जेव्हा नेत्यांची जीभ घसरते...!

मोदी किंवा चंद्राबाबू यांनी आपली पातळी सोडून बोलू नये अशीच जनतेची अपेक्षा आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती असो किंवा मुख्यमंत्री, जनतेचे ते सर्वोच्च नेते आहेत. त्यांनीच जर तारतम्य सोडून बोलायचे ठरविले तर कसे होणार?

Story: अग्रलेख |
12th February 2019, 06:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील सभेत म्हणाले की, चंद्राबाबू आपल्या विकासात एवढे मग्न झाले आहेत की आपला मुलगा लोकेश यालाच ते अधिक महत्त्व देताना राज्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोकश हा मुलगा राजकारणात चंद्राबाबूंचा वारसदार म्हणून सक्रिय होण्याची शक्यता दिसत असल्याने मोदी यांनी चंद्राबाबूंवर टीका करताना त्याला लक्ष्य केले असेल. याला प्रत्युत्तर म्हणून चंद्राबाबू यांनी मुलाचे महत्त्व मोदींना काय कळणार, ते पत्नीपासून दूर राहात असल्याने कौटुंबिक आनंद त्यांना माहीत असणे अशक्य आहे, असे निवेदन केले. मोदींना पत्नी आहे, हे देशवासीयांना ठाऊक आहे ना, असा प्रश्नही त्यांनी बोलण्याच्या ओघात केला. नेत्यांची जीभ घसरली की ते वैयक्तिक बाबतीतही कसे नाक खुपसतात, याचे हे उदाहरण आहे. मोदी किंवा चंद्राबाबू यांनी आपली पातळी सोडून बोलू नये अशीच जनतेची अपेक्षा आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती असो किंवा मुख्यमंत्री, जनतेचे ते नेते आहेत. त्यांचे आचार-विचार अनेकांना आदर्शवत वाटत असतील. त्यांनीच जर तारतम्य सोडून बोलायचे ठरविले तर कसे होणार? कुटुंबाचा उल्लेख केला जात असताना, त्याला राजकीय संदर्भ असेल तर काही वेळा ते जनतेच्या गळी उतरते! गांधी कुटुंबावर टीका करताना भाजप नेत्यांनी केलेली निवेदने राजकीय टीका म्हणून चालतात. घराणेशाहीवर होणारी टीकाही जनता समजून घेते, मात्र ज्यावेळी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते, त्यावेळी संबंधित नेते आपला आदर गमावून बसतात.
जीभ घसरण्याची सवय असलेल्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही आहेत. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जास्त निष्ठा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ असे सिब्बल परवा म्हणाले. अशी थेट धमकी देणे कितपत योग्य आहे? मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत, ते जनतेचे पंतप्रधान आहेत. मोदी विरोधी पक्षांशी असा व्यवहार करतात जसे की ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी जाहीरपणे म्हणाले. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असली तरी अद्याप त्यासंबंधातील कार्यक्रम जाहीर झालेला नाही. निवडणूक आयोगाने त्या दिशेने तयारी केली असण्याची शक्यता आहे. देशातील वातावरण मात्र आताच तापू लागले आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्याने देशात निवडणुका जवळ आल्याचा भास होऊ लागला आहे. तसे पाहाता, एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर टीका करणे, दोष देणे यात गैर काही नाही. धोरणात्मक मतभेद उघड करण्यात किंवा अपयशावर बोट ठेवण्यात चुकीचे काही नाही. जनताही तटस्थपणे या सर्वाचे निरीक्षण करीत असते. आपले मत घडविण्याची प्रक्रिया अशा वातावरणातच सुरू होत असते. कोण काय बोलतो, कसा बोलतो याकडेही मतदारांचे लक्ष असते. त्यामुळे राजकीय नेत्यांनी कोणतेही निवेदन करताना, आरोप करताना आपला तोल तर जात नाही ना, याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तापलेल्या वातावरणात जीभ घसरणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.