खाणी सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

अटल बुथ कार्यकर्ता संमेलनात अमित शहा यांचे आश्वासन

09th February 2019, 01:56 Hrs

विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता 

पणजी: गोव्यात खाणींचे जे काम थांबले आहे ते सुरू करण्यासाठी भाजप सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्यातून नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोमंतकीय जनतेला दिले. बांबोळी येथील क्रीडा प्राधिकरणाच्या अॅथलेटिक्स मैदानावर आयोजित अटल बुथ कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.
गठबंधनाचे सरकार देशाला महासत्ता करू शकत नाही, विरोधी गटांच्या गठबंधनाचे सरकार आले तर देशात सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेश, बुधवार देवेगौडा, गुरुवारी चंद्राबाबू नायडू, शुक्रवारी स्टॅलिन आणि शनिवारी शरद पवार पंतप्रधान होतील. रविवारी देश सुट्टीवर जाईल, अशा शब्दांत शहा यांनी भाजपच्या विरोधात गठबंधन केलेल्या पक्षांची नेत्यांची खिल्ली उडवली.
भाजपने देशाचा विकास साधणारे सरकार देण्याचे काम केले. गोव्यासाठी मांडवीवर अटल सेतू आणि झुअारीवर उभारण्यात येणारा १५०० कोटी खर्चाचा २ किलोमीटर लांबीचा आठपदरी पूल राज्याला जोडून ठेवण्याचे काम करणार. खांडेपार पूल, गालजीबाग - तळपण पुलांसाठी ३०० कोटी, मोपा विमानतळासाठी १९०० कोटी, दाबोळी विमानतळाच्या विस्तारासाठी ४५० कोटी रुपये खर्चून विकासाची विविध कामे राज्यात सुरू आहेत. तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभारण्यात येत आहे. यामुळे
देशातील सर्वात जास्त गुंतवणूक गोव्यात झाली आहे. आयआयटी गोवा, एनआयटी गोवा कॅम्पस, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना आदी योजना मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावल्या आहेत. मनोहर पर्रीकर यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत. गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना मुख्यमंत्री पर्रीकरांनीच आणली असे शहा म्हणाले.
एका बाजूने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार विकास करत आहे तर दुसऱ्या बाजूने राहूलबाबाच्या नेतृत्वाखाली केवळ गठबंधन गठबंधन सुरू आहे. राहुल गांधी पूर्वसूचना न देता पर्रीकर यांना भेटायला आल्याने आम्हालाही चांगले वाटले. आमच्या नेत्याला भेटायला काँग्रेस अध्यक्ष गेल्याचे समाधान वाटले. परंतु, पर्रीकरांनी राफेलबाबत चर्चा केल्याचा खोटा दावा संध्याकाळी राहुल गांधींनी केला. एवढ्या खालच्या स्तराचे राजकारण देशात कोणी केले नाही. आजारी व्यक्तीच्या आरोग्याकडे खोटे बोलून राहुल गांधींनी खेळ केला. पण पर्रीकरांनीही दुसऱ्या दिवशी पत्र लिहून आपण साधा 'र' अक्षराचाही उल्लेख केला नसल्याचे सांगितल्याने राहुल उघडे पडले, असेही शहा यांनी यावेळी नमूद केले.तुमचा लोकप्रिय नेता आजाराशी झगडत असताना काँग्रेस त्याचे राजकारण करत आहे. राजकारणाचा स्तर खाली नेणारी यापेक्षा दुसरी घटना नाही, असे शहा म्हणाले.
देशातून घुसखोरांना हाकलून देण्यासाठी भाजप काम करत आहे. गोव्यातील लोकांनी लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा भाजपाला द्याव्यात, २०१९ मध्ये मोदींना पंतप्रधान करावे, जेणेकरून काश्मीर ते कन्याकुमारी आणि कोलकाता ते कच्छपर्यंत घुसघोरांना शोधून हुसकावून लावण्याचे काम भाजपचे सरकार करेल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.
