सजग नागरिकत्व

वाद विवाद

Story: शैला राव | 09th February 2019, 09:29 Hrs


‘सजग नागरिक, या आमच्या बिनसरकारी संघटनेतर्फे आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो.’
‘मित्रहो, नेहमीप्रमाणे आमच्या संघटनेच्या मासिक बैठकीत समाजस्वास्थ्य विषयावर चर्चा सुरू झाली. त्या चर्चेत ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या समोर आल्या. बऱ्याचशा समस्यांवर संघटनेतील सभासदांचे एकमत झाले. परंतु इच्छामरण या मुद्यावर खूप चर्चा होऊनही काही ठोस हाती लागले नाही. तेव्हा आम्ही ठरवले की, ही चर्चा जास्तीत जास्त लोकांसमोर व्हावी म्हणून आज आपण इथे जमलो आहाेत’.
‘आज आपल्याला ‘समाधान जीवनमुक्ती’ चे या विषयावरच्या दोन्ही बाजू ऐकून त्यातून समाधानकारक काही उत्तर मिळते का, ते पहायचे आहे’.
‘आमच्या सभासदांचे दोन विभाग केले आहेत. ‘अ’ विभागातले चार सभासद स्वेच्छा जीवनमुक्ती म्हणजे इच्छामरणाच्या बाजूने बोलतील आणि ‘ब’ विभागातले चारजण विषयाच्या विरुद्ध बोलतील. श्रोत्यांना त्यांच्या शंका कोणत्याही विभागाच्या सभासदांना विचारता येतील. फक्त एका वेळेस एकाने विचारावे आणि प्रश्न नेमक्या शब्दात असावा. शिवाय आपल्याला ही चर्चा एका तासात आटपायची आहे’.
लगेच श्रोत्यातील एकाने उभे राहत विचारले, ‘ही चर्चा कशासाठी? म्हणजे चर्चेतून जे काही मिळेल त्याचं काय करणार आहात?’
संघटनेचे सचिव म्हणाले, ‘बरं झालं तुम्ही हे विचारलंत ते. कशासाठी हे कळल्याशिवाय चर्चेला दिशा, अर्थ राहत नाही. मी हा प्रश्न ‘अ’ आणि ‘ब’ या दोन्ही विभागातल्या सभासदांनाच विचारतो, आपण ही चर्चा का करतो आहोत?’
अ : बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांकडून कळलं की, ‘असली तकलीफ तो जिंदगी होती है!’
श्रोता : म्हणजे जगणंच मुश्कील झालंय?
अ १ : हो!
श्रोता : आर्थिक, शारीरिक की कौटुंबिक कारण?
अ २ : या तिन्हीमुळे झालेला मानसिक ताण.
ब १ : मग त्यांनी वृद्धाश्रमात जावं. मासिक खर्चाच्या तत्त्वावर किंवा देणगी स्वरुपात मोठी रक्कम देऊन त्यावरील व्याजावर वैयक्तिक खर्च निभावणे किंवा अगदीच विनाशुल्कही काही आश्रम धर्मादाय संस्थांनी काढलेले आहेत.
अ ३ : यापैकी एकही सबळ कारण नसेल. तरीही जगणं मुश्कील होऊ शकेल ना?
अ २ : आयुष्यभर स्वतंत्र बाण्याने जगल्यावर आज नाही उद्या दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागेल या विचारानेही जीवनमुक्ती हवीशी वाटेल की!
श्रोता : जीवनमुक्ती म्हणजे मृत्यू म्हणायचेय का तुम्हाला?
अ २ : हो!
ब २ : ही तर नैसर्गिक गोष्ट आहे. ते आपल्या हातात थोडेच आहे?
अ ४ : नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत त्या व्यक्तींनी तळमळत आपले आणि सभोवतालच्या सगेसोयऱ्यांचे मन:स्वास्थ्य बिघडवून टाकायचे का?
ब ४ : म्हणजे त्याने आत्महत्या करावी? कुठल्याही धर्माची याला मान्यता नाही. शिवाय हे अनैसर्गिक आहे.
अ ४ : आजच्या विज्ञानयुगात वनस्पती, प्राणी, माणूस यांची अनैसर्गिक उत्पत्ती होते की नाही? मग मरणालाच नैसर्गिक ठरविण्याचा हट्ट का?
अ १ : श्रोत्यांपैकी कोणीही विचार करावा की असाध्य रोगाने अंथरुणाला खिळणे किंवा म्हातारपणाच्या लक्षणांनी रोज कणाकणाने झिजत जाणे, यापैकी कोणतीही परिस्थिती तुमच्यावर ओढवली तर तुम्ही काय कराल?
