बुधवारी भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम लढत

12th March 2019, 02:57 Hrs

नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या व अंतिम सामन्यात विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरणार आहे. २-० असा आघाडीवर असतानाही अखेरच्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विश्वचषकापूर्वी भारताचा हा अखेरचा एकदिवसीय सामना व मालिका असल्यामुळे भारताला यात विजय महत्त्वाचा ठरणार आहे.
मालिकेला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी संघाला केवळ दोन स्थानांसाठी खेळाडू निश्चित करायचे होते मात्र मागच्या चार सामन्यांमध्ये भारतीय संघाची दुबळी स्थाने सर्वांच्या समोर आली आहेत. या मालिकेत भारतीय संघ संघर्षच करताना दिसून येत आहे. विश्वचषकासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे त्यामुळे संघ व्यवस्थापनाला यावर मेहनत करण्यासाठी थोडा अवधी मिळणार आहे.
पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताकडे प्रयोग करण्याची संधी होती, परंतु अंतिम दोन सामन्यात भारताला पराभव स्वीकारवा लागला व यामुळे पाचवा व अंतिम सामना निर्णायक बनला. कर्णधार विराट कोहली व संघाचे लक्ष्य मालिका जिंकून मागच्या तीन वर्षांची विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारताने मागच्या तीन वर्षांत १३ ​द्विपक्षीय मालिका खेळल्या असून यातील १२ मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. मोहालीत ३५९ धावांच्या विशाल लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अंतिम सामना जिंकून विश्वचषकात आत्मविश्वास उंचावून जाण्याची संधी आहे.
या एकदिवसीय मालिकेआधी भारताच्या अंतिम १५ पैकी अंतिम १३ खेळाडू निश्चित वाटत होते व केवळ दुसरा सलामीवीर फलंदाज व एका गोलंदाजाचे स्थान निश्चित करायचे बाकी होते, परंतु अंबाती रायडूचे अपयश, ऋषभ पंतचे यष्ट्यांमागे खराब प्रदर्शन, केएल राहुलमध्ये सातत्याची कमतरता व युझवेंद्र चहलची बोथट होणारी गोलंदाजी संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढवत आहे.
मागच्या सामन्यात कोहली फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर आला होता मात्र निर्णाय सामन्याचे महत्त्व पाहून तो आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. राहुलला आणखी एक संधी मिळू शकते व सामन्याच्या स्थितीनुसार त्याच्या फलंदाजीचा क्रम ठरू शकतो. विश्वचषकापूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विजय शंकरला संघ व्यवस्थापन चौथ्या स्थानावर उतरवू शकतो.
शिखर धवनचे पुन्हा फॉर्ममध्ये परतणे भारतासाठी चांगली खबर आहे. शिखर धवनसाठी संघ व्यवस्थापनाला तेवढी चिंताही नव्हती. आपल्या घरच्या मैदानावर केवळ एकदाच (टी-२०, विरुद्ध न्यूझीलंड २०१७) आपल्या फलंदाजीची जादू दाखवणारा धवन मोहालीतील फॉर्म येथेही कायम राखण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीतील प्रेक्षकांना विराट कोहलीकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने फिरोज शाह कोटला मैदानावर एक एकदिवसीय शतक व एक कसोटी शतक झळकावलेले आहे.
पंत आपल्या घरच्या मैदानावर प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी उतरणार असून या सामन्याला तो संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल. मोहालीमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षण सांभाळणाऱ्या ऋषभ पंतला खराब यष्टिरक्षणानंतर टीकेचा धनी व्हावे लागले होते. अखेरच्या सामन्यात हाणामारीच्या षटकात भुवनेश्वर कुमारने निराश केले होते. महम्मद शमी जर तंदुरुस्त असला तर या महत्त्वाच्या सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलिया संघाचे प्रदर्शन सातत्यापूर्ण नव्हते मात्र विश्वचषकापूर्वी त्यांचा संघ मजबूत दिसून येत आहे. सलामीवीर कर्णधार अॅरोन फिंव व शॉन मार्श यांचे अपयश ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मधली फळीत पीटर हँड्स्कोंब, ग्लेन मॅक्सवेल व एश्टन टर्नरचे शानदार प्रदर्शन यामुळे ऑस्ट्रेलियाचे मनोबल वाढले आहे. कोटलाची खेळपट्टी जर फिरकीपटूंना मदत करते तर लेग स्पिनर अॅडम झांपा व ऑफ स्पिनर नॅथन लायन या दोघांनाही संघात स्थान मिळू शकते.
फिरोझ शाह कोटला मैदानावर आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये चार सामने खेळवण्यात आले आहेत. यात भारताने तीनमध्ये विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने एकमेव विजय १९९८ साली मिळवला होता. हवामान खात्याने बुधवारी पावसाची भविष्यवाणी केली आहे. जर पावसाने उपस्थिती लावली नाही तर रात्रीच्या वेळी दव आपली भूमिका बजावू शकतो.  

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more