जग घुमेया थारे जैसा ना कोई

‘जग घुमेया थारे जैसा ना कोई’ या गीतातून निर्व्याज प्रेमाचा साक्षात्कार होतो. पूर्णपणे निरपेक्ष प्रेम. शेवटी आपलं माणूस म्हणून जगणं, गृहस्थ म्हणून जगणं कशासाठी असतं? सगळेच प्रेमाचे भुकेले असतात.

Story: नंदनवन | डॉ. नंदकुमार कामत |
14th February 2019, 05:29 am

आयुष्यातील पहिल्या वहिल्या शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ पत्नीवर आलेली. शस्त्रक्रियेची तारीखही तिनेच ठरवून डॉक्टरना सांगितलेली. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ. घरात तिची काहीच चाहुल लागली नाही म्हणून मी शोधू लागलो तर जिथे ती आधी कधीच बसली नव्हती, तिथे छताच्या निमुळत्या पण सुरक्षित कोपऱ्यावर कुठेतरी टक लावून बसलेली ती मला दिसली. मी दरवाजाआडून तिच्याकडे बघत होतो. हिच का ती स्त्री माझ्या आयुष्यातील साथीदार? आता तिच्या पायाच्या काड्या झालेल्या. मुडदूस झाल्याप्रमाणे गर्भार नसतानासुद्धा ओटीपोटाचा घेर वाढलेला. मला अगदी रहावेनासे झाले. मी बाहेर येऊन तिची तंद्री भंग केली. कसला विचार करतेस? इथे कशाला बसलीस? उद्या शस्त्रक्रिया होणार म्हणून घाबरलीस का? ती उदासपणे हसली. प्रणयाराधनाच्या काळात मी तिची थट्टा करायचो. ‘तुला खूप खूप हसू येते ना तेव्हा तुझ्या गालावर गोड गोड खळ्या पडतात. त्यात उडी मारून मला जीव घ्यावासा वाटतो. पण आता तिच्या शुष्क चेहऱ्याकडे पाहून मला खूप वाईट वाटले. काय झालं ते तर सांगशील? मग ती छताच्या कोपऱ्यावरून उठून उभी राहिली. मग तिच्या तोंडून शब्द आले. मी विचार करत होते, शस्त्रक्रिया झाल्यावर एक रुग्ण स्त्री, डिफेक्टीव्ह वूमन म्हणून तू मला सोडून तर देणार नाहीस ना? ‘क्षणभर मी स्तब्ध झालो. आतून कुठेतरी रामाणींचे दिवे लागले. ज्ञानेश्वरांच्या विश्वात्मक आर्ताने हृदयाचा ठाव घेतला. आतून खूपखूप गलबलू आले. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. मी पुढे काही बोलण्यापूर्वीच शब्दांच्या पलीकडले सारे तिला शब्दांवाचून कळले होते. त्या तेवढ्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड प्रेममय आहे अशी माझी धारणा आहे. अणू, रेणू, परमाणूकडे पहाताना सुद्धा या प्रेमाचा साक्षात्कार होतो. या जगातील चराचरावर प्रेम करणारी माणसे आहेत म्हणूनच हे जग चालते.
पूज्य सानेगुरुजींनी तर एक आगळावेगळा धर्मच आम्हाला विद्यार्थीदशेत दिला आणि धर्म, पंथांकडे पहायची आमची दृष्टीच बदलून टाकली. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे आर्जवाने गात गात गुरुजी आपल्यातून गेले. बालकवी, तांबे, माधव ज्युलीयन, बोरकर, पाडगांवकर, कुसुमाग्रज, विंदा सर्वांनी प्रेमडोहात आम्हाला आकंठ बुचकळ्या मारायला भाग पाडले. