श्रेया धारगळकर यांनी सांगितले. 

सामाजिक संघटना म्हापसा शहराला भेडसावणाऱ्या समस्यांना वारंवार वाचा फोडता. या समस्या उपस्थित केल्यास त्यात राजकारण असल्याची शंका घेतली जाते. ‘स्वच्छ भारता’च्या नावाखाली करदात्यांचा पैसा हे छोटे शहरही स्वच्छ करण्यासाठी वापरला जात नाही. हे सांडपाणी रहिवाशांच्या आरोग्य, पाण्यातील जीव आणि पर्यावरणाला बाधक आहे.

— विजय भिके, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष, काँग्रेस