लोकाभिमुख विज्ञान आणि विज्ञानाभिमुख लोक

भारताने वायुसेनेच्या इतिहासात प्रथमत: लेझर गायडेड स्पाइस-२००० बाँबचा प्रयोग केला हे विज्ञानदिनी लोकांना कळायला हवे. ते १००० किलो वजनाचे असतात. ते लक्ष्याचा अचूक भेद घेतात. रडार यंत्रणेलाही ते वरून वेगाने जाताना पत्ता लागत नाही. त्यांना डोंगर, दऱ्या, जंगले काही अडवू शकत नाही. लढावू विमाने ६० ते १०० किमी. अंतरावरून लक्ष्याचा भेद घेऊ शकतात हे आपल्या जनतेला कळायला हवे.

Story: नंदनवन: डॉ. नंदकुमार कामत |
28th February 2019, 06:00 am

लेझर गायडेड बाँब हे बाबा काय प्रकरण आहे, हे कळून न घेताच मंगळवारी देशाने, गोव्याने आनंदोत्सव साजरा केला. तंत्रज्ञान म्हणजे भारतीयांना जादू वाटते. कुठचेही तंत्रज्ञान त्यांना समजून घ्यायचे नसते. त्यामुळे यापूर्वी इतिहासात कधीही नव्हते एवढे बुवाबाजीचे स्तोम माजले आहे. भारताला परचक्रांतून, आक्रमणांतून वाचवण्यासाठी ज्यांचा कधीही उपयोग झाला नाही अशी शस्त्रे, अस्त्रे, पोथ्या-पुराणांतून असंख्य लोक धुंडाळीत असतात. भवानीमाता जर त्रिकालदर्शी होती तर तिने छत्रपती शिवाजीमहाराजांना तलवार का दिली, एके४७ का नाही? १५५६मध्ये गोव्यात ​पाश्चिमात्य धर्तीचा छापखाना सुरु झाला मग मराठ्यांनी, पेशव्यांनी मुद्रणकलेचा प्रसार का केला नाही? आज राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे, ‘लोकाभिमुख विज्ञान आणि विज्ञानाभिमुख लोक’. या संकल्पनेवर सर्व शैक्षणिक, संस्थांमध्ये आज कार्यक्रम होणे अपेक्षित आहे.
लोकाभिमुख विज्ञान म्हणजे सोप्या पद्धतीने सामान्य लोकांपर्यंत विज्ञान आणि त्याहून महत्त्वपूर्ण वैज्ञानिक दृष्टी पोहोचविणे. भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा पार करून २१ मिनिटांमध्ये दहशतवाद्यांचे चार तळ नेस्तनाबूत केले. त्यामागे फार प्रबळ तंत्रज्ञान आहे. ग्वाल्हेरच्या वायुसेनेच्या तळावरून मिराज-२००० गटातील १२ विमाने उडाली. २०१५ मध्ये या विमानांत खास शिरस्त्राणांची सोय करण्यात आली होती. त्यात आपल्या नजरेसमोर वैमानिकाला अचूक लक्ष्य दाखवणारा माहितीपूर्ण पडदा असतो. लक्ष्यापासून फार मोठ्या अंतरावर उडत राहून इस्त्राएलने पुरविलेल्या ‘पेंटर’ या साधनाद्वारे एक अदृश्य ऊर्जाझोत लक्ष्यावर आधी टाकला जातो. त्यामुळे ते ‘लक्ष्य’ वैमानिकांच्या नजरेसमोर त्याला ‘उजळलेले’ दिसते. ते उजळलेले नसले तर वैमानिकाला फेरफार करून ते पुन्हा ‘उजळून’ घेणे शक्य होते. एकदा संगणकाद्वारे लक्ष्याची पकड घेतल्यावर पुढची कृती विलक्षणच म्हणावी लागेल, कारण ‘लेझर गायडेड बाँब’ची लक्ष्यवेधी यंत्रणा वैमानिक जे दृश्य पहातो त्याकडे एकरुप होते. फक्त डोके इथे तिथे हलवून वैमानिक लक्ष्य पुन्हा संपादित करू शकतो. भारताने इस्रायलकडून खरेदी केलेले स्पाइस-२००० हे बाँब वापरले असण्याची शक्यता आहे. ते १००० किलो वजनाचे असतात. उपग्रहाचा वापर करून १०० कि.मी.