बाल लैंगिक छळ: ‘बॅड टच, गूड टच’ पलीकडची समस्या

विशेष

Story: प्रकाश वा. कामत |
16th February 2019, 11:57 am


---
नुकतेच गोवा बालहक्क आयोगाच्या वतीने पणजीत गोवा बाल कायदा २००३ आणि नियम २००४ यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी एक चर्चासत्र झाले. यात विविध भागदारक सामील असल्याने बालहक्कांविषयी अनेक विषय उपस्थित होणे, साहजीकच होते. गोवा बाल न्यायालयाच्या सरकारी वकील मिल्टन गोमीश, पिंटो यांनी उपस्थित असलेले शिक्षण संचालक एन. जी. होन्नेकेरी यांना उद्देशून शाळांतील मुलांच्या लैंगीक छळाचा गंभीर विषय उपस्थित केला. बाल न्यायालयात या विषयावरील तक्रारी वाढल्या असून शिक्षण खात्याने मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ‘बॅड टच आणि गूड टच’ (वाईट स्पर्श, चांगला स्पर्श) सारख्या विषयांवर कार्यशाळा घेऊन याविषयावरील जागृती मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. नंतर हा विषय चर्चिला गेला. त्यात संचालकांच्या मते असे कार्यक्रम शाळांमध्ये सातत्याने केले जातात आणि यावर जास्त भर देण्याचे त्यांनी मान्य करून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
‘बालहक्क’ विषयावरील जागृत वकील आल्बर्टीना आल्मेदा यांनी दोन मुद्दे उपस्थित केले. ते म्हणजे शाळांमधून असले संवेदनशीलता जागवणारे कार्यक्रम बहुधा शालेय वर्षाच्या दुसऱ्या सत्रात होत असतात. म्हणजेच या विषयावरील ज्ञान काही मुलांना त्यांनी असले प्रकार अनुभवल्यावर देण्यात येते. त्याऐवजी शाळा सुरू होताना म्हणजे जून- जुलै महिन्यात हे केल्यास मुलांमध्ये जागृतीच्या दृष्टीने ते अधिक उपयुक्त ठरेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, तो म्हणजे गोव्यातील शाळांमध्ये जी मुलांसाठी मन-सल्लामसल (शिक्षक) सेवा सध्या अस्तित्वात आहे, त्यानुसार एक असा सल्लागार एकाच बरोबर अनेक शाळांसाठी नेमला जातो.
मुलांसाठी मानसिक विकार अथवा लैंगिक छळ समस्या यासाठी सातत्यपूर्ण सल्ला सेवेची गरज असते. मूल एखाद्या मन-सल्लागाराकडे खुले होण्यात मुळात वेळ घेत असते. जेव्हा मूल त्याचा/तिचा विश्वास कमावते, त्याचवेळी तो मन-सल्लागार दुसऱ्या शाळेमध्ये पाठवला जातो. यामुळे या सेवेत गांभीर्य किती व त्याची फलनिष्पत्ती किती, असा रास्त सवाल वकील आल्मेदा यांनी उपस्थित केला. हा प्रश्न गंभीर असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आल्याने त्यावर सरकारकडे मन-सल्लागार मनुष्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे शिक्षण संचालक होन्नेकेरी यांनी मान्य केले.
मुळांत जो प्रश्न सरकारी वकिलांनी उपस्थित केला, तो आजच्या घडीला शाळांतच नव्हे तर एकूणच समाजात मुलांच्या हक्क व निकोप वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होय. हल्लीच बंगलोरच्या Muktha Foundation या संस्थेच्या अश्विनी एन. व्ही. या संस्थापक संचालक गोव्यात येऊन गेल्या. ही संस्था मुलां-पालकांमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी जागृती करीत असते. देशभर या संस्थेतर्फे असे जागृती कार्यक्रम केले जातात. अश्विनी स्वत: एक मनोतज्ञ. त्यांच्या मते त्यांच्या अनुभवाप्रमाणे एकूण ७० ते ८० टक्के प्रौढ मानसिक रुग्ण हे बालपणी अथवा तरुणपणी लैंगिक शोषण अथवा घरगुती हिंसाचार, छळ यांचे बळी असतात. त्यामुळे मुलांचे लैंगिक अथवा अन्य शोषण हा समाज मानतो त्यापेक्षा कितीतरी गंभीर विषय होय. देशाच्या पोलिस यंत्रणेच्या आकडेवारीनुसार आपल्या देशात बाललैंगिक शोषणात ओळखीची व्यक्ती गुन्हेगार असण्याचे प्रमाण ७० टक्केच्या वर असते. म्हणजेच घरातील व्यक्ती, शेजारी, नातेवाईक अथवा शाळेत जाणाऱ्या मुलांशी शाळेत अथवा वाहतुकीत संपर्कात येणारी व्यक्ती यामध्ये मोडतात.
