स्त्री- स्वातंत्र्याचे प्रखर पुरस्कर्ते

ललित

Story: शुभांगी काशिद |
09th February 2019, 09:26 am
स्त्री- स्वातंत्र्याचे प्रखर पुरस्कर्ते


----
तर्कसुसंगत तत्त्वज्ञानाने अखिल मानवजातीला समयोचित ज्ञानार्जन करणारे प्रकांड पंडित भारतभूमीत नेहमीच घडले. स्वामी विवेकानंद म्हणजे अशाच तत्त्ववेत्त्यांच्या, पंडितांच्या अन् ज्ञानियांच्या मांदियाळीतलं आदरणीय नाव. स्त्री स्वातंत्र्याचे स्वामीजींचे विचार आजही नेमकेपणाने लागू पडतात हे त्यांच्या भाषणांच्या, व्याख्यानांच्या अहवालांवरून लक्षात येते. ‘स्वतःच्या समस्या स्वतःच्याच पद्धतीने सोडविता येण्याची क्षमता स्त्रियांना लाभली पाहिजे. जगातील कोणत्याही स्त्रियांइतक्याच योग्यतेने भारतीय स्त्रिया हे करू शकतात....’ डिसेंबर १८९८ च्या ‘प्रबुद्ध भारत’ मध्ये स्वामीजींची प्रसिद्ध झालेली एक मुलाखत त्यांचे स्त्रियांच्या आत्मनिर्भतेसंदर्भातील स्पष्ट मत दर्शवते. स्वामी विवेकानंद या नावाभोवती गेली शतकभर भारतीय मन उत्सुकतेने घुटमळतंय. स्वामीजींचे आचार विचार, त्यांची पराकोटीची बौद्धिक क्षमता, युवकांना, युवतींना बलोपासनेचं, ज्ञानोपासनेचं महत्व सांगणारी त्यांची कृती अन् त्यांचे शब्द, जगभर हिंदुत्वाचा जयघोष करत भारताची पर्यायाने भारतीयांची वाढवलेली प्रतिष्ठा... सगळेच अगदी अलौकिक.
स्वामी विवेकानंद यांना भारतातील युवावर्गावर फार विश्वास. त्यांना इथल्या युवक-युवतींकडून भविष्यातील देशहितकार्याची अपेक्षा होती. आज भारताने केलेली चौफेर प्रगती पाहता भारतीय युवा वर्गाने स्वामीजींच्या अपेक्षेस निश्चित सार्थ ठरवल्याचे दिसते. जगभरातील बहुतांश समाज आज अराजकतेकडे झुकलेला असतानाही भारतीय समाजमन मात्र आजही स्थिर, प्रौढ, विचारी अन् सात्त्विक म्हणावं, असं आहे. स्वामीजींच्या विचारांचा हा विजय देशाला हितकारक ठरला. स्वामीजी नेहमी म्हणत की ‘स्त्रियांनी हा देश घडवला’. भारतासाठी हे अगदी तंतोतंत जुळणारं वाक्य. ज्या समाजात सीता निर्माण झाली, अहल्या जन्मली, पतिव्रता गांधारी, कुंती, मीराबाई घडली त्या समाजात स्त्रियांविषयी असलेला आदर जगातील कोणत्याही समाजापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. शिक्षण म्हणजे तरी दुसरे काय? जो समाज आपली इच्छाशक्ती उत्तमोत्तम आशा बाबींकडे वळवून त्यांना प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवतो, तो समाज खरा शिक्षित समाज म्हणावा लागेल. सुदैवाने भारतीय स्त्रिया या बाबतीत सहस्र पटींनी शिक्षित म्हणाव्या लागतील.