अंतरावरून हे रॉकेटच्या आकाराचे निमुळते बाँब टाकता येतात. ते लक्ष्याचा अचूक भेद घेतात. रडार यंत्रणेलाही ते वरून वेगाने जाताना पत्ता लागत नाही. त्यांना डोंगर, दऱ्या, जंगले काही अडवू शकत नाही. भारताने वायुसेनेच्या इतिहासात प्रथमत: लेझर गायडेड स्पाइस-२००० बाँबचा प्रयोग केला हे विज्ञानदिनी लोकांना कळायला हवे. लढावू विमाने ६० ते १०० किमी. अंतरावरून लक्ष्याचा भेद घेऊ शकतात हे आपल्या जनतेला कळायला हवे, कारण गोवा मुक्तीच्या वेळी पुण्याहून उडालेल्या विमानांनी दाबोळी विमानतळ व बांबोळी रेडिओ केंद्रावर बाँब टाकले होते. समजा आज ही कारवाई करायची झाली असती तर भारतीय हद्दीतील अवकाशात राहून भारतीय वायुसेनेने बाहेरच्या बाहेर पोर्तुगीज तळ उद्ध्वस्त केले असते. राफेल विमानांच्या किमतीवरून अजून वाद चालू आहेत. पण फार थोड्यांनी ‘सेक्युरिंग इंडिया द मोदी वे’ या नितीन गोखलेंच्या पुस्तकाची दखल घेतली आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी राफेल विमानात अत्याधुनिक क्षेत्रणास्त्रांची तरतूद करून ठेवली होती. गोखले या क्षेपणास्त्रांना ‘इंडिया स्पेसिफिक वेपन्स स्युईट’ म्हणतात. त्याचा अर्थ २६ फेब्रुवारीसारखी धडाक्यात कारवाई करायची झाल्यास लागणारी प्रगत व फार किमती अस्त्रे. आता ही अस्त्रे कसली हे पर्रीकरांनी कशाला जगाला सांगायला हवे? स्पाइस-२००० भारतीय वायुसेनेपाशी आहे हा शोधही पत्रकारांना २६ फेब्रुवारीला लागला. म्हणून लोकाभिमुख विज्ञानालाही काही मर्यादा आहेत. पृथ्वी आपोआप स्वत:भोवती का फिरते हे फारच कमी विद्यार्थ्यांना सांगता येते, तेथे सामान्यांचे काय?
लोकाभिमुख विज्ञानात अंधश्रद्धांचा मोठा अडथळा आहे. सूर्य वा चंद्रग्रहणांच्यावेळी आपल्या देशात त्याचा अनुभव येतो. गोव्याचे बहुसंख्य राजकीय नेते भयंकर अंधश्रद्धाळू आहेत व ते त्यांना अंधश्रद्धाळू मतदारांमुळे पचून जाते. युवावर्ग तर नवनव्या आधुनिक अंधश्रद्धांच्या आहारी गेलेला दिसतो. मध्यंतरी गोव्यात चुंबकीय गाद्यांची जोरदार विक्री चालली होती. त्यापूर्वी पणजीत रांगा लावून हजारो अंधश्रद्धाळूंनी डोळ्यात कसलेतरी औषध घालून घेतले. विष्णू वाघांना तर बुवाबाजीचा प्रचंड तिटकारा होता, पण त्यांच्या अंधश्रद्धाविरोधी जीवनाचा शेवट कसा झाला त्यावर चर्चा करून मनस्ताप करून घेण्यात काही फायदा नाही. विज्ञानाभिमुख लोक गोव्यात जन्मणे अशक्यप्राय आहे. कारण मग सगळी प्रार्थनास्थळे ओस पडतील. म्हणून भल्याभल्यांना सावरकर, विवेकानंद पचविणे फार जड जाते. धर्माच्या गुलामगिरीतून विज्ञान माणसाला मुक्त करते. धर्मात विषमता तर विज्ञानात समता आहे, म्हणून मी जो मोबाईल वापरतो तसाच एखादा हमालही वापरू शकतो. लोकांचेही एक फार मोठे पारंपरिक विज्ञान आहे आणि लोकवेदसंशोधक विनायक खेडेकरांनी आपल्या पद्धतीने हे लोकविज्ञान संग्रहित करण्याचा स्तुत्य प्रयत्न केलेला आहे. या संग्रहित ज्ञानाची चिकित्सा, मीमांसा अजून शिल्लक आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा फक्त उपभोग घेणारा एक सुखवस्तू समाज आज गोव्यात उदयाला आला आहे. वैज्ञानिक दृष्टी त्यांच्या अडचणींची आहे. त्यामानाने भारतीय वायुसेनेने बाँब वगैरे टाकल्यावर उत्तेजित होणे सोपे असते पण थोडा प्रयत्न करून हे कुठच्या तंत्रज्ञानाने साध्य केले ते कोण बघतो?