न्यूझीलंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव


31st January 2019, 03:51 pm
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव

हॅमिल्टन :कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची उणीव चौथ्या एकदिवसीय सामन्यात प्रकर्षाने जाणवली. भारतीय संघाच्या फलंदाजांची न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर त्रेधातिरपीट उडाली. भारताला केवळ ९२ धावांत गुंडाळल्यानंतर यजमान संघाने मिळालेले लक्ष्य २ गडी गमावून १४.४ षटकांत गाठले.
सलामीवीर माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत भारताचा डाव सावरणे एकाही फलंदाजाला जमले नाही आणि भारताचा संपूर्पण संघ ९२ धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडने हे लक्ष्य ८ विकेट व २१२ चेंडू राखून सहज मिळवले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या विजयाची नोंद केली. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात भारताचा हा सर्वात मानहानिकारक पराभव ठरला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ ९२ धावा केल्या. यात फिरकी जोडी कुलदीप यादव व युझवेंद्र चहल यांची भूमिका महत्त्वाची ठरली. भारत ५० धावांत आटोपणार असे दिसत असताना कुलदीप व चहल यांनी भागीदारी करत भारताला शंभर धावांच्या जवळ पोहोचवले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या यजमान न्यूझीलंडने लक्ष्य १४.४ षटकांत गाठले.
कोणत्याही संघाने आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध २०९ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला नव्हता, मात्र न्यूझीलंडने २१२ चेंडू राखून भारताचा पराभव केला. २०१० साली श्रीलंकेनंतर न्यूझीलंडने भारताचा लाजिरवाणा पराभव केला आहे.
रोहितचा २००वा एकदिवसीय सामना
विराटच्या अनुपस्थितीत संघाची कमान सांभाळणाऱ्या रोहितसाठी आजच सामना विशेष होता. रोहितचा हा २००वा एकदिवसीय सामना होता व या सामन्याला तो संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करणार होता. परंतु त्याच्या २००व्या सामन्यात भारताला आपला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. रोहित शर्मा केवळ ७ धावा करून बाद झाला.
संक्षिप्त धावफलक : भारत : ३०.५ षटकांत सर्वबाद ९२ धावा : रोहित शर्मा झे. गो. बोल्ट ७, शिखर धवन पा. गो. बोल्ट १३, हार्दिक पांड्या झे. लॅथम गो. बोल्ट १६, कुलदीप यादव झे. ग्रँडहोम गो. अॅस्टेल १५, युझवेंद्र चहल (नाबाद) १८. गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट १०-४-२१-५, कॉलिन डी ग्रँडहोम १०-२-२६-३.
न्यूझीलंड : १४.४ षटकांत २ बाद ९३ धावा : हेन्री निकोल्स (नाबाद) ३०, रॉस टेलर (नाबाद) ३७. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-१-२५-२.