श्रोत्यांमध्ये एकदम कुजबुज... थोडा गोंधळ.
सचिव : जरा शांत व्हा. या प्रश्नाचे उत्तर तुमच्याच जवळ आहे. एकमेकांना विचारू नका. स्वत:ला विचारा.
श्रोता : जन्मभराचे मित्र म्हणून रोग सोबतीला येणं आर्थिक, कौटुंबिक बिकट परिस्थिती वगैरे सगळं पूर्वजन्माचं फळ. त्याला आज मी काय करू?
अ २ : पूर्वजन्म, पुढचा जन्म हा ज्याच्या त्यांच्या श्रद्धेचा विषय झाला. त्याबद्दल आता बोलता येणार नाही. पण सांप्रत असलेले वास्तव स्वीकारून बोलू या.
ब १ : मला वाटतं, आर्थिक तरतूद करून ठेवली तर रोगी, निरोगी माणसावर आपल्या हाताने मृत्यू ओढवून घ्यायची वेळ येणार नाही.
अ ३ : एक तर आर्थिक तरतूद खूप पूर्वीपासून करून देखील चाळीस वर्षात त्याचे मूल्य खूप कमी होण्याची शक्यता. शिवाय पैशाची कमतरता नसतानाही स्वत:च्या नातेवाईकांना द्यावा लागणारा वेळ, पगारी सेवेकराची अनुपलब्धता, यामुळे रोग्याचे सोडा निरोगी पण जराजर्जर झालेल्याला आपण भार झाल्याचे टोचत राहते.
श्रोता : मग काय करावं? आत्महत्या किंवा डॉक्टरी इलाज थांबवणे, दोन्ही कायद्याविरुद्ध आहे.
अ १ : परदेशात असे कायदे संमत झाले आहेत.
श्रोता : आपल्या देशाचं बोला ना!
अ १ : आपल्या देशातही श्री. मंडलिक, श्री. आणि श्रीमती नारायण लवाटे यासारख्यांनी इच्छामरणाचा किंवा दयामरणाचा कायदा केला जावा म्हणून केवढी धडपड चालवली आहे.
ब २ : हं! शेवटी मंडलिकांना आत्महत्याच करावी लागली.
अ ३ : काय करणार? सरकारला समाजमनाचा कौल घ्यायला, कायदेपंडिताचा सल्ला घ्यायला वेळ लागतो.
ब १ : मंडलिकांचा व्यक्तिगत प्रश्न होता. कायदाच करायचा म्हणजे त्याचा दुरुपयोग होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते.
अ ४ : आजपावेतो झालेल्या सगळ्या सामाजिक सुधारणांना प्रथम विरोधच झाला होता. तरीही कायदे झाले. विरोधकांनी त्यातून पळवाटा शोधून तेच खरे करण्याचा खूप प्रयत्न केला तरीही कायदे अस्तित्वात आणि अंमलात आले याचं कारण ती काळाची गरज होती.
ब २ : तुमचं म्हणणं एकवेळ मान्य केले तरी स्वत: इच्छुकाने स्वेच्छामरणाचे कधी ठरवायचे?
ब ३ : स्मृतिभ्रंश झालेल्या, कोमामध्ये गेलेल्या, अर्धांगवायुमुळे लिहिणं, बोलणं न जमणाऱ्याला, आपल्याला कृत्रिम साधनांनी जगवू नका, असं कसं सांगता किंवा लिहून देता येईल? अशावेळी संधीसाधूंनी गैरफायदा घेतला तर?
अ ३ : म्हणून खूप आधीच इच्छापत्र करून ठेवायला हवे. त्यामुळे इच्छुक किंवा डॉक्टर कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही.
श्रोता : तुमच्याजवळ नमूना आहे का?
अ ३ : ‘समाधान जीवनमुक्तीचे! न्यायदेवतेला आवाहन’ या शिर्षकाचे डॉ. आशा सावर्डेकर यांनी लिहिलेले पुस्तक माझ्याजवळ आहे. ते वाचा, इतरांना द्या. त्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडतील.
अ २ : या पुस्तकात केंद्र सरकारने तयार केलेले बिल व त्यावरील मतप्रदर्शन एन्ड ऑफ लाईफ केअर- एक नवा उपक्रम, ‘इच्छामरण’ या विषयावरील विविध विचारवंतांची मते, असा सर्वांगांनी केलेला विचार दिला आहे.