स्वामीजींनी अमेरिकेतील शिकागोमध्ये दिलेल्या व्याख्यानांचा एक अहवाल ‘शिकागो डेली हंटर- ओशन’ या वृत्तपत्रात २३ सप्टेंबर १८९३ रोजी प्रसिद्ध झाला. त्यात ते म्हणतात की, ‘हिंदू स्त्रिया अत्यंत आध्यात्मप्रवण व धार्मिक आहेत. या बाबतीत त्या जगातील इतर सर्व स्त्रियांहून श्रेष्ठ ठरतील. या सुंदर वैशिष्ट्यांचं जतन करून आपल्या स्त्रीवर्गाच्या बौद्धिक गुणांचा आणखी विकास करू शकलो तर भावी हिंदू स्त्री जगातील आदर्श स्त्री होईल.’ विशेष म्हणजे शिकागोमधील हे भाषण आयोजित करणारी एक महिला होती. त्यांचं नाव पामर. व्याख्यानाचं स्थळ होतं, ‘वूमेन्स बिल्डिंग, शिकागो’.
स्वामीजींना भारतीय महिलांमधील वैशिष्ट्यांचा अभिमान होता. जोपर्यंत स्त्रियांची आर्थिक, सामाजिक अन् सांस्कृतिक स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही हे त्यांनी जगाला वारंवार सांगितले. स्त्रीचं असणं, त्यातही तिचं स्वतंत्र असणं समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं याची त्यांना जाणीव होती. आपल्या भाषणांत त्यांनी हे विचार अनेकदा मांडले आहेत.
स्वामीजी संन्यस्त जीवन जगले. त्यांच्या मस्तकावर नेहमी पिवळ्या किंवा लाल रंगाचा फेटा असे. नारिंगी किंवा गडद किरमिजी रंगाचा त्यांचा झगा कमरेला नेहमी शेल्याच्या पट्ट्याने आवळलेला असे. बांधेसूद शरीर अन् चेहऱ्यावरील विलक्षण चमक. त्यांचं हे रूपच त्यांच्या संन्याशी जीवनाचे दर्शक होते. सर्वसंगपरित्याग करून त्यांनी संन्यास का घेतला? या प्रश्नावर ते नेहमी म्हणत की, ‘प्रत्येक स्त्री मध्ये जर मला जगन्माताच दिसत असेल तर मी लग्न का करू? मला पुनर्जन्माची अभिलाषा नाही तर, मृत्युपश्चात मला कायमचं आत्मतत्त्वात विलीन व्हायचं आहे....’ (बोस्टन इव्हिनिंग ट्रान्सक्रिप्ट’ मध्ये ३० सप्टेंबर १८९३ रोजी प्रसिद्ध झालेला अहवाल.) २१ जानेवारी १८९५ रोजी ‘ब्रुकलिन स्टँडर्ड युनियन’ मध्ये व्याख्यानाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. स्वामीजी म्हणतात, ‘भारतात माता ही कुटुंबाची प्रमुख असून तीच आमचा सर्वोच्च आदर्श आहे कारण, आम्हाला ती ईश्वराची प्रतिनिधी वाटते’. त्यांच्या स्त्रीविचारांची परिसीमा आणखी कोणती असेल?
केवळ भारतच नव्हे तर उभ्या जगातील स्त्रिया त्यांना मातेसमान भासत. व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांनी जगभरातील स्त्री जीवन अनुभवलं होतं. त्यांच्या सन्यस्त जीवनाचं मर्म निश्चित होतं. म्हणूनच स्त्री-स्वातंत्र्याचे प्रखर पुरस्कर्ते असलेले स्वामीजी जगभर आदरणीय ठरले. भारतभूमीतील या तत्त्वश्रेष्ठाने ‘तत्त्ववेत्ता’ म्हणून आपली अनुकरणीय छाप जगाच्या पटलावर कायमची उमटवली. त्यामुळेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे, मानवी मूल्यांना श्रेष्ठत्व देण्याच्या वृत्तीचे अन् स्त्री स्वातंत्र्यपूरक विचारांचे गुणगान कोणालाही आपलसं वाटावं असंच आहे.
(लेखिका गृहिणी आहेत.)