शाळेत जाणारा सात वर्षीय अमोल आपल्या घरात स्टडीमध्ये जाण्यास घाबरतो. शाळेतील शिक्षिकेने विश्वासात घेतल्यानंतर अनेक दिवसांत गौप्यस्फोट होतो. घरातील त्याचा माेठा चुलत भाऊ टीव्ही पहात असताना स्वत:च्या मोबाईलवर त्याला लैंगिक व्हिडिओ, बिभत्स फोटो दाखवत असतो. जे चाललंय ते बरोबर नव्हे, ही गुन्हेगारी भावना त्याच्या मनात रुजते, परंतु हे पालकांसमोर व्यक्त नेमके कोणत्या शब्दांत करावे व त्याचे परिणाम काय होतील, ही भीती त्याला टीव्ही रुमविषयीच भीतीने पछाडते. आजच्या डिजीटल, इंटरनेट युगात लैंगिक शोषण खूप पुढे गेले आहे. सरिता (९) शेजारच्या ट्यूशन टीचरकडे जात असते. ट्यूशन टीचर तिला थोडावेळ आपल्या लॅपटॅपवर कार्टून बघण्याची सवलत देताे. काही दिवसानंतर कार्टूनऐवजी अश्लील चित्रे, पुरुष लिंग इत्यादी चित्रे अधूनमधून येतात. मुलगी बिथरते. काय करावे न समजून एक- दोन दिवसानंतर शिक्षकाला विचारते, सर मला हे आवडत नाही. कार्टून नसेल तर मला नको. शिक्षक बेरकी. तिला विचारतो, ‘हे किती दिवस तू पाहिलेस आणि आज सांगते पहायला नको? मी तुझ्या आईवडिलांना सांगेन. तू असली चित्र पहातेस. माझे ऐकले नाही तर’. कुठे आले ‘गूड टच, बेड टच?
आपण शाळांमध्ये मोठ्या गंभीरपणे ‘गूड टच, बेड टच’, अनोखी माणसाकडून काहीही खाण्याच्या वस्तू, वगैरे घेऊ नये हे शिकवतो. वरील उदाहरणात जे शोषण चाललेय तिथे स्पर्श न करताच चाललेय. मग डोळ्यात केवळ ‘गूड टच, बेड टच’ बसलेली मुले हे प्रकार शोषण म्हणून समजतील तरी कशी?
म्हणजेच नव्या तंत्रज्ञानयुगाप्रमाणे मुलांना शोषणाचे शिक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल आवश्यक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच मुलांना शोषक शिकारी ओळखण्यासाठी सक्षम करणे (अँपावरमेंट) अत्यंत गरजेचे ठरते. केवळ चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, तसेच आपले खाजगी अवयव, ज्यांना त्रयस्त व्यक्तींनी स्पर्श करू नयेत, हे शिकवून आपण मुलं सुरक्षित असल्याच्या भ्रमात राहू शकतो. ते बरोबर नव्हे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अश्विनीने सांगितली ती म्हणजे मुलांवर विश्वास ठेवण्याची पालकांची व शिक्षकांची मानसिकता आवश्यक. तसेच मुलांचे निरीक्षण. त्यांच्या मते मुलांच्या वागण्यामध्ये होणारे बदल खूप महत्त्वाचे. त्यांमध्ये शोषणाच्या खुणा सापडू शकतात.
१) मुलं अचानकपणे खूपच गुप्तता पाळू लागते.
२) झोपेत बिछान्यावर लघवी, भयानक स्वप्ने पडणे व घाबरून जागे होणे.
