विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती


17th February 2019, 05:18 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                              

पणजी : माजी उपसभापती तथा साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांचा मृतदेह रविवारी सकाळी ८.४५ वाजल्यापासून फोंडा येथील बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. त्यांच्या पार्थिवावर फोंडा नगरपालिकेच्या मुक्तिधाम स्मशानभूमीत सायंकाळी ३.३० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.                        

कला अकादमीत शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कला आणि संस्कृती​ खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर व देविदास आमोणकर उपस्थित होते. वाघ यांचा मृतदेह रविवारी पहाटे २.४० वाजता दक्षिण आफ्रिकेतून दाबोळी विमानतळावर दाखल होईल. त्यानंतर पहाटे ४ वाजता तो ढवळी-फोंडा येथील निवासस्थानी आणला जाईल. त्यानंतर सकाळी ८.४५ वाजता अंत्यदर्शनासाठी तो बांदोडकर मैदानावर ठेवला जाईल, असे मंत्री गावडे म्हणाले.                         

विष्णू वाघ हे गोव्यासह इतर राज्यांतही प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांचा चाहतावर्ग देशभर आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी त्यांचे मित्र, चाहते व हितचिंतकांची गर्दी होणार आहे. त्यामुळेच त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी बांदोडकर मैदानावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.             

वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी ढवळी बायपासवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक फर्मागुडी बाजारातून वळविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. अंत्यदर्शनावेळी ढवळी व फोंडा परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमात कसलीच उणीव राहू नये, याची पूर्ण खबरदारी सरकारने घेतली आहे, असेही मंत्री गावडे यांनी नमूद केले.                        

विष्णू वाघ यांच्या अंत्यदर्शनासाठी बांदोडकर मैदानावर मंडप उभारण्यात आला आहे. तेथे एका बाजूला अंत्यदर्शन व दुसऱ्या बाजूला विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात विष्णू वाघ यांच्या कवितांची सीडी दिवसभर ऐकविली जाणार आहे. वाघ यांच्या कवितांचे वाचन व उपस्थित मान्यवर मनोगत व्यक्त करतील, अशी माहिती मंत्री गावडे यांनी दिली.

आपली अंतिम यात्रा आनंदयात्रा असावी, अशी इच्छा विष्णू वाघ यांची होती. त्यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे.       

— देविदास आमोणकर, 

विष्णू वाघ यांचे मित्र.

हेही वाचा