ब्रह्मानंदी आनंद देणारा कलाकार

रुपेरी पडदा

Story: सौ. विद्या नाईक होर्णेकर |
16th February 2019, 12:11 pm
ब्रह्मानंदी आनंद देणारा कलाकार


असे म्हणतात की एखाद्याला रडवणे सोपे असते, परंतू हसवणे कठीण... मग एखादी व्यक्ती जर हेच अवघड काम अगदी लीलया करत असेल, तर... त्याच्या गुणवत्तेची केवळ कल्पनाच केलेली बरी. अशी ही गुणवत्ता ठासून भरलेली व्यक्ती म्हणजे, ब्रह्मानंदम कनगनती. त्यांचे आडनाव तुमच्या विशेष परिचयाचे नसेलही कदाचित, परंतु ‘ब्रह्मानंदम’ या नावाला वेगळ्या ओळखीची आवश्यकता भासता कामा नये.
‘डब’ चित्रपटांची जी मालिका खासगी वाहिन्यांवर पहावयास मिळते, त्यात दाक्षिणात्य चित्रपटांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपट लावले की, ठरावीक चेहरे वारंवार पहावयास मिळतात. हे चेहरे भारतीय प्रेक्षकांना पूर्वी कधीही नव्हते इतके ‘फेमिलिअर’ झालेले आहेत. अशाच चेहऱ्यांपैकी एक म्हणजे ‘ब्रह्मानंदम’. आज त्यांचा वाढदिवस वा त्यांच्याशी निगडीत काही आहे, असे नाही. पण, नुकतेच वाचनात आले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्यावेळी त्यांना काही तास कठीण जातील, असे डॉक्टरांनी सांगितले व त्यांच्या कुटुंबियांसमवेतच त्यांच्या चाहत्यांचा जीवही टांगणीस लागला.
या आजारातून ते सुखरूप बाहेर यावेत म्हणून नवस बोलले गेले, प्रार्थना केल्या गेल्या. त्यांच्या चाहत्यांनी घातलेले साकडे देवाने ऐकले व ब्रह्मानंदम मृत्यूशी झुंज देत सुखरूप परतले. सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. पण, त्यांच्याविषयी त्यानंतर विशेष काही वाचनात आले नाही. त्यामुळे अन्य भागातील त्यांचे चाहते, त्यांच्या तब्येतीबाबत जाणून घेण्यास उत्सूक होतेच. अशातच दाक्षिणात्य सुपरस्टार अलु अर्जुनने त्यांच्या भेटीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. अपेक्षेप्रमाणे त्याला चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या, हे वेगळे सांगावयास नको. हा फोटो पाहताना एक गोष्ट नक्कीच जाणवली की, अर्जुनने म्हटल्याप्रमाणे ब्रह्मानंदम हे खरोखरच एक ‘आयर्न मॅन’, एक मजबूत हृदयाची व्यक्ती, मजेदार आणि निडर आहेत. कारण चाहत्यांना वेड लावणारा त्यांच्या चेहर्‍यावरील भाव आजही कायम आहे. ही व्यक्ती हृदयशस्त्रक्रियेला सामोरी जाऊन आलेली आहे, अशी पुसट कल्पनाही कुणाला तो फोटो पाहिल्यावर येणार नाही.
ब्रह्मानंदम यांच्या अभिनय क्षमतेबरोबरच नसानसांत भिनलेला विनोद हे त्यांच्या यशाचे गमक म्हणता येईल. कारण त्यांना विनोद सादरीकरणासाठी कधीही चाकोरीबाहेर जाऊन काही करण्याची गरज भासली नाही. त्यांचे रुपेरी पडद्यावर येणेच पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्यलकेर घेऊन येते. त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना याच गोष्टीवरून केली जाऊ शकते की, अगदी एका शॉटसाठीही त्यांना लाखोंचे मानधन देताना निर्माता - दिग्दर्शक कचरत नाहीत. त्यांच्या एका चित्रपटाचे मानधन १ कोटी असून, या संपूर्ण चित्रपटात त्यांची उपस्थिती क्वचितच लांब पल्ल्याची असते. त्यांना एका दृश्यासाठी ३ ते ५ लाख रुपये दिले जातात. भूमिकेच्या लांबीपेक्षा तिची गुणवत्ता सिद्ध करणाऱ्यांपैकी ब्रह्मानंदम एक महान कलाकार आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर भूमिकांचा वर्षाव होतो.
हेच कारण असावे की, आज त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. हा विक्रम २००७ मध्ये एकाच भाषेत ७०० पेक्षा जास्त चित्रपटात अभिनय करण्यासाठी नोंदवण्यात आला आहे. त्यांनी तीन दशकांच्या दीर्घ करियरमध्ये १००० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे मानधन पाहता, त्यांची सांपत्तिक स्थिती वेगळी सांगावयास नको. ब्रह्मानंद यांच्याजवळ अनेक लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. ज्यात ऑडीपासून मर्सिडीज बेंजचा समावेश आहे. कित्येक एकर जमीन असून, हैदराबादच्या उच्चभ्रू भागात म्हणजे ‘ज्युबली हिल्स’ येथे एक आलिशान बंगला आहे.
आज कोट्यवधींची मालमत्ता असलेले, ब्रह्मानंदम अगदी शून्यातून वर आले आहेत. ते अत्यंत गरीब कुटुंबातून आले आहेत. जन्म आंध्रप्रदेशातील साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात दि. १ फेब्रुवारी १९५६ रोजी झाला. मात्र, परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता त्यांनी कष्टांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणारे ते कुटुंबातील पहिलेच. त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यावेळी मुलांना हसत खेळत व मिमिक्री करत शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. एकदा आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत त्यांना अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला व त्यांची अभिनयातील रुची वाढली. ब्रम्हानंद यांना ‘मोद्दाबाई’ नावाच्या नाटकामध्ये काम करताना पहिल्यांदा तेलगु चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक जन्धयाला यांनी पाहिले. त्यांचे या नाटकातील काम पाहून ते एवढे प्रभावित झाले की, आपल्या ‘चन्ताबाबाई’ चित्रपटामध्ये त्यांनी ब्रम्हानंदम यांना एक छोटीशी भूमिका करण्याची संधी दिली. त्यात त्यांची छोटीशी परंतु, लक्षणीय भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरलीच, शिवाय त्यांच्या आयुष्यातही एक सुवर्ण वळण घेऊन आली. आज त्यांच्या चित्रपटांची व पुरस्कारांची संख्या बरीच आहे. पद्मश्रीपासून अनेक मानसन्मान प्राप्त करणाऱ्या या कलाकाराला दीर्घायुष्याची देणगी लाभावी, हीच सदिच्छा.