हिरवाईसाठी चीन-भारताचं कौतुक!

परामर्श

Story: अभय देशपांडे |
09th March 2019, 10:56 am


--
‘नासा’ नं नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार सध्या वीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत जग अधिक हिरवंगार झालं आहे. हा बदल कशामुळे झाला, याचं उत्तर देताना ‘नासा’ नं चीन आणि भारताची प्रशंसा करून त्याचं बहुतांश श्रेय या दोन देशांना असल्याचं म्हटलं आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या प्रचंड आहे. चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. साहजिकच मोठ्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी या दोन्ही देशांना अधिक ऊर्जेची गरज लागते. ती प्राप्त करण्यासाठी या दोन्ही देशांनी जंगलांचा मोठ्या प्रमाणात नाश केला, वृक्षतोडी केल्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास केला असा ठपका या दोन्ही देशांवर नेहमीच ठेवला जातो. मात्र त्यानंतर पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याच्या प्रबळ इच्छेतून या दोन्ही देशांनी वृक्षारोपणाला मोठं महत्त्व दिलं. परिणामी, अधिक जमीन हिरवाईखाली आणली, असं नासाचं म्हणणं आहे.
या दोन्ही देशांनी यासाठी राबवलेल्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण प्रकल्पांना ‘नासा’नं धन्यवाद दिले आहेत. तसंच शेतीसाठी निसर्गपूरक तंत्रज्ञानाच्या वापरात या देशांनी गेल्या वीस वर्षांमध्ये मोठी वाढ केली. त्यामुळेच हे शक्य झालं असंही म्हटलं आहे. भारतानं वृक्षलागवडीसंदर्भात सातत्यानं विक्रम केले आहेत आणि आधीचे विश्वविक्रम मोडीत काढले आहेत. फक्त २४ तासांमध्ये ५ कोटी रोपांची लागवड करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.
नासाचं हे संशोधन ‘नेचर सस्टेनॅबिलिटी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं असून उपग्रहानं पाठवलेली १९९० च्या मध्यावरची माहिती आणि आजची माहिती यांचा विचार करून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे. तापमानवाढ होत चालल्यामुळे पृथ्वीवर कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. हवामानही अधिक दमट आहे. त्यामुळे पृथ्वीवरच्या वृक्षराजीत भर पडली असावी, अशी सुरुवातीला संशोधकांना शंका होती. मात्र, अधिक संशोधन केल्यानंतर संशोधकांना असं आढळून आलं आहे की जगातल्या इतर भागांच्या तुलनेत चीन आणि भारत यांच्यामध्ये अधिक प्रमाणात ही हिरवाई दिसून येत आहे.
या संदर्भात ‘नासा’ च्या संशोधकांनी एक नकाशाही प्रसिद्ध केला आहे. त्यात जगभरातली तुलनात्मक हिरवाई किंवा झाडा- झुडपांमध्ये झालेली वाढ आणि घट दाखवण्यात आली आहे. या नकाशात भारत आणि चीनदरम्यान झाडा-झुडपांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतं. वनस्पतींच्या वाढीतल्या एकूण बदलाचा विचार करता गेल्या दशकभरातल्या वाढीत अमेरिकेचा सातवा क्रमांक लागतो. अर्थातच ज्या देशांनी आधीपासूनच आपली जंगलं आणि वनस्पती उत्तम प्रकारे राखल्या; त्यांच्यामध्ये त्यात वाढ होण्याचं प्रमाण कमी असणं साहजिक आहे.
या अभ्यासासाठी ‘नासा’ नं मॉडरेट रिझोल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटरचा (‘एमओडीआयएस’ चा) वापर केला. एमओडीआयएसच्या साहाय्यानं २००० ते २०१७ या कालावधीतली माहिती गोळा करण्यात आली. त्यासाठी उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रांचा आणि माहितीचा वापर करण्यात आला. चीनकडे जगाच्या वृक्षराजीपैकी ६.६ टक्के भाग आहे. यापैकी जंगलांखाली ४२ टक्के तर पिकांखाली ३२ टक्के जमीन आहे. मात्र संशोधनाच्या अभ्यास कालावधीत जगातली एक चतुर्थांश हिरवाईवाढ ही चीनमुळे झाल्याचं आढळलं. हवामानातला बदल, हवेचं प्रदूषण आणि जमिनीची धूप यांच्यावर मात करण्यासाठी चीननं आखलेल्या वनसंवर्धन आणि विस्तार कार्यक्रमामुळे चीनमधल्या जंगल परिसरात वाढ झाल्याचं ‘नासा’ चं म्हणणं आहे.
