राष्ट्रीय राजकारण कूस पालटतंय!

परामर्श

Story: प्रा. अशोक ढगे |
16th February 2019, 12:02 pm
राष्ट्रीय राजकारण कूस पालटतंय!


---
बदल हा सृष्टीप्रमाणेच समाजरचना आणि समाजव्यवस्थेचा स्थायी भाव आहे हे त्रिवार सत्य आहे. आजचे संदर्भ उद्या बदललेले असतात. याच न्यायाने एकीकडे भाजपाने अवघ्या दोन खासदार संख्येवरून संपूर्ण बहुमताचा आकडा पाहिला तर आता ४४ या मानहानिकारक संख्येवरून पुढे जाण्यासाठी काँग्रेसने सगळं बळ एकवटलं आहे. अर्थातच त्यांच्यापुढील पहिलं ध्येय जनतेच्या स्मृतीपटलावरील धोरण-लकव्याने ग्रस्त सरकार आणि अबोलतेचं व्रत जपणारे पंतप्रधान ही पक्षाची ओळख पुसून टाकणं हे आहे. गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरी निवडणुकांच्या ऐन तोंडावर आलेला ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सारखा चित्रपट असो वा रॉबर्ट वद्रांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावण्याचा भाजपाचा धूर्त डाव असो, अशा प्रकरणांमुळे सरकार काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवण्याचा रितसर प्रयत्न करत आहे. मात्र, आता सावध झालेल्या आणि अलिकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत घवघवीत यश पदरात पडल्यामुळे चैतन्य परतलेल्या काँग्रेसमध्ये कडवा विरोधक म्हणून उभं राहण्याचं धैर्य आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिबिंबासम भासणाऱ्या आणि वागणाऱ्या प्रियांका गांधींना पक्षाचं सरचिटणीसपद देऊन त्यांना निवडणुकांच्या मैदानात उतरवण्याचा डावही रंग दाखवणार आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून विरोधकांची मोळी बांधून ती खांद्यावर तोलण्यात आणि तिचा जोरदार प्रहार करत भाजपाच्या स्वप्नाचं भंजन करण्यात राहुल गांधी यशस्वी होतील अशी आशा निर्माण झाली आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत समाजातल्या एका मोठ्या वर्गाला काँग्रेसने पुढे केलेलं राहुल गांधी यांचं राष्ट्रीय नेतृत्व अपरिपक्व भासत होतं. भाषणात अडखळणारे, आकड्यांचा संदर्भ देताना घोळ घालणारे, एक साधी प्रतिक्रिया लिहिण्यासाठीही वारंवार मोबाईलमध्ये बघणारे, संसदेत मोदींच्या गळ्यात पडून समवयस्क सहकाऱ्याला डोळा मारणारे अशा अनेक नकारात्मकतेने राहुल गांधींची इमेज काळवंडली होती. त्यांच्या वारंवार घेतल्या जाणाऱ्या आणि दीर्घकाळ परदेशात घालवल्या जाणाऱ्या सुट्ट्या हा टीकेचा विषय ठरत होता. मात्र या सगळ्यातून आपण स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतोय हे समजल्यानंतर राहुल गांधीनी व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवून आणला आणि रोखठोक तसंच जोरकस आरोप करत भाजपाविरोधात रण माजवायला सुरूवात केली. त्यामुळेच आता मोदींच्या ५६ इंच छातीशी टक्कर घेण्यास काँग्रेस सज्ज आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी बारीकसारिक बाबीतून प्रतिमावर्धनाचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरीच ते कार्यकर्त्यांना ‘मोदी मुर्दाबाद’ च्या घोषणा देऊ नका, असं सांगून वेगळा राजकीय पायंडा पाडताना दिसले. मोदींच्या नेतृत्वाबद्दल वेडंवाकडं न बोलता भाजपचं धोरण फक्त मूठभर उद्योगपतींना कसं अनुकूल आहे, हेच राहुल यांनी वारंवार लोकांच्या मनात बिंबवलं. ज्या समाजमाध्यमांचा वापर फक्त भाजप करत होता, त्याच समाजमाध्यमांचा आधार घेऊन राहुल भाजप आणि मोदींवर तूटून पडत आहेत. मोदींची ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा कशी फसवी आहे आणि ते काही लोकांसाठीच कसं काम करतात, हे ते वारंवार मांडत आहेत. त्यांनी राफेलसंबंधातल्या अनेक बाबी जनतेसमोर मांडल्या. राफेलच्या वाढलेल्या किंमतीप्रमाणेच अजिबात अनुभव नसताना या व्यवहारात अनिल अंबांनीच्या अस्तित्वाबाबत रास्त प्रश्न उपस्थित केले. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांची मुलाखत त्यांच्या मांडणीचं समर्थन करणारी ठरली. या सगळ्यामुळेच आत्तापर्यंत टीकेची फारशी दखल न घेणारा भाजप आता राहुल यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी फौज मैदानात उतरवतो, हेच राहुल नीतीचं यश आहे. नोटाबंदीच्या प्रतिकूल परिणामाबद्दल ते अजूनही बोलत असतात. जीएसटी, नोटाबंदीच्या काँग्रेससह अन्य विरोधकांच्या टीकेमुळे तर भाजपला काही निर्णय बदलावे लागले.
सोनिया गांधी यांनी आपल्या परीने भाजपाला टक्कर दिली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या खांद्यावर जबाबदारीची धुरा आली. ती पेलण्यासाठी आपण सक्षम आहोत हे आता ते प्रकर्षाने दाखवून देऊ लागले आहेत. गुजरातच्या निकालानं पालटलेलं वातावरण काँग्रेस आणि राहुल या दोघांना आश्वासक ठरलं. त्यानंतर छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशामधली भाजपची सत्ता काँग्रेसनं उलथवून टाकली. उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसला दूर सारत युती केली, तरी त्यावर राहुल यांनी फारसा आक्रस्ताळेपणा केला नाही. उलट, त्या दोघांना शुभेच्छा देताना काँग्रेस हतबल झालेली नाही, तर स्वबळावर ऐंशी जागा लढवेल, असं जाहीर करून टाकलं. अर्थात याचा अर्थ आता लगेच काँग्रेसला चांगले दिवस येतील, असं नाही; परंतु जी काँग्रेस नाऊमेद झाली होती, गलितगात्र झाली होती, जिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, ती उठून कामाला लागली. मोदी यांचा प्रतिवाद करायला लागली, हेही नसे थोडके. सध्याच्या परिस्थितीत देशातली लोकशाही मजबूत होण्यासाठी समर्थ विरोधी पक्ष हवा आहे. असा समर्थ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभं करण्यात राहुल यांना यश मिळालं, तरी खूप झालं.
प्रियांका गांधीच्या आगमनामुळे आणि सक्रिय सहभागामुळे हे चित्र अधिक देखणं होणार आहे. कारण व्यक्तिपूजक भारतीय समाज प्रियांकामध्ये इंदिराजींची छबी शोधतो. प्रियांका यांच्या पेहरावाची पद्धत आजीसारखीच आहे. त्यांच्यात बरीच साम्यस्थळंही आहेत. त्या लोकांमध्ये सहज मिसळतात. सहजपणे संवाद साधण्याची त्यांच्यात हातोटी आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये बराच फरक पडू शकतो. कारण इथं अजूनही इंदिरा गांधींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. अर्थात एवढी एक गोष्ट पूर्व उत्तर प्रदेशचं गणित बदलू शकेल का? भाजप आणि मोदी यांना पराभूत करण्यासाठी पुरेसं ठरेल का? मायावती आणि बहुजन समाज पक्षाचं सोशल इंजिनीयरिंगला पर्याय ठरेल का? हा प्रश्न आहे.
रॉबर्ट वद्रा यांच्या चौकशीचा मुद्दाही जबाबदारीने हाताळला जावा, यासाठी काँग्रेस आणि प्रियंका गांधी हुशारीने पावलं उचलत आहेत. या विषयावर जनमत संघटित करत आहेत. रॉबर्ट यांनी चुकीचं काही केलं असेल तर चौकशी व्हायलाच हवी. फक्त प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय होण्याची वाट भाजप पाहत होता का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजघडीला त्यांची, त्यांच्या वृद्ध आईची हरियाणापासून जयपूरपर्यंत विविध ठिकाणी चौकशी होत आहे. चौकशी करताना पुढे केले जात असलेले आरोपही ठोस असण्याची गरज आहे. अन्यथा यामुळे राहुल-प्रियांकाप्रती सहानुभूती वाढेल जे काँग्रेसच्या थेट पथ्यावर पडेल. परिणामी, काँग्रेसला उर्जितावस्थेकडे नेण्यासाठी आजघडीला प्रयत्न केले जात आहेत. यामुळे देशाच्या राजकारणाने कूस पालटली तर आश्चर्य वाटायला नको.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)