३) चित्रे काढताना अचानकपणे लैंगिक अवयवांची चित्रे रेखाटणे, बाहुली, कुत्र्यासारख्या खेळण्यांशी खेळताना त्यांच्या खाजगी अवयवांशी चाळा करणे.
४) मुलांचे एकदम सगळ्याच गोष्टींतून अंग काढून घेणे अथवा एखाद्याने आईवडील, शिक्षक यांना चिकटणे.
५) मुलींच्या बाबतीत आपले शरीर अथवा खाजगी अवयवांविषयी एक प्रकारची घृणा मनात धरणे, आंघोळ अथवा धुण्याचा ध्यासच घेणे.
६) कुणी तुझ्याकडे वाईटपणे वागतो का? असे विचारल्यास प्राणापेक्षा अधिक पद्धतीने आश्चर्य व्यक्त करणे.
७) खाण्यापिण्याच्या बाबतींत ठळक बदल. घास गिळण्यास मुलास त्रास होणे. गुप्त जागी दुखत असल्याची अधूनमधून तक्रार.
हा विषय एवढा व्यापक असल्याने त्यावर नेमके उपाय ते काय सांगणार? अश्विनीने पालक, शिक्षक व मुलांसाठी सहा पथ्ये सां​गितली. ती मुलांना शिकवणे खूप महत्त्वाचे, या सगळ्या गोष्टीत तक्रार करणे महत्त्वाचे.
१) निरीक्षण (लूक) : निरीक्षण करणे आणि पालक (रिपोर्टींग) शिक्षक अथवा विश्वासातील वडीलधाऱ्यांना सांगणे (रिपोर्ट), कुणीही काहीही वेगळे बघायला सांगतो, वेगळ्या तऱ्हेने बघतो, निरीक्षण करतो (मुलगी आंघोळ करताना, कपडे बदलताना) तर मुलाने ते सांगणे एकदम आवश्यक होय. हा विश्वास मुलांमध्ये जागवणे गरजेचे.
२) ऐकवणे (हियर) : थेट बिभत्स शब्द, फोनवरून बिभत्स सुनावणे, धमकी देणे, (मी तुला स्पर्श करणार) सारखी भाषा वापरणे. या गोष्टी मुलांनी न चुकता सांगणे आवश्यक, हे त्यांना समजावले पाहिजे.
३) स्पर्श (टच) : खाजगी अवयवांना गैर व्यक्तीकडून स्पर्श, मुली/ मुलांना नको वाटणारा कोणताही स्पर्श, आपण त्यांना सावध करताना त्यांच्या खाजगी अवयवांवर अतिभर दिल्याने अन्य स्पर्शा​विषयी तक्रार करण्याचे मुलांना भान रहात नसते. त्यामुळे हा विषयही मुलांना समजावणे अत्यंत गरजेचे.
५) पकड (होल्ड) : मिठी मारणे, मांडीवर बसवणे या गोष्टी मुलास अस्वस्थ, नकोशा वाटत असल्यास मुलाने तक्रार करणे आवश्यक आहे.
६) एकटे (अलोन) : कुणीही व्यक्ती सातत्याने मुलाला एकटे बरोबर जाण्यास भाग पाडत असल्यास... ते शोषण ठरत नसते हे खरे... परंतु ती त्यासाठी पार्श्वभूमी ठरू शकते. मुलाने हे नजरेस आणून देणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे मोकळी जागा असताना व्यक्तीने लगटून बसणे, मुलाच्या अंगचटीला येणे याही गोष्टी आपल्या कौटुंबिक जीवनात नैसर्गिक असतात. परंतु, त्या बऱ्याच वेळा मुलाच्या लैंगिक शोषणातही बदलू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
एकंदरीत मुलांची स्वतंत्र व मुक्त वाढ ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. त्यासाठी वातावरण निकोप करणे, ठेवणे व त्यासाठी सर्वांनीच जागरूक राहणे, फारच महत्त्वाचे. खुद्द मुलांनाच त्यासाठी सशक्त व समंजस बनवणे, हा सर्वांत मोठा उपाय होय. त्यासाठी आधी पालक व शिक्षक व अन्य कुटुंबीय आणि एकंदर परिसर या विषयावर सज्ञान, सजग व जागरूक असणे, ही काळाची गरज होय!
(लेखक ‘द हिंदू’ चे गोव्यातील वरिष्ठ सहायक संपादक आहेत.)