भारताच्या हिरवाईत ६.८ टक्क्याची वाढ झाली आहे. यापैकी ८२ टक्के वाढ ही पिकांखालील जमिनींमध्ये आणि ४.४ टक्के वाढ ही वनांखालील जमिनींमध्ये झाली आहे. दोन्ही देशांच्या अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. यात बहुपीक पद्धतीच्या लागवडीला अधिक श्रेय देण्यात आलं आहे. या पद्धतीमुळे दर वर्षी एकाच क्षेत्रात एकाहून अधिक पिकं अनेक वेळा घेतली जातात. या देशांच्या अन्नधान्यांच्या, भाजीपाल्याच्या, फळांच्या उत्पादनात २००० पासून सुमारे ३५-४० टक्के वाढ झाल्याचं ‘नासा’ चं म्हणणं आहे. या संशोधनानुसार, १९७० आणि १९८० च्या दशकांमध्ये चीन आणि भारत या दोन्ही देशांनी शहरी विकासासाठी, शेतीसाठी मोठी वृक्षतोड केली होती. मात्र, यामुळे समस्या उद्भवू लागल्या त्यावेळी या देशांनी त्यासाठी आवश्यक उपाययोजनांकडे इतर देशांच्या तुलनेत अधिक लक्ष पुरवलं. १९९० च्या दशकात हवेच्या आणि जमिनीच्या प्रदूषणाकडे अधिक लक्ष दिलं गेलं आणि गेल्या दोन दशकांमध्ये हवामानातल्या बदलांना तोंड देण्यासाठी पुन्हा निसर्गाकडे वळण्याखेरीज पर्याय नसल्याचं स्पष्ट होत गेल्यावर या दोन्ही देशांमधल्या हिरवाईवाढीच्या प्रयत्नांनाही तशीच गती येत गेली. या दृष्टीनं उभय देशांच्या प्रशासनात आणि जमिनीच्या वापरात मोठा बदल दिसून आला. आगामी काळातही हे कौशल्य दिसलं तरच या देशांचा निसर्गसंवर्धनासह उत्तम विकास होईल, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
या संशोधनानुसार नवीन सहस्रकाच्या सुरुवातीपासून पृथ्वीवरच्या हिरवाईत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे अतिरिक्त वीस लाख चौरस मैलांमध्ये हिरवाईची निर्मिती झाली आहे. हे क्षेत्रफळ अॅमेझॉनच्या पर्जन्यवनांच्या क्षेत्रफळाएवढं आहे. मात्र, या हिरवाईच्या वाढीमुळे जंगलतोडीच्या प्रमाणात घट झालेली नाही, ही चिंतेची बाब असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.
आणखी एक रोचक बाब म्हणजे सर्वसामान्यपणे अधिक लोकसंख्या असलेले देश अधिक प्रमाणात प्रदूषण करतात आणि जमिनी ओसाड बनवतात असं मानलं जातं. या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि बोस्टन युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ अर्थ अँड एनव्हायर्न्मेंटचे पदवीधर संशोधक ची चेन यांनी हा गैरसमज असल्याचं म्हटलं आहे. या अभ्यासातून मोठी लोकसंख्या असलेल्या याच दोन देशांनी प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं मोठी पावलं उचलून ती यशस्वी केल्याचं दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
--------
प्रयत्न चांगले, पण...
या अभ्यासाच्या सहलेखिका आणि नासाच्या अॅमीस रिसर्च सेंटरच्या संशोधिका रमा नेमाणी यांनी या निष्कर्षांविषयी समाधान व्यक्त करतानाच ही सुधारणा तुटपुंजी असल्याचा शेरा मारला आहे. जगाला तापमानवाढीपासून वाचवायचं असेल तर चीन आणि भारतानं लोकसंख्यावाढीला आळा घालून आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. कांगो, ब्राझील, इंडोनेशियासारख्या देशांबरोबरच अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांनीही आपापल्या भागातलं प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी ठोस पावलं उचलण्याची गरजही या संशोधनातून अधोरेखित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अद्याप या दोन्ही देशांमध्ये गरिबी, अशिक्षितपणा आणि बेराजगारी या समस्या तशाच राहिल्या आहेत. त्यामुळे प्रगतीसाठी पर्यायी ऊर्जास्रोतांचा मोठा वापर झाल्याखेरीज तापमानवाढीच्या समस्येला पुरेशा प्रमाणात आळा बसणार नाही, याकडे सर्वच देशांनी लक्ष देण्याची गरज आहे.