अस्वस्थता : राजकीय आणि सामाजिक

कव्हर स्टोरी

Story: संजय ढवळीकर |
16th February 2019, 11:56 am
अस्वस्थता : राजकीय आणि सामाजिक



गोव्याच्या राजकारणात अस्थिरता वरचेवर अनुभवाला आली आहे. राजकीय अस्थिरतेतून सरकारे पडली आहेत, नवीन सरकारे घडली आहेत. सध्या गोव्यात विधानसभेत सर्वांत मोठा नसलेल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे, सरकार अनेक घटकांच्या आघाडीचे आहे, परस्पर विरोधी मतप्रवाहांचे पक्ष आणि नेते सरकाराचे घटक आहेत, सरकारच्या कार्यक्षमतेबाबत आणि कार्यपद्धतीबाबत शंका घेतल्या जात आहेत. तरी सध्या गोव्यात राजकीय अस्थिरता नाही. राजकीय अस्थिरता नाही हे खरे असले तरी राजकीय अस्वस्थता अवश्य आहे. तसे पाहू गेल्यास अशा प्रकारची राजकीय अस्वस्थता मुक्तीनंतर गोव्यात आजवर अनुभवली गेली नव्हती. एवढ्या माेठ्या प्रमाणावर अस्वस्थता गोव्यात आता आहे. राजकीय अस्वस्थतेच्या जोडीला इतर क्षेत्रांतही अस्वस्थता भरून राहिली आहे.
सरकार चालू आहे असे म्हणावे लागते कारण सरकारात त्या त्या पदावर संबंधित व्यक्ती बसलेल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारामुळे त्यांच्यावर हालचालींची आणि एकुणातच कार्यक्षमतेची बंधने आली आहेत. मात्र विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे ते आपल्या पदाचा कार्यभार दुसऱ्या नेत्याकडे सोपवू शकत नाहीत. त्यांच्या भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेऊ शकेल असा निर्विवाद नेता अस्तित्वात नाही. मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर हे पर्रीकरांखालोखाल अनुभवात ज्येष्ठ असले तरी आघाडीतील घटकांच्या राजकारणामुळे त्यांना नेतेपद मिळत नाही. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई ज्येष्ठतेत मागे असले तरी राजकीय चाली रचण्यात पुढे असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार नेतेपदासाठी होऊ लागला, तेव्हा आघाडीतून पाठिंब्यापेक्षा विरोध अधिक झाला. सध्या पर्यायी नेतृत्वासाठी तडजोड म्हणून विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्या नावावर एकमत घडवून आणले असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या राजकीय कारणांवरून गोव्यात एरवी राजकीय ​अस्थिरता निर्माण झाली असती. असंतुष्ट घटकांनी एकत्र येऊन विरोधातील काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करून पर्यायी सरकार बनविले असते. भाजपला विरोधी पक्ष म्हणून बसावे लागले असते. आताचे भाजपेतर सत्ताधारी घटकही नवीन सरकारात सामील झाले असते. परंतु तसे काही घडायची अजिबात चिन्हे दिसत नाहीत. सरकारातून बाहेर पडून नव्याने समीकरणे जुळविण्याची एकाही सत्ताधाऱ्याची इच्छा नाही. त्यामुळे सध्याचे सरकार कोसळून नवीन सरकार घडायची सुतराम शक्यता वाटत नाही. तरी राजकीय अस्वस्थता मोठी आहे.
का आहे ही अस्वस्थता? राजकीय अस्वस्थतेच्या मुळाशी अनेक घटक आहेत. केवळ राजकीय नव्हे तर राजकारणाबाहेरील घटकही अस्वस्थतेमागे आहेत. आधी बघू राजकीय घटक. सरकार सत्तेत आहे, परंतु ते कसेबसे चालले आहे, कामे होत नाहीत असे वातावरण राज्यभरात पसरले आहे. सामान्य लोक, सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते, राजकीय नेते, आमदार आणि आता मंत्रीही अशा चढत्या क्रमाने ही अस्वस्थता व्यक्त होऊ लागली आहे. पर्रीकरांच्या दुर्धर आजारामुळे बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्याचे त्यांना वाटते आहे. तसे पाहू गेल्यास प्रश्न फक्त पर्रीकरांच्या आजाराचा नाही. कर्करोगाने त्रस्त असलेले दुसरे नेते फ्रान्सिस डिसोझा यांचे गुरुवारी निधन झाले. त्यामुळे भाजपचा विश्वासार्ह आणि सर्वांना आपलासा वाटणारा अल्पसंख्य चेहरा हरवला. आदल्याच दिवशी माजी उपसभापती विष्णू वाघ यांच्या निधनाची वार्ता येऊन थडकली. अर्थात विष्णू वाघांच्या जाण्याने भाजपचे किंवा राजकारणाचे जेवढे नुकसान झाले त्याहून अधिक साहि​त्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचे नुकसान झाले. आमदार पांडुरंग मडकईकर आजारातून उभे राहण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या आमदारांची संख्या तेरा होती, ती विश्वजीत राणेंनी चौदावर नेली. परंतु आता फ्रान्सिस डिसोझांच्या निधनामुळे ती संख्या पुन्हा तेरावर आली आहे.
