क्रोध हा खेदकारी

टीपकागद

Story: प्रतिभा कारंजकर |
16th February 2019, 12:19 pm


आपण सिनेमात पहातो. एक माणूस तावातावाने भांडत राग व्यक्त करत असतो... आणि मध्येच छातीवर हात ठेवतो, कारण त्याला हृदयविकाराचा झटका आलेला असतो. तर हा सगळा त्या अनावर झालेल्या रागाचा परिणाम असतो. असाच दुसरा प्रसंग म्हणजे रागाच्या भरात तावातावाने घराबाहेर येऊन गाडी सुरु करतो आणि हमखास अपघात करतो. सिनेमातले हे प्रसंग म्हणजे अभिनय असला तरी प्रत्यक्षात तसंच होतं, म्हणूनच तसं दाखवलेलं असतं.
शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी संताप किंवा राग येणं ही अत्यंत वाईट गोष्ट. माणसांच्या षड्रिपू पैकी क्रोध हा सर्वात मोठा शत्रू. संताप सदसद्विवेकबुद्धीला झाकोळून टाकतो. मनावर हावी होतो. संतापाच्या भरात नको ते निर्णय उतावीळपणे घेतले जातात. त्यावेळी चूक किंवा अपराधही घडू शकतो. संतापी माणसाच्या वाटेला कुणी जात नाहीत, कारण तो कधी भडकेल सांगता येत नाही. वसकन अंगावर येईल, या भीतीने घरातले तर भिऊन राहतातच, बाहेरचेही घाबरून रहातात. लोकांना आलेला अनुभव हा त्याच्यापासून चार हात लांब रहाण्याचा सल्ला देतो. त्यामुळे अशा माणसाकडे माणसांची वानवाच असते. जवळची नाही परकीही नाही. मित्रमंडळी सुद्धा जवळ फिरकत नाहीत.
संस्कृतमध्ये एक श्लोक आहे,
क्रोधो हि शत्रु प्रथमो नराणां देहस्थितो देहविनाशयाय
यथा स्थितो काष्ठगतो ही वहीन स एव वहीन दहते शरीरम
संताप माणसाचा पहिला शत्रू आहे. लाकडात अग्नी सुप्त असतो आणि पेट घेताच तो या लाकडालाच जाळून टाकतो. तसाच संताप आपल्यात असतो. हवा मिळताच भडकतो आणि शरीराला अपाय करतो. राग येणं ही नैसर्गिक सामान्य भावना. नापसंती दाखवताना आदळआपट करणं, रुसवा धरणं, गाल फुगवून बसणं, अबोला धरून आत धुमसत रहाणं, हे रागाचे विविध पैलू. कुणी टीका केली, टोचून बोललं, धमकी दिली, मनाविरुद्ध वागला की राग उफाळून येतो.
षड्रिपू मनावर परिणाम करतात, तसेच त्याचे शरीरावरही परिणामही होतात. क्रोधामुळे संताप अनावर होतो तेव्हा त्याच्या छातीचे ठोके वाढतात, कानशिले गरम होतात, रक्तदाब उसळतो व परिणाम हृदयावर होतो. अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो. राग व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगळी तऱ्हा असते. कुणी मोठ्याने ओरडतात, कुणी दातओठ खातात, चेहरा क्रुद्ध करतात, अंगावर धावून जातात. मारामारीपर्यंत मजल जाते. शारीरिक परिणाम तर दिसतातच, मानसिक परिणामही दिसून येतात. अशी माणसे व्यसनाधीनतेकडे वळताना दिसतात. राग दाबून ठेवताना कुणाला नैराश्याचा झटका येऊ शकतो. काहींना अपराधीपणाची भावना रहाते. लहरीपणा येतो. काही माणसे स्वतःला इजा करून घेतात किंवा दुसऱ्याला इजा करू शकतात. काही जण आत्महत्येचा प्रयत्न करतात.
कुणाला कुठल्या कारणांवरून राग येईल सांगता येत नाही. स्वच्छतेची आवड असणाऱ्याला अस्वच्छतेमुळे राग येतो. वाईट वागणे किंवा कुणावर अन्याय होताना पाहिला तरी राग येतो. कुणी फसगत केली, व्यभिचार, प्रतारणा, अपयश, निराशा अशा कुठल्याही कारणाने राग अनावर होऊ शकतो. पण त्यावर ताबा मिळवणं यातच खरी कसोटी. सारासार विचार करून समंजसपणे वागणं म्हणजे इतरांना व आपल्यालाही त्रास न करून घेता जगणं होईल.
राग आला की एक ते शंभर आकडे मोजावेत, असं म्हटलं जातं. त्या मागचा हेतू म्हणजे मनात परिस्थितीचा विचार केला तर राग शांत व्हायला मदत होते. त्यासाठी अवधी हवा म्हणून आकडे मोजायचे. मनावर संयम आणि तोंडावर ताबा यामुळे बरीचशी कामे सोपी होतात. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडीसाखर ठेवली की रागावर नियंत्रण ठेवायला सोपे पडते. अर्थात हे सांगणे जितके सोपे, तितकेच करणे अवघड.
कुणी सांगतात राग आला की घोटभर पाणी प्यावं, जेणेकरून रागाची तीव्रता कमी होईल. कुणी म्हणतात रागावर नियंत्रण ठेवायला योग, ध्यान करावे. रागाची भावना थोडी सौम्य होईल. दुसऱ्याला माफ करणं, यानेही रागाची भावना नियंत्रणात येईल. प्राणायामाला प्राधान्य दिलं तर श्वासाकडे मनाचे लक्ष केंद्रित होईल व रागाची भावना बोथट होत जाईल. रागीट स्वभाव नातेसंबंध बिघडवतो. कामांमध्ये खो घालतो. राग येणं ही चुकीचीच गोष्ट आहे हे माहीत असूनही आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशावेळी हातून मोठ्या चुका घडू शकतात, त्यासाठी राग गिळून टाकता आला पाहिजे.
क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रम. स्मृती भ्रशांत बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती....
(लेखिका गृहिणी, साहित्यिक आहेत.)