राहुलबाबा आपल्या भाषणांतून आमच्याकडे हिशेब मागतात. पण राहुल गांधींना हिशेब देण्याची मला गरज नाही, गोव्याची जनता ही मायबाप आहे त्यामुळे मी गोव्यातील जनतेला हिशोब देतो, असे शहा म्हणाले. गोव्याला वित्त आयोगाच्या माध्यमातून फक्त ५ हजार कोटी रुपये देण्यात आले होते. मोदींनी हे अनुदान वाढवून १५ हजार कोटी रुपये केले. आतापर्यंत वेगवेगळे प्रकल्प आणि १२९ योजनांतून गोव्याला पाच वर्षांत ३५,१५९ कोटी रुपये नरेंद्र मोदी सरकारने गोव्यात दिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, सभापती डॉ.प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार एलिना साल्ढाणा, माजी आमदार सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर, राजेंद्र आर्लेकर, इत्याही उपस्थित होते.पाच वर्षे गोव्यासाठी केले कार्य : नरेंद्र सावईकर
भाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार केल्यानंतर गेली पाच वर्षे मी आणि उत्तर गोव्याचे खासदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोव्याच्या विकासासाठी राबत आहोत. काँग्रेसच्या खासदारांनी गोव्यासाठी काहीही केले नाही. पण गेल्या पाच वर्षांत भाजपने गालजीबाग-तळपण, झुआरी, मांडवी नदीवरील पूल असे प्रकल्प आणले. येणारी लोकसभा निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे. पाच वर्षांत देशात आणि गोव्यात जो विकास झाला त्याच्या आधारे आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहोत. पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत यासाठी ही निवडणूक आहे. विकास पाहूनच गोव्यातील दोन्ही उमेदवार येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून द्या, असे अावाहन अॅड. सावईकर यांनी केले.१९ वर्षांत हजार प्रकल्प : श्रीपाद नाईक
उत्तर गोव्यात १९ वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत १ हजार प्रकल्प राबवले गेले. गेल्या पाच वर्षांतच मी आणि सावईकर यांनी खासदार निधीतून दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लावले. येत्या निवडणुकीतही सर्वांनी भाजपला साथ द्यावी. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच आवश्यक आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपापल्या बुथावर उमेदवार जिंकून येईल या हेतूने काम करावे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुथ कार्यकर्त्यांना आवाहन केले.काँग्रेसने गोव्याचा विकास अडवला : विनय तेंडुलकर
काँग्रेसच्या काळात गोव्यात विकासासाठी निधी मागायला गेल्यानंतर गोव्यात भाजपचे सरकार आहे असे म्हणत गोव्याला विकासासाठी निधी दिला जात नव्हता. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस आणि गोव्यातील काँग्रेसचे नेते गोव्यात भाजप सरकार असल्यामुळे निधी नाकारत होते. पण भाजपच्या राजवटीत गोव्यात विकासाला सुरुवात झाली, असे तेंडुलकर म्हणाले.श्रीलंकेसारखी आता काँग्रेसची गत होईल : पर्रीकर
एकत्र रहा, लहान सहान गोष्टी विसरून गोव्यासाठी एकत्र रहा. तुम्ही एकत्र राहिल्यास पूर्वीच्या काळी जी गत श्रीलंकेची झाली होती तीच गत आताच्या काळात काँग्रेसची होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले. मोठे भाषण हे निवडणुकीसाठी राखीव ठेवूया, असे म्हणत ते मोजकेच बोलले पण त्यांनी भाजप कार्यकर्त्यांन एकत्र राहण्याचा सल्ला दिला. हजारोंच्या संख्येने सभेला आलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहून नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी चंग बांधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

Related news

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

बस तिकीट दरात वाढ!

पहिल्या तीन किलोमीटरला १० रुपये, शटलसाठी १.४० रुपये प्रती किमी Read more

चारपैकी तीन जागांवर भाजप

पणजी पोटनिवडणुकीत बाबूशचा डंका, म्हापशात वारसा जोशुआकडे Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more