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणाचा, सखीबंद झाल्या तारका, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात’ गुणगुणताना या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्याचा संदेशही आम्हाला खूप भावला. साहीर लुधियानवी, गुलजारांच्या तोडीचे एक नवे गीतकार आहेत. डॉ. इर्शाद कमाल. पंजाबी, वय ४७ वर्षे. त्यांना कशी कुठे ‘जग घुमेया थारे जैसा ना कोई’ या गीताची प्रेरणा झाली कुणास ठाऊक. हे गीत मी आधी मन लावून ऐकले. एक मनस्वी स्त्रीची प्रतिमा डोळ्यांसमोर आली. प्रेमाच्या शुद्ध, नितळ, निरागस धाग्याने बांधलेली नंतर सुलतान हा चित्रपट व या गीतावर चित्रित केलेली दृश्ये पाहिली. २०१६च्या चित्रपटातील गीताचे विशाल-शेखर हे संगीतकार आहेत. राहत फतेह अली खाननी या गीतात अक्षरश: प्राण फुंकले आहेत. सुलतान अली खान(सलमान खान) आर्फा(अनुष्का शर्मा)साठी हे काळीज पिळवटणारे गीत गातो. हे एक स्त्रोत्रच आहे. ‘ना वो अंखिया रुहानी कही(तुझ्यासारखे परतत्वस्पर्शित नेत्र मला कुठेही सापडले नाहीत) ना वो चेहरा नुरानी कही(इतका तजेलदार चेहरा, तुझ्यासारखाही नाहीच सापडला) अशा एकेक ओळीबरोबर फक्त आर्फाचेच नव्हे तर आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण स्त्रीचे पूर्ण व्यक्तिमत्त्व उलगडत जाते. मी संपूर्ण जग धुंडाळले पण तुझ्यासारखी कुणीच नाही मिळाली हे समरसून गाताना गीत एका टप्प्यावर येते ‘जैसी तू है वैसी रहना’ आणि आपण सद्गदित होतो. हो ‘तिने’ आपण जशी आहे तशीच रहायला हवं. किती महान, पण साधं, सरळ सत्त्व या गीतातून आपल्यापर्यंत पोहोचतं. जवळजवळ पाच मिनिटांच्या या अर्थपूर्ण गीताने मला बरंच अंतर्मुख केलं. माझ्या डोळ्यासंमोर सलमान खान, अनुष्का शर्मा नव्हते. माझ्यासमोर उभं होतं अजुनही शस्त्रास्त्र घेऊन भांडणाऱ्या, रक्तपात, हिंसा करणाऱ्या माणसांना अनाकलनीय असलेलं पूर्ण प्रेममय ब्रह्मांड.
‘जग घुमेया थारे जैसा ना कोई’ या गीतातून निर्व्याज प्रेमाचा साक्षात्कार होतो. पूर्णपणे निरपेक्ष प्रेम. शेवटी आपलं माणूस म्हणून जगणं, गृहस्थ म्हणून जगणं कशासाठी असतं? सगळेच प्रेमाचे भुकेले असतात. माझ्या अात्ममग्न मुलाची उंची वाढताना त्याला हाडांतील वेदना जाणवायच्या. पण त्याला आपल्याला नेमके काय होतेय तेच सांगता येत नसे. मग तो जवळ येऊन माझा हात पकडून आपल्या दुखऱ्या पायावर ठेवायचा व अपेक्षेने माझ्याकडे बघून म्हणायचा, टिकल मी, मला गुदगुल्या कर. मग तो शांत झोपी जाईपर्यंत मी त्याचे पाय चेपायचो. त्याची सेवा करताना प्रत्येक क्षणी मला विश्वातील प्रेमातत्वाचा साक्षात्कार झाला आहे. पक्षी, प्राणी, माती, साधा दगड, डोंगर, ढग, सूर्यकिरण प्रत्येकात मला प्रेमतत्व दिसते. उगवत्या, मावळत्या सूर्यात दिसते. कोळ्याच्या जाळ्यावर चमकणाऱ्या दवबिंदूत दिसते. हो, जगात खूप दृष्टपणा आहे, दृष्ट, दुर्जन आहेत. हिंसा आहे, अन्याय, विषमता, अत्याचार आहेत. या सर्व जंजाळात आपण प्रेम शोधत असतो. आणि ते तर सर्वत्र आहे म्हणून जेव्हा ‘जैसी तू है वैसी रहना’ असं सलमान खान आर्फाला सांगतो, तेव्हा त्याच्या तोंडून संपूर्ण ब्रह्मांड बोलत असतं- प्रेममय ब्रह्मांड. म्हणून सानेगुरुजींचा धर्म हाच जगाचा खरा धर्म बनला पाहिजे.