‘गोवापेक्स २०१९’ समाराेप उत्साहात

टपाल तिकिटांच्या ३३ संग्रहकांना पारितोषिके प्रदान


12th February 2019, 06:01 pm



पणजी :
भारत टपाल कार्यालय, गोवा क्षेत्र आयोजित ‘गोवापेक्स २०१९' या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचा मंगळवारी समारोप झाला. या कार्यक्रमात टपाल तिकिटांच्या संग्रहकांना तब्बल ३३ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच वारसा प्रवर्तक संजीव सरदेसाई व नामवंत घुमट वादक कांता गावडे हे देखील याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. पणजी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझीस ब्रागांझा सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात सुरुवातीला कांता गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घुमट वादन करून उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यानंतर गोव्याचे पुरातन वाद्य घुमटावरील एका विशेष पृष्ठाचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमासंदर्भातील एका स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
संजीव सरदेसाई यांनी टपाल विभागातील जगातील रंजक इतिहास सांगताना टपाल तिकिटासारखे बनण्याचा विद्यार्थ्यांना संदेश दिला. टपाल तिकिटे पाकिटाच्या एका कोपऱ्यावर असूनसुद्धा जगभ्रमंती करते, त्याप्रमाणे स्वत:ला घडवा व त्याचे मूल्य जाणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रदर्शनामध्ये सहभागी स्पर्धकांच्या संग्रहाचे परीक्षण पुरुषोत्तम भार्गवे, नाशिक व प्रतिसाद नेऊरगांवकर, पुणे या टपाल तिकीट संग्राहकांनी केले. पारितोषिकांमध्ये तीन चषक, ८ सुवर्ण पदके, १० रौप्य पदके, तर १२ कांस्य पदकांचा समावेश आहे.
वरिष्ठ टपाल अधीक्षक अर्चना गोपीनाथ यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच आभार पोस्ट मास्टर जनरल, गोवा क्षेत्र डॉ. एन विनोद कुमार यांनी मानले.
................
कोट
प्रत्येक माणूस शेवटच्या श्वासापर्यंत शिकत असतो. ध्येयाशिवाय यशप्राप्ती नाही. टपाल, पत्र देश, जगाला जोडून ठेवते, हे मोठे काम अाहे. तरुणांना सशक्त करण्यासाठी सर्व प्रकारची व्यासपीठे उपलब्ध व्हायला हवी.
गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री...................
बॉक्स
घुमट वाद्याला विशेष स्थान!
कांता गावडे यांनी घुमट हा आपला ४५ वर्षांपासून जीवनसाथी असल्याचे नमूद केले. या वाद्याने आपल्याला जग फिरण्याची संधी दिली, उच्च शिक्षित नसतानाही सन्मानास पात्र केले, अशी भावना गौडे यांनी व्यक्त केली. घुमटाने गोव्यातील सामाजिक सलोखा जपला आहे, अशा आपल्या राज्याचा वारसा असलेल्या वाद्याला भारतीय टपाल विभागाने विशेष स्थान दिल्याबद्दल गावडे यांनी भारत टपाल विभागाचे आभार मानले.