आमदारसंख्या वाढविण्यासाठी भाजपने ऑक्टोबरमध्ये काँग्रेसमधून सुभाष शिरोडकर आणि दयानंद साेपटे यांनी राजीनामे देण्यास लावून आयात केले. परंतु त्यानंतर परिस्थिती अनिश्चित बनल्यामुळे पोटनिवडणुकीची भाजपला धास्ती वाटू लागली. पोटनिवडणूक होत नाही म्हणून आमदारसंख्या दोनने वाढत नाही, आणि पोटनिवडणूक झाली तरी दोन्ही ठिकाणी विजयाची खात्री नाही. करायला गेलो एक आणि झाले भलतेच, ही नवीनच राजकीय अस्वस्थता भाजपमध्ये निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीवर मात करून ठामपणे उभे राहण्याची ताकद असलेला पर्रीकरांच्या रुपातील नेता आजारामुळे कमकुवत बनला आहे, एवढा की मंत्रिमंडळ बैठकीत कनिष्ठ मंत्रीही त्यांच्या आवाजाकडे लक्ष देईनासे झाले आहेत. सत्ताधारी बाजूच्या या अनागोंदीमुळे सत्ताधाऱ्यांच्या राजकीय अस्वस्थतेत वाढ झाली आहे.
एकीकडे राजकीय कारणांमुळे अस्वस्थता वाढत असताना दुसरीकडे इतर क्षेत्रांतही उत्साहवर्धक काहीच चाललेले नाही. खाणबंदीचा प्रश्न २०१२ मध्ये निर्माण झाला, २०१७-१८ दरम्यान अंशत: सुटण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेवढ्यात सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण बंदी लागू करून खाण व्यवसायाचे आणि खाण अवलंबितांचे एका फटक्यात पेकाट मोडले. यातून उद्भवलेल्या बेकारीमुळे गावागावांत अस्वस्थता निर्माण झाली. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी तोडगा दृष्टिपथात नसल्यामुळे सर्वच सत्ताधारी नेत्यांमध्ये अस्वस्थता आली आहे. मंत्री नीलेश काब्राल आणि उपसभापती मायकल लोबो यांनी ही अस्वस्थता बोलून दाखविण्यास सुरुवात केली आहे. श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर यांना दोनेक महिन्यांत लोकसभा निवडणुकीला तोंड द्यायचे आहे, त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यासारखी बनली आहे. विनय तेंडुलकर राज्यसभेचे खासदार असल्यामुळे त्यांना व्यक्तिश: निवडणुकीची चिंता नसली तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर आहेच. परंतु आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्याची त्यांना परवानगी नाही, म्हणून ते गप्प आहेत.
एकुणातच अर्थव्यवस्थेची गती मंद बनली आहे. नवीन गुंतवणूकदार गोव्यात येईनासे झाले आहेत, त्यामुळे रोजगार निर्मिती बंद पडली आहे. नोकरी-व्यवसाय नियमित चालू असेल तर लोकांच्या खिशात पैसा खुळखुळतो, त्यातून खरेदी-विक्री होत राहते आणि अर्थव्यवस्थेला गती लाभते. यातील काहीच घडताना सध्या दिसत नाही. सरकारी नोकऱ्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर दिसू लागल्या आहेत, परंतु सामान्य माणसाच्या दृष्टीने एकेक सरकारी नोकरी मिळविणे म्हणजे समुद्रातील दगड-गोटे शोधण्यासारखे बनले आहे.
राजकीय अस्वस्थता फक्त भाजपमध्ये नाही; तर मगो पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्षांमध्येही अस्वस्थता आहे. सत्तेतील वाटा मिळाला असला तरी सध्याच्या गुंतागुंतीच्या राजकीय अवस्थेत आपापल्या भवितव्यावरून ते चिंतीत आहेत. त्यातच अचानक राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय भाजपच्या गोटांत झाला तर आपले होणार, निवडणुकीत आपला निभाव लागून पुढील विधानसभेत प्रवेश करता येईल काय या चिंता त्यांना सतावत आहेत. त्यातल्या त्यात शांत आहेत ते विरोधी बाकांवर बसावे लागलेले काँग्रेसजन. गेल्या वर्षी सरकार का स्थापन करता आले नाही याचा उशिरा का होईना, त्यांना उलगडा झाला. आता करण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे संधीची वाट बघत तयारीत बसायचे असे धोरण त्यांनी अवलंबिले आहे.
एक वेळ राजकीय अस्थिरता परवडली, पण ही राजकीय आणि सामाजिक अस्वस्थता नको. यातून सारे जनजीवनच अस्वस्थ होऊन जाते. म्हणून या सर्वव्यापी बनत चाललेल्या अस्वस्थतेवर उपाय निघणे आवश्यक आहे.
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)