ब ४ : आपल्या हातांनी मरण ओढवून घ्यावं हे काही फारसं पटत नाही बुवा.
अ २ : मला सांगा, जन्म आपल्या हातात आहे?
ब ४ : नाही! परंतु, पूर्वपुण्याईनुसार मिळालेला मनुष्यजन्म सर्वात श्रेष्ठ तो असा...
अ २ : मनुष्यजन्म श्रेष्ठ म्हणता मग इतर प्राणीमात्रासारखं असहाय्य होऊन का मरायचं? माणूस म्हणून आयुष्यभर हिमतीने जगलात त्याच हिमतीने स्वखुशीने....
श्रोते : हो! सन्मानाने मृत्यूला सामोरे जाण्यात माणसाच्या हिमतीची कसोटी लागेल.
ब १ : (श्रोत्यांना उद्देशून) तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांचा लाईफ सपोर्ट काढून घ्या म्हणून परवानगी देताना तुमचं मन कचरणार नाही? त्याला हिंमत म्हणायचे की आतापर्यंतचे औषधोपचार, सेवा, प्रार्थना हे सगळं नाटक म्हणायचे?
श्रोता : अहो असं कसं म्हणता तुम्ही?
अ १ : थांबा! मी विचारतो ‘ब’ च्या सभासदांना. तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांना हगण्यामुतण्यात लोळू देणं, तुम्हाला बघवेल? त्यांना कुशीवर वळवता न आल्याने झालेले, त्यांचे ड्रेसिंग करताना होणारा त्यांचा आक्रोश ऐकवेल तुम्हाला? आतले सगळे अवयव निकामी झाले आहेत. कृत्रिम साधनांनी श्वासोच्छ्वास चालू ठेवला आहे, इंट्राव्हीनस ग्लुकोज टोचून टोचून शरीर सुजून गेले आहे आणि हे अशाप्रकारे पाहिजे तेवढे दिवस शरीर ठेवता येईल त्याला जिवंत असणं म्हणायचे? की.... त्या नातेवाईकाची वेदनाविरहित लवकरात लवकर सुटका केली तर तुम्ही त्याला जागलात म्हणायचे?
श्रोता : खरं आहे तुमचं म्हणणं. जन्म नसेल पण मृत्यू आपल्या हातात म्हणजे नियंत्रणात ठेवू शकतो.
अ ३ : या कायद्यातल्या अटी काळजीपूर्वक वाचा. वाटेल त्याला वाटेल त्या परिस्थितीत मृत्यू देणे हा गुन्हा ठरू शकेल परंतु कायद्यात वर्णन केलेल्या परिस्थितीत मृत्यू येऊ दिला तर तो आशीर्वादच ठरेल.
श्रोता : अहो, मला माझ्या अवयवांचे दान करायचे आहे, पण....
अ २ : चांगला विचार आहे. त्यासाठीही श्री. लवाटेंसारखे वयस्कर झाला तरी दान करण्यायोग्य स्थितीत अवयव निरोगी असले पाहिजे आणि हो, नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत वाट न पाहता जन्माचे सार्थक झाल्याची खात्री असेल तर दानपत्रात तसे लिहून मृत्यूला सामोरे जावे.
श्रोता : हे दानपत्र कसे करतात?
अ १ : काही हॉस्पिटलात विहित अर्ज मिळतात. ते भरून वकिलामार्फत पुढचे सोपस्कार पार पाडता येतात.
सचिव : मला वाटतं या विषयावर जेवढं बोलू तेवढं थोडं आहे. आजची चर्चा सकारात्मक झाली तरीही आणखी कोणाला काही विचारायचे असल्यास आपण पुन्हा एकदा हा संवाद घडवून आणू. मात्र आजच्या चर्चेने तुमच्या मनात विचारचक्र फिरू द्या. ‘अ’ किंवा ‘ब’ विभागाचे सभासद म्हणतात म्हणून तुम्ही तुमचं मत बनवू नका. जमेल तेव्हा इतरांशी चर्चा करा. उल्लेखलेले पुस्तक बारकाईने वाचा. त्यातील प्रसंगात स्वत:ला ठेवून तिऱ्हाईताच्या दृष्टीने या उपायाकडे पहा. अशी जागृती व्हावी हाच या पुस्तकाचा आणि आजच्या चर्चेचा उद्देश आहे. आभारी आहे. भेटू पुन्हा लवकरच.
(लेखिका साहित्यिक आहेत.)

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more