एटीकेचा गोव्याविरुद्ध आक्रमणाचा निर्धार


14th February 2019, 06:23 pm

पणजी : मडगाव येथील नेहरू स्टेडियमवर गुरुवारी एटीके आणि एफसी गोवा यांच्यात इंडियन सुपर लिगचा (आयएसएल) सामना होत आहे. बाद फेरीची कमी होत जाणारी संधी उंचावण्याचे दडपण एटीकेवर असून आक्रमक खेळ करण्याच्या निर्धाराने ते मैदानावर उतरतील.
स्टीव कॉपेल यांच्या एटीकेचा बदाव यंदा संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे. त्यांच्याविरुद्ध १५ सामन्यात केवळ १५ गोल झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे आक्रमण संयुक्त शेवटच्या क्रमांकाचे आहे. त्यांना आतापर्यंत केवळ १५ गोल करता आले आहेत.
२१ गुणांसह एटीके सहाव्या क्रमांकावर आहे, पण गोव्याला हरविल्यास चौथ्या क्रमांकावरील नॉर्थइस्ट युनायटेडइतकेच त्यांचे गुण होऊ शकतात. सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने मात्र यंदा भक्कम समन्वय साधला आहे. त्यामुळे हे आव्हान सोपे नसेल.
दोन संघांना मागील लढतीत गोल करता आले नव्हते, पण यावेळी अशा निकालाची पुनरावृत्ती बाद फेरीसाठी चांगली ठरणार नाही. लीगमध्ये सर्वाधिक गोल केलेल्या गोव्याला एटीकेच्या बचाव फळीतून मार्ग काढावा लागेल. काही वेळा एटीकेची बचाव फळी डळमळीत झाली आहे.
कॉपेल यांनी सांगितले की, तुम्ही गोव्यात आल्यावर त्यांचे खेळाडू बघता तेव्हा ते चांगले असल्याचे व त्यांचे प्रशिक्षक त्यांच्यात उत्तम समन्वय साधतात हे दिसते. आमचे काम बरेचसे नक्की आहे. आम्हाला आमचे नशीब घडवावे लागेल. आम्हाला जिंकण्याची गरज आहे. मोसमाच्या प्रारंभी आलो असतो तर बरोबरी चालू शकली असती, पण उद्या तसे होऊन चालणार नाही.
एटीकेला एफसी पुणे सिटीविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधावी लागली. त्यांना अखेरच्या क्षणी बरोबरीचा गोल पत्करावा लागला. खरे तर गेल्या तीन सामन्यांत एटीकेला अखेरच्या क्षणी गोल पत्करावे लागले आहेत. हे त्यांच्यासाठी चिंतेचे कारण आहे.
प्रतिस्पर्ध्याचे डावपेच भेदण्यासाठी एटीकेची मदार मॅन्यूएल लँझरॉत आणि एदू गार्सिया यांच्यावर असेल. जमशेदपूरविरुद्ध कोलकात्यामध्ये ही जोडी भेदक ठरली होती. मागील सामन्यात मात्र त्यांना प्रभाव पाडता आला नाही. लँझरॉत त्याच्या जुन्या संघाविरुद्ध ठसा उमटविण्यास आतूर असेल, पण लॉबेरा यांच्या मते गार्सिया जास्त धोकादायक आहे.
लॉबेरा म्हणाले की, आम्ही एका मातब्बर संघाला सामोरे जात आहोत, पण मी माझ्या खेळाडूंपुरतेच बोलेन. आम्हाला एखाद्या विशिष्ट खेळाडूला नव्हे तर संपूर्ण संघाला हरवावे लागेल. या घडीला एटीकेसाठी गार्सिया चांगल्या फॉर्मात आहे.
गेल्या मोसमात लॉबेरा यांच्या गोव्याने जमशेदपूरच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आणल्या होत्या. त्यावेळी कॉपेल जमशेदपूरचे प्रशिक्षक होते. आता हेच कॉपेल एटीकेचे प्रशिक्षण असणे हा योगायोग आहे. इंग्लंडचे कॉपेल यावेळी हे टाळण्यासाठी प्रयत्नशील असतील. यावेळी पराभव किंवा बरोबरी झाली तरी त्यांचे आव्हान संपुष्टात आलेेले असेल.
एटीके यंदा थेट प्रयत्नांच्या बाबतीत फार पिछाडीवर आहे. सामन्यागणिक केवळ ९.५ शॉट असे हे प्रमाण आहे. हेच गोव्याचे प्रमाण १५.५ इतके आहे. त्यामुळे ही लढत म्हणजे गोव्याचे आक्रमण विरुद्ध एटीकेचा बचाव अशी होण्याची चिन्हे आहेत.
...........